मुंबई : शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील दुसरे महापौर, माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी (वय ८१) यांचे आज निधन झाले.
सुधीर जोशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची भूमिका महत्त्वाची होती. सुधीर जोशी १९६८ साली प्रथम नगरसेवक झाले. त्यानंतर मुंबई महापालिकेत गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून काम त्यांनी पाहिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९७१ साली आपले फॅमिली डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांची शिवसेनेचे पहिले महापौर म्हणून निवड केली. त्यांच्यानंतर १९७३ साली सुधीर जोशी मुंबई महापालिकेचे महापौर झाले, तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते. तत्पूर्वी १९६८ पासून ते विधान परिषद सदस्यही होते. १९९२-९३ या दरम्यान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची पाहणी करून त्यासंदर्भातील अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे शासनाकडे सादर केला. युतीच्या सरकारमध्ये ते जून १९९५ ते मे १९९६ या कालखंडात प्रथम महसूल मंत्री आणि नंतर शिक्षण मंत्री होते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय लोकाभिमुख ठरले आहेत.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे सुधीर जोशी यांचे मामा. पण मामा-भाच्यांच्या वयात केवळ तीन वर्षांचे अंतर होते. मामाच्या आधी भाचा मुंबईचा महापौर झाला. त्यांच्यानंतर त्यांचे मामा मनोहर जोशी १९७६ साली महापौर झाले. राज्यात १९९५ साली शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर मात्र शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्रिपदाची संधी मनोहर जोशी यांना दिली. त्यांच्या मंत्रिमंडळात सुधीर भाऊ जोशी कॅबिनेट मंत्री होते.
एका अपघातानंतर तसेच आजारपणामुळे १९९९ मध्ये सुधीरभाऊंनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते फारसे सार्वजनिक जीवनातही दिसत नव्हते.
शिवसेनेच्या स्थापनेनंतर ठाणे महापालिका सर केल्यानंतर १९६८ मध्ये मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेतला आणि पहिल्यांदाच शिवसेनेचे ४२ नगरसेवक निवडून आले. त्यात सुधीर भाऊंचा समावेश होता. सुधीरभाऊ पुन्हा १९७३ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावर्षी मनोहर जोशी, वामनराव महाडिक, दत्ताजी नलावडे, शरद आचार्य, चंद्रकांत पडवळ अशा ज्येष्ठ नेते मंडळींबरोबरच सुधीरभाऊंचाही महापौरपदासाठी विचार करून बाळासाहेबांनी त्यांना महापौरपदी विराजमान केले. शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेत प्रामुख्याने त्यांचे भाषण होई. त्यांच्या शब्दांत अत्यंत ओजस्वीपणा आणि श्रोत्यांना आकर्षित करण्याची ताकद असे. भाऊंनी स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अनेक मराठी तरुणांना बँक, निमसरकारी आस्थापनांमध्ये, तसेच विमा, विमान कंपन्या अशा कितीतरी ठिकाणी नोकऱ्या मिळवून दिल्या. त्या तरुणांना त्यांनी शिवसेनेकडे आकर्षितही केले. एक हरहुन्नरी आणि राजकारणातील अत्यंत सभ्य नेतृत्व अशी सुधीरभाऊ जोशी यांची ओळख होती.
त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ होती. त्यातच त्यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. ते करोनाच्या आजारातून बरे होऊन घरी परतले होते. मात्र आज त्यांचे निधन झाले.
(गुरुदत्त वाकदेकर)

