सुसंस्कारांचा मागोवा घेतानाच बदलही स्वीकारार्ह – सौ. अंजली बर्वे

चिपळूण : मानवी जीवनात संस्कारांना महत्त्व आहे. आजवर चालत आलेल्या सुसंस्कारांचा मागोवा घेतानाच काळानुरूप झालेले बदलही स्वीकारले पाहिजेत, असे मत कीर्तनकार अंजली बर्वे यांनी व्यक्त केले.

चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाने अप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्राचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या सहकार्याने ‘अपरान्तायन’ ही दृक्श्राव्य मालिका सुरू केली आहे. काल (दि. ८ मार्च) दुसऱ्या दिवशी ‘संस्कार आणि संस्कृती’ या विषयावर कीर्तनकार सौ. अंजली बर्वे यांच्याशी मसाप चिपळूण शाखेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध कथाकार प्रा. संतोष गोनबरे यांनी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, प्रत्येक धर्मात संस्कार असतात. जगण्याची एक विशिष्ट पद्धती आणि शिस्त या संस्कारांमधून घडत हिंदू धर्मानुसार सोळा संस्कार प्रमुख आहेत. छोट्या छोट्या संस्कारांची बेरीज केली, तर प्रमुख बेचाळीस संस्कारांसह शंभराहूनही अधिक संस्कार होतील. पण त्यातील सोळा संस्कार प्रमुख आहेत. गर्भाधानापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही अनेक संस्कार केले जातात. व्यक्ती म्हणून, समाज म्हणून सुसंस्कार घडावेत हा या सर्व संस्कारांचा हेतू असतो. जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे जन्म, बाल्यावस्था, शिक्षण, गृहस्थाश्रम या सर्व टप्प्यांमध्ये कसे वागले पाहिजे, समाजाचा आपण घटक आहोत, याची जाणीव सतत कशी ठेवली पाहिजे, हे संस्कार सांगतात. संस्कार घडविले जात नाही ते होत असतात. लहानपणी आई-वडील संस्कार करतात, पण समाज, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधूनही संस्कार घडत असतात. या संस्कारांमधून अनेक चालीरिती आणि पद्धती पडल्या आहेत. त्यांचाही अभ्यास केला गेला पाहिजे,. आधुनिक काळानुसार संस्कार बदलत असले तरी मानसिकता, एकमेकांविषयी, आपुलकी, सुसंवाद घडविण्याचे काम संस्कार करत असतात.

घरातल्या वयोवृद्धांचा मान राखला पाहिजे, असे जुने संस्कार सांगतात, पण आजकाल मुले, सुना, नातवंडे रोजगाराच्या निमित्ताने गुंतून राहत असतील, तर त्यांना सासूसासरे, आजी-आजोबांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. अशा वेळी वृद्धाश्रम हा चांगला पर्याय आहे. वृद्धाश्रमाचे समर्थन करावे असे नाही, पण तो एक पर्याय असू शकतो, असेही सौ. बर्वे म्हणाल्या.

सौ. अंजली बर्वे यांच्याशी साधलेला संवाद सोबतचा व्हिडीओ पाहता येईल.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply