रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे विशेष पुरस्कारांची घोषणा

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे आरोग्यविषयक विविधांगी पुस्तक लेखनाबद्दल डॉ. शरद प्रभुदेसाई, शतकवीर रक्तदाते मोरेश्वर जोशी, बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रमोद कोनकर, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालिका सीए मुग्धा करंबेळकर यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संघातर्फे देण्यात आली.

विशेष पुरस्कार व गुणवत्ता पारितोषिकांचा वितरण समारंभ अक्षयतृतीयेच्या दिवशी ३ मे रोजी दुपारी ३.३० वाजता संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

डॉ. प्रभुदेसाई बालरोगतज्ज्ञ असून त्यांनी १९८१ पासून वैद्यकीय व्यवसायाला आणि सामाजिक कार्याला रत्नागिरीतून सुरवात केली. आविष्कार या दिव्यांग मुलांच्या संस्थेचे १० वर्षे अध्यक्षपद, सध्या खजिनदारपद सांभाळत आहेत. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे त्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपद सांभाळले आहे. त्यांनी पेशंटचे किस्से, जडणघडण, आदर्श पालकत्व, वैद्यकीय विश्वातील समज-गैरसमज, जरामरण, दास्यातून मुक्ती (अनुवाद) ही पुस्तके लिहिली आहेत. मोरेश्वर जोशी यांनी १९८७ पासून म्हणजे त्यांच्या १८ व्या वाढदिवसापासून नियमित रक्तदानाला सुरवात केली. उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांसाठी आणि शिबिरे व गरजेच्या वेळी त्यांनी रक्तदान केले आहे. यामुळे या रुग्णांचेही प्राण वाचले आहेत. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने ते मदत करतात. ते श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयात वरिष्ठ लिपीक आहेत.

प्रमोद कोनकर १९७७ पासून पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. दै. सकाळमध्ये त्यांनी ३५ वर्षे सेवा बजावली आणि आवृत्तीप्रमुख म्हणून रत्नागिरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते आकाशवाणी जिल्हा प्रतिनिधी म्हणून २००४ पासून कार्यरत आहेत. तसेच विविध वृत्तपत्रांमध्ये कथा व वैविध्यपूर्ण लेखन करतात. साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमासाठी त्यांनी आठ वर्षे अध्यापन केले. एसटी आणि कोकण रेल्वे प्रवाशांच्या समस्या, कोकणातील पर्यटन, पर्यावरण, ग्रामस्वच्छता अभियान, पाणीपुरवठा समस्या आणि उपाय, वनीकरणाचे प्रश्न, कोकणातील शेतीबागायतीची प्रगती, कृषी विद्यापीठाचे नवे संशोधन, स्थानिक राजकारण, पालिका आणि ग्रामपंचायतींच्या समस्या यावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांना कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा दर्पण पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानासंदर्भात जिल्हा स्तरावरचा प्रथम पुरस्कार, राजमाता जिजाऊ स्वावलंबन परस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राज्यस्तरीय पुरस्कार, आकाशवाणीचा पश्चिम भारताचा सर्वोत्कृष्ट संवाददाता पुरस्कार, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा सर्वोच्च मानाचा बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार मिळाला आहे.

सीए मुग्धा करंबेळकर २०११ मध्ये सीएस (कंपनी सेक्रेटरी) आणि २०१३ मध्ये सीए (चार्टर्ड अकाउंटंट) झाल्या. त्या सीए, सीएसचे क्लासेस आणि लॉविषयी मार्गदर्शन करतात. एकांकिका व नाट्यलेखनही करतात. त्यांना संगीत नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयासाठीचे रौप्यपदकही मिळाले आहे. त्यांची अलिकडेच जिल्हा बॅंकेवर तज्ज्ञ संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

पुरस्कार वितरण कार्यक्रमात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील हिंदीच्या प्राध्यापिका डॉ. चित्रा गोस्वामी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या सदस्यांसह पुरस्कारप्राप्त, गुणवंत विद्यार्थी, पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर आणि उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply