पनवेल : स्वरमाऊली, गानकोकिळा भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांना त्यांच्या जीवनातील आठवणी जागवत संगीतकोशमय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अखेरचा हा तुला दंडवत
ही सांगीतिक मैफिल पनवेल येथे येत्या शनिवारी (दि. ९ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
पनवेलमधील कांतीलाल प्रतिष्ठान आणि पनवेल संघर्ष समितीने ही विनामूल्य मैफिल आयोजित केली आहे. मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता मैफलीला सुरवात होईल.
भावगंधर्व, पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर हे दीदींच्या आठवणी आणि दीदींनी मराठी, हिंदी व अन्य भाषेतील सिनेमांना दिलेल्या गीतांचा उज्ज्वल इतिहास ऐकवणार आहेत. दीदींच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक खाचखळगे आणि संगीतक्षेत्रातील आकाशाला गवसणी घालताना निर्माण केलेले अवकाश ते रसिकांसमोर ठेवणार आहेत.
या कार्यक्रमातून दीदींना सांगितिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विभावरी आपटे-जोशी, मधुरा दातार, अमेय जोग, प्राची देवल आणि मनीषा निश्चल हे पट्टीचे आणि ख्यातनाम गायक गायकीचा कस लावून रसिकांवर दीदींच्या गीतांची आभाळमाया पसरणार आहेत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून दीदींच्या आठवणी जाणून घेण्यासाठी स्मिता गवाणकर कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
वाद्यवृंद संयोजनाची जबाबदारी संगीत संयोजक विवेक परांजपे पेलतील. त्यांच्या सोबतीला केदार परांजपे, नीलेश देशपांडे, डॉ. राजेंद्र दूरकर, विशाल गंडत्रवार आणि ऋतुराज कोरे वाद्यातून दीदी पेश करणार आहेत.
कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहतील. त्याबाबत पनवेलकर रसिकांना अनोखी भेट देण्याचा प्रतिष्ठानचा सुखद हेतू आहे. त्यामुळे हा कार्यक्रम कुणीही चुकवू नये, दीदींना अखेरचा दंडवत घालण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहावे. लतादीदी मंगेशकर यांच्या चाहत्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याने त्यांनी सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळीसह उपस्थित राहून संगीत रजनीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे.