कवी अॅड. कुवळेकर यांना उदगीरच्या साहित्य संमेलनात निमंत्रण

लांजा : उदगीर येथे या महिनाअखेर होणार असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कविसंमेलनाकरिता येथील कवी आणि साहित्यिक अॅड. विलास कुवळेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

गेली सात वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वक्ते, कथाकार, कवी म्हणून कोकणातील अनेक साहित्यिकांना संधी प्राप्त झाली आहे. यावर्षी उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ या काळात ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असून या संमेलनात अॅड. कुवळेकर कोकणचे प्रतिनिधी म्हणून कविता सादर करणार आहेत. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षपद भारत सासणे भूषविणार आहेत.

कविसंमेलनाकरिता निमंत्रण मिळाल्याबद्दल मसापचे उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, नामवंत कवी अरुण इंगवले, शाहीर राष्ट्रपाल सावंत, कथाकार प्रा. संतोष गोनाबरे यांनी अॅड. कुवळेकर यांचे अभिनंदन केले असून यापुढेही अखिल भारतीय संमेलनात कोकणला असेच प्रतिनिधित्व मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

कुवळेकर यांचे आजवर आठ कवितासंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांनी वृत्तपत्रातून विविध विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या काव्यसंग्रहांना बेळगाव, बुलढाणा, जळगाव, संगमनेर आदी ठिकाणच्या साहित्य संस्थांनी पुरस्कार दिले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची लांजा शाखा सुरू करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply