महर्षी कर्वे विधवा सन्मान चळवळ

विधवांना समाजात मानाचे स्थान देण्यासाठी आता चळवळ सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाडमधून या चळवळीचा प्रारंभ झाला. त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातही काही गावांनी त्यासाठी पावले उचलले आहेत. सामाजिक समतेचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला होत असलेल्या आजच्या काळात ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी काही कायदे करण्यात आले. मुख्यत्वे ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत तसेच नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्येही महिलांना सत्तेचा ५० टक्के वाटा देण्यात आला. पण विधवा महिला म्हणजे समाजाचा एक अविभाज्य घटक असूनही या घटकावर सातत्याने अन्याय झाला आहे. धार्मिक कार्यात तर विधवांना स्थान दिले जात नाहीच, पण अत्यंत अवमानकारक वागणूक दिली जाते. पुरुषी वर्चस्वाने ही दरी निर्माण केली आहे. पण त्याकरिता महिलांनाही इतके प्रवृत्त केले गेले, त्यांच्या मनीमानसी विधवांना चांगले स्थान देऊ नये, हा विचार इतका ठरविला गेला की, महिलासुद्धा विधवा महिलांना अपशकुनी समजतात. समाजाला लागलेला हा सर्वांत मोठा डाग धुऊन काढण्यासाठी काही गावांनी पुढाकार घेतला आहे. हळूहळू ही सुधारणा गावागावांपर्यंत पोहोचायला हवी पण चांगल्या सामाजिक सुधारणेचा वेग अत्यंत मंद असतो. तो वाढवण्यासाठी काय करता येईल. हे लक्षात घ्यायला हवे.

विधवांना समाजात चांगले स्थान मिळाले पाहिजे, हा विचार मात्र तसा नवा नाही. कोकणात जन्मलेले आणि कोकणातील पहिले भारतरत्न, महिलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचलेले महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी शंभर वर्षांपूर्वी त्यासाठी धाडसी पाऊल उचलले होते. त्यांनी १८९३ मध्ये विधवा विवाहोत्तजक मंडळी स्थापन केली होती. या समितीने विधवांच्या गरजू मुलांना मदत केली आणि त्यांच्या शिक्षणाची काळजी घेतली. विधवांच्या पुनर्विवाहातील अडथळे दूर करण्याचा विचार केवळ व्यासपीठावर मांडण्यासाठी त्यांनी केला नव्हता, तर विधवेशी स्वतः पुनर्विवाह करून त्यांनी आपल्या विचाराला कृतीची भरभक्कम जोड दिली होती. पुढे १८९८ मध्ये कर्वे यांनी पुण्यात महिलाश्रम सुरू केला. तेथे १९०७ मध्ये महिला विद्यालय सुरू केले. विधवा गृह आणि महिला विद्यालयासाठी कामगारांना प्रशिक्षण देणारी स्वयंसेवी संस्थाही सुरू करण्यात आली. पुढे नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापनाही कर्वे यांनी केली. स्त्री स्वातंत्र्य, सामाजिक समता, जातीविरहित समाज आणि राष्ट्रीय शिक्षणाचे समर्थन महर्षींनी केले. अशा लोकोत्तर कार्यासाठी त्यांना १९५८ साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी विधवांच्या सन्मानाचा विचार मांडूनही विधवांना समाजात चांगले स्थान मिळाले पाहिजे, हा महर्षी कर्वे यांचा विचार आजही अमलात येऊ शकला नाही, ही दुर्दैवी बाब आहे. आता काही गावांनी त्यासाठी पुढाकार घेतला ही बाब स्तुत्य आहे, पण या विचाराचे उद्गाते भारतरत्न कर्वे यांचे स्मरण त्यानिमित्ताने केले पाहिजे. विधवांच्या सामाजिक स्थानासाठी धडपडणाऱ्या आताच्या सर्व संस्था-संघटनांनी ग्रामपंचायती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांसह सामाजिक संस्थांनी हे स्मरण आवर्जून केले पाहिजे. विधवेशी पुनर्विवाह करण्यासारखे धाडसी पाऊल सव्वाशे वर्षांपूर्वी टाकणाऱ्या कर्वे यांना किती प्रचंड मानहानीला तोंड द्यावे लागले असेल, याचाही विचार करायला हवा. त्या तुलनेत आजची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पारतंत्र्यातून आपण स्वातंत्र्यामध्ये आलो आहोत. आपल्याकडील व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित आहे. त्यामुळे विधवा पुनरुत्थानाची चळवळ वेगाने फोफावायला काहीच हरकत नाही. पण इतिहास लक्षात ठेवला, तर पुढे जायला मोठे बळ मिळत असते. म्हणूनच महर्षी कर्वे यांची आठवण ठेवून या चळवळीला त्यांचे नाव द्यायला हवे. त्यासाठीसुद्धा कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २७ मे २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply