पुतळा उभारून सुभाषबाबूंसह आझाद हिंद सेनेला अभिवादन

२३ जानेवारी ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी.
…..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण झाले. नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आज १२५ वी जयंती आहे. त्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रॅनाइटचा पुतळा तयार होत नाही, तोपर्यंत इंडिया गेटवर त्यांचा होलोग्राम पुतळा बसवला जाईल, असे पंतप्रधान म्हणाले होते. नेताजीचा पुतळा दिल्लीतील इंडिया गेट येथे उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याची उंची २५ फूट असेल आणि ती ग्रॅनाइट दगडापासून बनविली जाईल, अशी माहिती नवी दिल्लीतील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाचे महासंचालक अद्वैत गडनाईक यांनी दिली.

कोणे एके काळी ब्रिटनचे पंचम जॉर्ज यांचा पुतळा होता, त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. पंचम जॉर्जचा पुतळा १९६८ साली हटवण्यात आला आहे. तेव्हापासून तेथील मेघडंबरी रिकामीच आहे. त्या ठिकाणी आता सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे.

होलोग्राफिक हा डिजिटल तंत्रज्ञानाचा एक प्रकार असून हे प्रोजेक्टरसारखे काम करते. त्यात कोणत्याही गोष्टीला थ्रीडी आकार दिला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानाच्या वापराने आता पर्यटक आणि दिल्लीकरांना नेताजींचा पुतळा इंडिया गेटवर बसेपर्यंत होलोग्रामद्वारे नेताजींचा पुतळा तेथे असल्याचे भासणार आहे.

ज्यांचा पुतळा अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी बसविला जाणार आहे, त्या सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रीय सभेचे ते नेते होते. काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेचे दोन वेळा अध्यक्ष होते. इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतले होते. अशा वेळी स्वातंत्र्य आंदोलन तीव्र करावे आणि इंग्रजांच्या शत्रूची मदत घ्यावी, असे त्यांचे मत होते. याबाबत राष्ट्रीय सभेच्या नेत्यांशी मतभेद झाल्याने ते त्यातून बाहेर पडले आणि आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी फॉर्वर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. त्या माध्यमातून आंदोलन सुरू केले. ब्रिटिशांनी त्यांना कैदेत टाकले. त्यांनी तेथे आमरण उपोषण सुरू केले. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना मुक्त करून त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले. १९४२ च्या पूर्वार्धात जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले. त्या ब्रिटिश सैन्यातील हजारो भारतीय सैनिक आणि अधिकारी जपानच्या हाती लागले. रासबिहारी बोस यांनी युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची कॅप्टन मोहनसिंग यांच्या मदतीने एक तुकडी तयार केली. तिला आझाद हिंद सेना असे नाव दिले आणि सुभाषचंद्र बोस यांना त्याचे प्रमुख नेमले. नेताजींनी १९४३ च्या ऑक्टोबर महिन्यात सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केले. यामध्ये त्यांचे सहकारी म्हणून कॅप्टन जगन्नाथ भोसले, डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन, प्रेमकुमार सहगल इत्यादी होते. नेताजींनी भारतीय जनतेला तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूँगा असे आवाहन केले.

जपानच्या मदतीने आझाद हिंद सेनेने सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली भारतावर आक्रमण केले. अंदमान-निकोबार ही बेटे जिंकली. नेताजींनी त्यांना अनुक्रमे शहीद आणि स्वराज्य अशी नावे दिली. त्यानंतर म्यानमारमधील आराखानचा प्रदेश जिंकला. तसेच आसाममधील काही ठाणी जिंकली. पण याच दरम्यान जपानवर बॉम्बफेक झाल्याने जपानने अमेरिकेजवळ शरणागती पत्करली. १८ ऑगस्ट १९४५ रोजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात निधन झाले. नंतर आझाद हिंद सेनेने आक्रमण थांबवले. ब्रिटिश शासनाने सेनेच्या लष्करी अधिकाऱ्यांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून खटले भरले. पं. नेहरू, तेजबहादूर सप्रू या कायदेपंडितांनी अधिकाऱ्यांच्या बचावाचे काम केले. पण लष्करी न्यायालयाने अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. त्यामुळे भारतीय जनतेत ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाला आणि शिक्षा रद्द झाल्या.

स्वातंत्र्यसंग्रामात सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेचे असे महत्त्वपूर्ण योगदान होते. सुभाषचंद्रांचा पुतळा दिल्लीत महत्त्वाच्या ठिकाणी उभारून आझाद हिंद सेना आणि सुभाषबाबूंना श्रद्धांजली वाहण्याचे काम शासनाने केले आहे. त्यांचे कार्य सतत डोळ्यांसमोर राहायला त्यामुळे मदतच होणार आहे.

संग्राहक – विलास यशवंत राजवाडकर, खेड

(संपर्क – ८४४६८५५७८९)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply