पुणे : कोकणातील मच्छीमारांसह देशभरातील मत्स्यव्यवसायाविषयी सखोल अभ्यास करून निरीक्षणे मांडणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक, पत्रकार अनिल अवचट (वय ७७) यांचे आज सकाळी निधन झाले.
राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर अनिल अवचट हे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिथयश लेखक होते. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी
मोठे काम केले. त्यांच्या पायावर अलीकडेच शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. मात्र डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना
त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला होता. आज (गुरुवारी) सकाळी त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर ते कोमामध्ये गेले आणि सकाळी सव्वानऊ वाजता त्यांचे निधन झाले.
डॉ. अनिल अवचट हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एमबीबीएसची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. महाराष्ट्र राज्य आणि देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. कोकणातील मत्स्यव्यवसायाचा बारकाईने अभ्यास त्यांनी केला होता, हे विशेष. प्रश्न आणि प्रश्न या मौज प्रकाशनगृहाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात मच्छीमार आणि समुद्र या लेखात त्यांनी त्याचा ऊहापोह केला आहे. हा लेख लिहिण्यासाठी त्यांनी कोचीनच्या संशोधन संस्थेचे निवृत्त संचालक एस. व्ही. बापट यांची भेट घेतली. त्यातून भारतातील मत्स्यव्यवसाय, त्यातल्या व्यावसायिकांचे प्रश्र्न, जागतिकीकरणाचे परिणाम यांचे विवेचन अवचट यांनी केले. कोकणातील पत्रकारांनीही अशा तऱ्हेचा मच्छिमारांच्या प्रश्नाचा अभ्यास करणारे लेखन केले नव्हते. डॉ. अवचट पत्रकार होते. मात्र त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली.
डॉ. अवचट यांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले. व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. डॉ. अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी लिखाण केले आहे. रिपोर्टिंगचे दिवस, स्वतःविषयी, पौर्णिमा,
अमेरिका यासह त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. रिपोर्ताज हा लेखनाचा प्रकार त्यांनी मराठीत लोकप्रिय केला. त्यांनी मुलांसाठीही लेखन केले. डॉ. अवचट यांचे लेखन प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या. नवीन पिढीलाही त्यांचे लेखन प्रेरणादायी वाटते.
डॉ. अवचट केवळ लेखक आणि सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही होते. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे, ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांचे अंगभूत गुण वेळोवेळी प्रकट झाले.
मुक्तांगणचे सध्याचे अध्यक्ष आनंद नाडकर्णी यांनी अनिल अवचट यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जीवन साधेपणाने कसे जगायचे हे त्यांनी शिकवले. गेल्या जानेवारीला ते पडले आणि शस्त्रक्रिया करावी लागली, हे निमित्त झाले. त्यातून ते सावरले नाहीत. अतिशय शांतपणे त्यांचे निर्वाण झाले. अनिल अवचट यांच्या स्मृतीसाठी सृजन
सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे काम सतत चालू ठेवले जाईल. तीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल, असेही डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड