मध्यमवर्गीयांची आत्ममग्नता आणि प्रतिसादशून्यता भयावह – प्रा. मिलिंद जोशी

चिपळूण : सामाजिक काम उभे करणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या मनात निर्माण झालेली आत्ममग्नता आणि प्रतिसादशून्यता भयावह आहे. हे समाजासाठी घातक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष, नामवंत लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि अरविंद जाधव अपरान्त संशोधन केंद्र आयोजित कविवर्य द्वारकनाथ शेंडे पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, शेती व्यवसायातील प्रसिद्ध राजवाडी पॅटर्नचे प्रणेते, चार दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत, चूल, मूल आणि करियर या त्रांगड्यात अडकलेल्या स्त्रीजीवनातील विविध प्रश्नांची उत्तरे आपल्या कथांमधून सांगणाऱ्या लेखिका सौ. नीला नातू, १६० वर्षांची परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते द्वारकानाथ शेंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी पुढे बोलताना श्री. जोशी म्हणाले, महात्मा गांधींनी महाराष्ट्राला ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ म्हटले होते. आज कार्यकर्ते शोधावे लागत आहेत. सामाजिक काम हे मध्यमवर्गीयांनी उभे केलेले काम आहे. आज परिस्थिती बदलली आहे. समाजातील उच्चभ्रू वर्ग आपल्या स्टेटसच्या संकल्पना सांभाळण्यात मश्गूल आहे. समाजाच्या सामान्यस्तराचा जगण्याचा संघर्ष तीव्र आहे. अशावेळी समाजाचे संतुलन ठेवण्याचे काम पूर्वी मध्यमवर्गाने केले होते. पण आज आपण जे लिहितो, वाचतो, बोलतो, करतो त्याची दखल घेतली जात नाही, अशी याच मध्यमवर्गाची भावना झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा पुरवठा करणारी यंत्रणा ठप्प झाली आहे. पोटतिडकीने बोलणाऱ्या नीला नातू यांचे भाषण ऐकताना महाभारतातले एखादे कांड ऐकत आहोत, असे वाटत होते. दारूबंदीसारख्या विषयाला त्यांनी हात घातला. करोनाकाळात मद्यालये पहिली सुरू झाली. ग्रंथालये सुरू व्हावीत, म्हणून आपल्याला मुख्यमंत्र्यांना पत्र द्यावे लागले होते. त्यामुळे आपल्या समाजाला प्राधान्यक्रम कोणता, मद्यालये की ग्रंथालये, हे निश्चित करावे लागेल. सतीश कामत कृतिशील पत्रकार आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या कमतरतांवर बोट ठेवताना आपली जबाबदारी काय, आपण काय करू शकतो, याचा राजवाडीसारख्या ठिकाणी त्यांनी कृतीत उतरवलेला विचार महत्त्वाचा आहे. तो मोठ्या शहरात पोहोचला पाहिजे. त्यांच्यासोबत हा पुरस्कार तरुणाईने स्वीकारला हे अधिक महत्त्वाचे आहे. समर्थांच्या शब्दात सांगायचे तर, ‘मुलाचे चालीने चालावे। मुलांचे मनोगत बोलावे। तैसे जनास शिकवावे। हळूहळू।’ सामाजिक काम करताना समाज सोबत असायला हवा आहे. असे काम राजवाडीत सुरू आहे, हे आनंददायक आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे दुष्काळ, नापिकी यांसोबत त्यांचा हरवलेला स्वाभिमान, नाकारले गेलेले माणूसपण, समाजाच्या इतर घटकांचे कोशात जगणेही कारणीभूत आहे. आज स्पर्धा आणि असूया प्रचंड वाढलेली आहे. सुखदु:खासह यशात आणि आनंदात सहभागी होतात, ते खरे मित्र असे म्हणायला हवे आहे. चांगले काम करणाऱ्यांबद्दल चांगले बोलण्यासाठी माणसे लागतात. आज समाजाला त्यांचीही गरज आहे. समाजाला कर्ते सुधारक आणि ‘बोलते’ सुधारक आवश्यक आहेत. पूर्वीचे समाजाचे प्रश्न वेगळे होते. आज प्रश्नांचे स्वरूप बदललेले आहे. काळाने अधिक जटील प्रश्न आपल्यासमोर उभे केले आहेत. मातृ-पितृ-आचार्य देवो भव म्हणणारी संस्कृती असलेल्या आपल्या देशात आपल्याला मुलांनी आई-वडिलांना सांभाळावे, म्हणून कायदे करावे लागतात. जागतिकीकरणानंतर आपल्याकडे आर्थिक समृद्धी आली. त्यामुळे मूल्यव्यवस्था बदलली. जगण्याचे प्राधान्य क्रम बदलले. पगाराचे आकडे वाढले. एकेकाळी विद्वत्ता, सद्वर्तन आणि चारित्र्य हे प्रतिष्ठेचे निकष होते. आज हातातले घड्याळ, मोबाइल, गाडी, तुम्ही कोणत्या भागात राहता, यावरून माणसाची प्रतिष्ठा ठरते आहे. लोकमान्यांच्या आयुष्यामध्ये सत्त्वपरीक्षा पाहणारे जितके प्रसंग आले तितके या वाचनालयाच्या आयुष्यात आले. तरीही लोकमान्यांच्याच अभेद्य कार्यनिष्ठेने हे वाचनालय आजही कार्यरत आहे याचा अतिशय आनंद आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपला वेळ देणे ही जगात सर्वांत कठीण गोष्ट आहे. वाचनालयाला असे कार्यकर्ते लाभलेत. प्रचंड यातायात करून असे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी आपुलकी आणि आस्था वाटते, असे प्रा. जोशी म्हणाले.

जोशी यांच्याहस्ते सामाजिक कार्यासाठी ‘गात जा अभंग’ पुरस्कार सतीश कामत यांच्यासह संतोष भडवळकर, सुहास लिंगायत, राजवैभव राऊत आणि सौरभ पांचाळ या तरुण शेतकऱ्यांनी स्वीकारला. यावेळी सतीश कामत यांनी सांगितले की, मी फार मोठे काम केलेले नाही. जमेल तेवढे जाताजाता करावे, एवढ्याच हेतूने हे काम झालेले आहे. कोकणात उद्यमशील माणूसही आहे. कोकणातील लोकांचे पाण्यामुळे अडते. कोकणात ब्राह्मण, मराठा आणि मुस्लिम वर्गाकडे पाणी आहे. शेती करणाऱ्या बहुसंख्य कुणबी लोकांकडे पाणी नाही. म्हणून अडचणी आहेत. आज सामाजिक कामांना निधी भरपूर मिळतो आहे. राजवाडीतही गरजेतून उपक्रमांची जुळवाजुळव करत काम उभे राहिले आहे. आगामी काळात कृषी आणि पर्यावरणावर आधारित पर्यटन असा विषय राजवाडीत करावयाचा आहे. यातली माझी भूमिका मध्यस्थाची आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याहस्ते सामाजिक कार्यासाठी ‘गात जा अभंग’ पुरस्कार स्वीकारताना सतीश कामत, संतोष भडवळकर, सुहास लिंगायत, राजवैभव राऊत आणि सौरभ पांचाळ, डॉ. यतीन जाधव आदी.

जोशी यांच्या हस्ते ‘लक्ष्मी’ कथासंग्रहासाठी ‘मनबोली’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर सौ. नीला नातू यांनी आपल्या भाषणात उमरोली गावातील दारूबंदीची कथा सांगितली. कोकणातील पाळीव सोमवार प्रथा, त्यानिमित्ताने महिलांचे केलेले एकत्रीकरण, १९९३-९४ सालचा दारूबंदीसाठीचा लढा, महिलांची भिशी सुरू करण्याची कल्पना, कोकणात महिलांसाठी काम करताना येणाऱ्या अडचणी त्यांनी सांगितल्या.

मिलिंद जोशी यांच्याहस्ते ‘लक्ष्मी’ कथासंग्रहासाठी ‘मनबोली’ पुरस्कार स्वीकारताना सौ. नीला नातू

राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक आणि नामवंत कवी-पटकथा लेखक संजय पाटील यांच्या ‘हरविलेल्या कवितांची वही’ या काव्यसंग्रहासाठी वाचनालयाचा ‘मृदंगी’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते समारंभाला अनुपस्थित होते. त्यांच्या भावनांचा संदेश यावेळी ऐकवण्यात आला.

अंजली बर्वे यांनी पुरस्कार्थींचा परिचय करून दिला. द्वारकानाथ शेंडे यांच्याविषयी मनीषा दामले यांनी माहिती दिली. प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे यांना ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले, तर मधुसूदन केतकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply