निमित्त : स्वरभास्कर बैठक

इतिहास सांगीतिक मैफलींचा

रत्नागिरीमध्ये आर्ट सर्कलच्या संगीत महोत्सवाची सुरुवात २००८ साली झाली. अर्थात त्याआधीसुद्धा सांगीतिक उपक्रम होतच होते. इतिहासात डोकवायचंच म्हटलं, तर अगदी पन्नासच्या दशकापर्यंत मागे जावे लागेल. त्याकाळात काही खासगी मैफिली संगीतप्रेमी मंडळी आयोजित करत असत. नंतर साधारण १९५५-५६ साली एक संगीत मंडळ अस्तित्वात आलं, जे पुढची ६-७ वर्षं कार्यरत असल्याचं कळतं. संस्थेने त्याकाळात वार्षिक सभासद योजना अमलात आणली होती. त्याद्वारे अगदी हिराबाई बडोदेकर ते पं. भीमसेन जोशी यांच्यापर्यंत अनेक नामवंत कलाकार आपलं सादरीकरण करून गेले होते. कालांतराने त्या संस्थेचं काम थांबलं. नंतर काही काळ आकाशवाणी संगीत संमेलनंसुद्धा अधूनमधून होत होती, ज्यामध्ये उस्ताद अब्दुल हलीम जाफर खां साहेबांचं सतारवादन सध्याच्या श्रीराम चित्रमंदिरामध्ये झालं होतं. ऐंशीच्या दशकात आकाशवाणी केंद्र सुरू झालं आणि मान्यताप्राप्त कलाकार बैठकीला/साथीला मिळणं सहजशक्य झालं. त्यातूनच गुणात्मक कार्यक्रमाची संख्या वाढायला मदत झालीच असणार. त्यादरम्यान सुरू झालेल्या माघी गणेशोत्सवात काही मंडळांनी गायनाचे कार्यक्रम आयोजिले, ज्यात एकदा भीमसेनजींना ऐकण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळाली होती.

अर्थात त्याकाळी होणारे बहुतांश कार्यक्रम फक्त शास्त्रीय संगीताचे होते, असं नव्हे. पहिला थोडा वेळ शास्त्रीय संगीत आणि नंतर नाट्यसंगीत आणि भीमसेनजींच्या बाबतीत संतवाणी हा पॅटर्न तेव्हापासूनच रूढ झाला असणार, असं वाटतंय. खरं तर कोकणात रागदारी संगीत फारसं रुजलंच नाही. इथे लोकाश्रय मिळाला तो नाट्यसंगीताला आणि भीमसेनजींनी अभंगवाणी लोकप्रिय केल्यानंतर अभंगांना!

अभिजात शास्त्रीय संगीताला खऱ्या अर्थाने चालना मिळाली ती नव्वदच्या दशकात! प्रसिद्धीची नवनवीन साधनं, दळणवळणाच्या वाढलेल्या सुविधा आणि कलेला चरितार्थ म्हणून स्वीकारण्याची वाढलेली मानसिकता यामुळे एकूणच कलाक्षेत्राकडे आणि त्यातही संगीतक्षेत्राला चांगला काळ येऊ लागला. रत्नागिरीतसुद्धा त्याचे पडसाद दिसू लागले. अनेक कलाकार तयार होऊ लागले. संगीत शिकण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या शहरात ठरावीक काळानंतर जात राहून संगीत शिक्षण पूर्ण करण्याकडे कल वाढू लागला. कालांतराने रत्नागिरीतसुद्धा चांगली गुरुपरंपरा निर्माण झाली.

अशातच रत्नागिरीत खल्वायन संस्थेने मासिक संगीत सभा सुरू केली, जी अगदी आत्ता करोनाकाळापर्यंत अव्याहत चालू होती. रत्नागिरीच्या संगीतक्षेत्रासाठी हे खरंच एक क्रांतिकारी पाऊल ठरलंय. बहुतांश स्थानिक कलाकारांना सादरीकरणाची संधी मिळालीच, पण त्याचबरोबर अन्य कलाकारांना ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली हेही महत्त्वाचं! एकाचवेळी कलाकरांना आणि रसिकांना आपला स्तर उंचावण्याची ही खरं तर समान संधीच! त्याचा किती आणि कसा फायदा करून घेतला गेला, हा नक्कीच चर्चेचा विषय! त्याचदरम्यान राधाकृष्ण कलामंच या संस्थेने सुरू केलेली पाऊलखुणा ही शास्त्रीय संगीताची स्पर्धासुद्धा वातावरण निर्मितीसाठी महत्त्वाचं योगदान ठरली. तितकीच महत्त्वाची ठरली अभिरुची, देवरूख ही संस्था आणि त्यांचा तीन दिवसीय महोत्सव स्वरोत्सव!

देवरूखसारख्या छोट्याशा गावात जर तीन दिवसांचा संगीत महोत्सव होऊ शकतो तर रत्नागिरी सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी का नाही असा एखादा महोत्सव?

हा प्रश्न आणि निर्माण झालेलं पोषक वातावरण यात रत्नागिरीतल्या आर्ट सर्कलच्या निर्मितीची बीजं आहेत हे नक्की! त्यातूनच थिबा राजवाडा येथील संगीत महोत्सव सुरू झाला हे खरं.

स्वरभास्कर बैठक

३० जानेवारी २०२२

सकाळी ५.४५ ते मध्यरात्री संपेपर्यंत.

स्थळ : राधाबाई शेट्ये सभागृह,
गो. जो. महाविद्यालय, रत्नागिरी.

स्वरभास्कर वेळापत्रक

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply