रत्नागिरी : रत्नागिरीतील रास नृत्यालयाच्या वतीने एक मे रोजी महाराष्ट्रदिनाचं औचित्य साधून अखंड घुंगुरनाद या १२ तासांच्या कथ्थक, ओडिसी, भरतनाट्यम आणि कुचिपुडी या नृत्याविष्काराच्या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

करोना महामारीमुळे दोन वर्षे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. यापूर्वी एकदा रत्नागिरीकरांनी घुंगुरनाद कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आहे. यंदा त्यात कुचिपुडी नृत्याचाही समावेश केला असून ९ ते ६० वयोगटातल्या १५० नर्तक-नर्तिका यामध्ये सहभाग घेणार आहेत. रत्नागिरीतील कलाकारांना बाहेर जाऊन नृत्य सादरीकरणाबाबत योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी या कार्यक्रमाचा उपयोग होणार आहे, अशी माहिती रास नृत्यालयाच्या संचालिका सौ. श्रुती आठल्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय शास्त्रीय नृत्याचे आठ प्रकार आहेत. यापैकी कथ्थक आणि भरतनाट्यमचे प्रशिक्षणवर्ग रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात सुरू आहेत. अन्य प्रकार इथल्या कलाकारांना माहिती व्हावेत, त्यांना मार्गदर्शन मिळावे या हेतूने अखंड घुंगुरनाद कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. कोलकाता येथील नृत्यगुरू तपाश देबनाथ हेसुद्धा यामध्ये सादरीकरण करणार आहेत. सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हा कार्यक्रम विनामूल्य पाहता येणार आहे. दर दीड तासाने वेगवेगळे कलाकार सादरीकरण करणार आहेत. सलग १२ तास घुंगुरांचा नाद थांबणार नाही. यासाठी दर अर्ध्या तासाला विद्यार्थिनींची नियुक्ती करण्यात आली आहे.
गुरुवारपासून (ता. २८) ३० एप्रिलपर्यंत कथ्थक नृत्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नृत्यगुरू कोलकाता येथील तपाश देबनाथ यांनी मार्गदर्शन केले. रत्नागिरीतील नृत्य कलाकारांसाठी ही आगळीवेगळी पर्वणी ठरली. रत्नागिरीसह जिल्ह्यातून आणि पुणे, कणकवली, मालवण, कोल्हापूर, कऱ्हाड येथूनही कलाकार शिबिरात सहभागी झाले. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात शिबिर झाले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड