चिपळूणमध्ये बुधवारी द्वारकनाथ शेंडे पुरस्कार वितरण

चिपळूण : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि अरविंद जाधव अपरान्त संशोधन केंद्राच्या वतीने २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात कविवर्य द्वारकनाथ शेंडे पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असलेल्या या सोहळ्यात सामाजिक कार्यासाठी सतीश कामत यांना ‘गात जा अभंग’ पुरस्कार, ‘हरविलेल्या कवितांची वही’ काव्यसंग्रहासाठी संदीप पाटील यांना ‘मृदंगी’ पुरस्कार आणि ‘लक्ष्मी’ कथासंग्रहासाठी सौ. नीला नातू यांना ‘मनबोली’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

करोनाप्रतिबंधाचे सर्व नियम पाळून होणार असलेल्या या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कोषाध्यक्ष विनायक ओक आणि कार्यवाह धनंजय चितळे यांनी केले आहे.

‘गात जा अभंग’ पुरस्कार जाहीर झालेले सतीश कामत यांची पत्रकारितेतील कारकीर्द पुणे, दिल्ली, मुंबई, कोकण अशी आहे. कामत यांचे शिक्षण एम.ए. (इंग्लिश) आहे. कॉलेजपासून लेखनाची आवड जोपासणाऱ्या कामत यांच्या पत्रकारितेची सुरुवात अणीबाणीनंतरच्या काळात झाली. ‘अध्यापन की पत्रकारिता’ अशा विचारातून त्यांनी पत्रकारिता निवडली होती. जून २००७ पासून कामत संगमेश्वर तालुक्यातील त्यांचे मूळ गाव असलेल्या राजवाडी येथे पीपल्स इम्पॉवरिंग मूव्हमेंट (पेम) या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवत आहेत. कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडविणाऱ्या यशस्वी ‘राजवाडी पॅटर्न’चे ते प्रणेते आहेत. कोकणातील आर्थिक, सामाजिक मागासलेपणाची आणि समस्यांची जाणीव असल्याने त्यासाठी जमले तर काहीतरी करावे, या विचारातून राजवाडीत काम उभे राहत गेल्याचे ते आवर्जून नमूद करतात. शाळेतील मुलांसाठी कार्यक्रम, मुलांच्या गरजांची यादी करून शैक्षणिक साहित्य वाटप, शाळा व्यवस्थापन कमिटी आणि पालकांशी संवाद, पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक, श्रमदान, शेती अशा टप्प्यांवरून कार्यरत होत पेम संस्थेने राजवाडी भाजी पॅटर्न निर्माण केला आहे.

कामत यांच्या पत्रकारितेतील मराठवाडा नामांतर आंदोलन, दिल्लीतील राजकीय घडामोडी आणि केरळमधील मार्क्सवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघर्षावरील लेखनमाला विशेष गाजल्या होत्या. पत्रकारितेच्या माध्यमातून स्व. इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, चंद्रशेखर, राजीव गांधी, मधू दंडवते यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना प्रत्यक्ष भेटलेले, निवडणुकांच्या निमित्ताने बिहार, उत्तर प्रदेश तर दंगलीच्या वार्तांकनासाठी हैदराबादला भ्रमंती केलेल्या कामत यांच्याकडे वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांचा साठा आहे. मराठी साहित्य विश्वातील विद्याधर पुंडलिक, विश्राम बेडेकर, दि. बा. मोकाशी आदींनी त्यांना प्रभावित केले आहे. अमरावतीतील तपोवन आश्रमचे संस्थापक पद्मश्री डॉ. शिवाजीराव ऊर्फ दाजीसाहेब पटवर्धन आदी असंख्य मान्यवरांच्या आठवणी त्यांच्याकडे आहेत. यापूर्वी २०१४ साली त्यांना पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळातर्फे ‘वरुणराज भिडे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply