आर्थिक, राजकीय, सहकार, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात लीलया भरारी घेणारे अ‍ॅड. दीपक पटवर्धन

आर्थिक, राजकीय, सहकार, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात नवनवीन शिखरं काबीज करणारे अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांचा छप्पन्नावा वाढदिवस २७ मे रोजी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी थोडंसं …
……..

अ‍ॅड. दीपक मनोहर पटवर्धन!
एक अत्यंत साधं-सुधं व्यक्तिमत्त्व! एका सात्त्विक कुटुंबातील सदस्य !
लहानपणापासूनच साधेपणाचे संस्कार आई-अण्णांनी केले परंतु आयुष्याची ध्येयं मात्र उदात्त ठेवली. समाजकारणाचे धडे घरातूनच मिळाले. आई शिक्षिका असल्याने शिस्त आणि तत्त्वनिष्ठा बालपणापासून अंगी बाणलेली. लहानपणापासून जनसंघाचे संस्कार दीपकजींवरती झाले आणि महाविद्यालयीन जीवनात दीपकजींमधील नेतृत्वगुणदेखील ठळकपणे दिसू लागले.

सर्वसामान्य माणसाप्रमाणे दीपकजींनी निमशासकीय नोकरी पत्करली. परंतु ध्येयवेड्या माणसाचं मन सरकारी बंधनात रमत नाही. दीपकजींनी आपलं वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आणि सहकार या क्षेत्रामध्ये आपल्या वकिलीची कारकीर्द सुरू केली. त्यांच्या या कारकिर्दीच्या यशाचा वेलू लवकरच गगनावेरी गेला. सहकार क्षेत्रातील एक उत्तुंग आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व ही दीपकजींची एक नवी ओळख जनमानसात रुजू लागली.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची धुरा ३० वर्षांहून अधिक वर्षं दीपकजींच्या समर्थ खांद्यांनी पेलली आहे. अडीच कोटींपेक्षा जास्त ठेवी असणारी आणि अनेकांना रोजगाराच्या संधी देणारी विश्वासार्ह अशी स्वरूपानंद पतसंस्था हा दीपकजींचा ध्यास आहे, श्वास आहे!

भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते ही दीपकजींची ओळख आहेच. याच निष्ठेने आणि त्यांच्यातील प्रगल्भ नेतृत्वगुणांमुळे पक्षप्रमुखांनी त्यांना रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळायला दिली आहे. पक्ष संघटना सामर्थ्यवान करण्याच्या दिशेने दीपकजींची पावलं दमदारपणे मार्गक्रमणा करीत आहेत.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे गेली १५ पेक्षा अधिक वर्षं दीपकजी संचालक आहेत. सहकार क्षेत्रातील राज्यस्तरीय संस्थांचे दीपकजी संचालक सदस्य आहेत. त्याशिवाय अनेक सहकारी पतसंस्थांचे दीपकजी सल्लागार आणि मार्गदर्शकदेखील आहेत.

या सर्व कार्याची पोचपावती आणि दखल राष्ट्रीय स्तरावरदेखील घेण्यात आली आणि म्हणूनच गोवा शिपयार्ड लिमिटेड या भारत सरकारच्या अंगीकृत असलेल्या संस्थेचं स्वतंत्र संचालकपद दीपकजींना देण्यात आलं. आपल्या संचालकपदाचा आपल्याकडील विद्यार्थीवर्गाला कसा उपयोग होईल, याचा विचार करून गोवा शिपयार्ड आणि फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेज यामध्ये केलेला सामंजस्य करार दीपकजींची दूरदृष्टीच दाखवतो.

आर्थिक, राजकीय, सहकार आणि सामाजिक क्षेत्रामध्ये यशाची नवनवीन शिखरं काबीज करतानाच एक हळवं क्षेत्र दीपकजींनी जपलंय ते म्हणजे साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ! रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे दीपकजी अध्यक्ष आहेत. या वाचनालयाच्या माध्यमातून अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रम आकार घेत आहेत. वाचनालय समृद्ध आणि पूर्णपणे आधुनिक करण्यात दीपकजींचा मोलाचा वाटा आहे.

विविध पदं समर्थपणे सांभाळणाऱ्या दीपकजींच्या मनात आपल्या मित्रपरिवारासाठी एक स्वतंत्र स्थान आहे आणि दीपकजींचे चाहतेसुद्धा अनेक आहेत. आज दीपकजींचा वाढदिवस! त्यांच्या विविध क्षेत्रातल्या कार्याला सलाम करण्यासाठी आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठीच हा लेखनप्रपंच!

दीपकजी तुम्हाला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, तुमच्या कार्यकर्तृत्वाची कमान सदैव उन्नत राहो, हीच त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना!

  • आनंद पाटणकर
    रत्नागिरी

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply