चिपळूण : महाराष्ट्रात १९०६ साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी ‘कृषिभूषण’ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे निवड झाली आहे. त्यांचा येत्या गुरुवारी (दि. २७ जानेवारी) चिपळूण येथे सत्कार करण्यात येणार आहे.
श्री. चोरगे यांच्या निवडीमुळे कोकणाला पहिल्यांदाच उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. साहित्य क्षेत्रात आजवर चोरगे सरांनी केलेल्या लेखनकार्याला मिळालेली ही मान्यता अभिमानास्पद असल्याने चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या संयुक्त विद्यमाने २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ब्राह्मण साहाय्यक संघाच्या सभागृहात डॉ. चोरगे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
डॉ. चोरगे यांनी कथा, कादंबरी, नाटक, बँकिंग आदी विषयावरील चाळीसहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे झेप हे सुमारे आठशे पानांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. ते वाचल्यावर एका सर्वसामान्य माणसाने स्वकर्तृत्वाने अनंत अडचणींवर मात करत घेतलेली सामर्थ्यशाली झेप अनुभवास येते. त्यांच्या लेखणीतून उतरलेले जीवनानुभव विविधांगी आहेत. उत्तम सामाजिक भान असलेल्या डॉ. चोरगे यांचे सहकार क्षेत्रातील काम आदर्शवत आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीत त्यांच्या भक्कम नेतृत्वाचे मोठे योगदान आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणाऱ्या या सत्कार समारंभाला सौ. अंजली तानाजीराव चोरगे, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सौ. सुनीताराजे पवार, चिपळूणचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे उपस्थित राहाणार आहेत. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे मुखपत्र असलेल्या ‘मृदंगी’ मासिकाचे प्रकाशन या कार्यक्रमात होणार आहे.
करोनाप्रतिबंधाचे सर्व नियम पाळून होणार असलेल्या या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आणि महाराष्ट्र साहित्य परिषतेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी केले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media