ग्रामपंचायतीचे लोकजैवविविधता संकेतस्थळ : देशातील पहिला प्रयोग कोकणात

राजापूर तालुक्यातील अणसुरे ग्रामपंचायतीने अणसुरे जैवविविधता या नावाच्या लोकजैवविविधता संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. असे संकेतस्थळ विकसित करणारी अणसुरे ग्रामपंचायत देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. त्याची दखल महाराष्ट्र राज्य जैवविविधतता महामंडळाने घेतली. आंतरराष्ट्रीय जैवविविधतता दिवसाचे औचित्य साधून अणसुरे ग्रामपंचायतीचा विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारी ग्रामपंचायत म्हणून गौरव केला. त्यानिमित्ताने या गावाने राबविलेल्या प्रयोगाविषयी.

………………………………..

भारतात २००२ साली एक कायदा अस्तित्वात आला – ‘जैविक विविधता कायदा २००२’. या कायद्याला पार्श्वभूमी होती १९९२ साली रिओ दि जानेरिओ येथे भरलेल्या कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी (सीबीडी) ची. या कायद्यातली एक तरतूद अशी आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या गावाची लोकजैवविविधता ‘नोंदवही’ (पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर – पीबीआर) तयार करावी. या नोंदवहीत गावातल्या वनस्पती-प्राण्यांच्या प्रजाती, त्यांच्याबद्दल लोकांना असलेले पारंपरिक ज्ञान, लोकजीवन आणि जैवविविधता यांचा संबंध, गावातल्या महत्त्वाच्या परिसंस्था आणि अधिवास यांची पद्धतशीरपणे नोंद करणे अपेक्षित आहे. परंपरागत ज्ञानाला कायदेशीर संरक्षण मिळावं आणि जैवविविधता संरक्षण-संवर्धनाच्या योजना गाव पातळीवर तयार करता याव्यात या उद्देशाने ही संकल्पना आणली गेली.

भारतातल्या विपुल जैवविविधतेचं संवर्धन आणि संरक्षण करणं, त्यातील घटकांचा संतुलित वापर करणं, तसंच जैविक स्रोतांतून मिळणाऱ्या फायद्याचं योग्य आणि सम प्रमाणात वाटप करणं या मूळ उद्दिष्टातून जैविक विविधतेचा कायदा २००२ साली अस्तित्वात आला.

भारतातली हळद, बासमती तांदळाचं पीक आणि अशा अनेक पारंपरिक जैविक संसाधनांवर स्वामित्व हक्क सांगण्याचा प्रयत्न अमेरिकेसह काही देशांनी केला होता; परंतु भारताने परदेशात कायदेशीर लढा देऊन आपले स्वामित्व हक्क अबाधित राखण्यात यश मिळवलं. भारतातले जैविक घटक, तंच त्या घटकांबद्दलची पारंपरिक माहिती परदेशात नेऊन त्याचं स्वामित्व मिळवण्यावर आता या कायद्याने नियंत्रण आणलं आहे. शोधप्रकल्पांसाठी परदेशी व्यक्तींना तसंच परदेशी व्यक्तींशी संबंधित भारतीय संस्थांना जैवविविधतेच्या अभ्यासासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी आणि केंद्र सरकारने आखलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं अवलंबन करणं आवश्यक आहे.
कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर ‘राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण’, राज्य स्तरावर ‘राज्य जैवविविधता मंडळ’ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर ‘जैवविविधता व्यवस्थापन समिती’ अशी त्रिस्तरीय रचना केलेली आहे.
राज्यातल्या व्यवस्थापन मंडळाकडे त्या त्या राज्यातल्या जैवविविधतेशी संबंधित संसाधनांचा भारतीय नागरिकांकडून होणारा व्यावसायिक वापर आणि जैविक सर्वेक्षण अथवा जैविक वापर नियंत्रित करण्याचे अधिकार आहेत. स्थानिक व्यवस्थापन समितीकडे कक्षेतील जैवविविधतेचं जतन आणि संरक्षण करणं, तसंच संतुलित वापर आणि जैवविविधतेशी संबंधित सर्व माहिती एकत्रित करण्याची जबाबदारी आहे.

हा कायदा आल्यापासून काही गावांमध्ये याची चांगली अंमलबजावणी झाली आहे. तर बहुतांश गावांपर्यंत अजून ही संकल्पना पोहोचलेलीच नाही. अनेक गावांमध्ये हे काम एक प्रशासकीय औपचारिकता म्हणून उरकून टाकलं जातं. मध्यंतरी राष्ट्रीय हरित लवादाने अमुक अमुक तारखेपर्यंत सगळ्या गावांतल्या जैवविविधता नोंदवह्या तयार ठेवाव्यात, असा आदेश काढल्यामुळे कुठल्यातरी संस्थेला कंत्राट देऊन भराभर जैवविविधता नोंदवह्यांचे रकाने भरणं, एकमेकांची पीबीआर कॉपीपेस्ट करणं असे प्रकार वाढले. आजही हे काम गांभीर्याने केलं गेल्याची काही हाताच्या बोटांवर मोजण्यासारखी उदाहरणं भारतात आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या अणसुरे (ता. राजापूर) या गावाने केलेला ‘लोकजैवविविधता संकेतस्थळ’ हा एक आगळावेगळा प्रयोग विशेष उल्लेखनीय ठरतो. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च’ (आयसर) -पुणे येथे दि. २२ मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात या संकेतस्थळाचं उद्घाटन झालं. संकेतस्थळाच्या रूपात लोकजैवविविधता नोंदवही तयार करणारं अणसुरे हे भारतातलं पहिलं गाव ठरलं आहे.

आजचे युग हे डिजिटल मीडियाचं युग आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. आपल्या गावात काय जैवविविधता आहे, याची माहिती ऑनलाइन स्वरूपात संकलित करता येईल, ती कायमस्वरूपी जतन होईल आणि कधीही अपडेट करता येईल आणि कोणालाही ती स्मार्टफोनवरून सहज बघता येईल, या उद्देशाने गावाच्या जैवविविधतेची वेबसाइट करायची कल्पना सुचली. ही कल्पना ग्रामपंचायतीत बोलून दाखवली आणि गावचे सरपंच रामचंद्र कणेरी आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत यांनी ती लगेच उचलून धरली. “तुम्ही वेबसाइटचं काम सुरू करा . आपण काय लागेल ते सहकार्य करू’ असा धडधडीत पाठिंबा त्यांनी दिला.

वेबसाइटच्या तांत्रिक कामाची जबाबदारी ग्राममित्र मंदार परांजपे याने आनंदाने स्वीकारली. तेव्हापासून गावाचा एकेक भाग ठरवून फिरणं, वनस्पती, प्राण्यांचे फोटो काढणं, तज्ज्ञांकडून त्यांची नावं ओळखून घेणं, गावातल्या लोकांशी बोलून त्यांच्याबद्दल माहिती मिळवणं हा उद्योग सुरू झाला. आपल्याच परिसरात काय आहे, हे आपल्यालाच माहीत नसतं आणि जेव्हा ते कळतं तेव्हा होणारा आनंद विलक्षण असतो. गावातले अनेक लोकही उत्साहाने माहिती देत होते.

अणसुरे गाव खाडीकिनाऱ्याने वेढलेलं असल्यामुळे माशांची नोंद हा एक महत्त्वाचा भाग होता. त्याकामी आशीष पाटील या उत्साही तरुणाने चांगली मदत केली. त्याच्याकडे चाळीसएक माशांच्या फोटोंचा संग्रह होता. ते सगळे त्याने दिले आणि त्यांची माहितीही दिली. दर्शन पंगेरकर या मित्राने खेकड्यांचे फोटो काढून दिले. आडिवऱ्यातले ज्येष्ठ मित्र सुहासकाका गुर्जर यांनी गावात येऊन मोठ्या कॅमेऱ्याने पक्ष्यांचे फोटो काढून देण्याचं काम आवडीने घेतलं. रत्नागिरीचे भूगोलाचे अभ्यासक श्रीवल्लभ साठे यांनी त्यांचं ज्ञान वापरून गावाचा अतिशय पद्धतशीर असा नकाशा तयार करून दिला. वनस्पतींच्या नावांची ओळख करून देण्याच्या कमी अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने मदत केली.


असं काम करत करत आज एक वर्षानंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या अणसुरे गावाचं ‘लोकजैवविविधता संकेतस्थळ’ तयार झालं आहे. महाराष्ट्र जैवविविधता मंडळाचे सदस्य डॉ. राहुल मुंगीकर आणि डॉ. अपर्णा वाटवे यांच्याबरोबर गुगल मीट करून त्यांना वेबसाइटचं प्राथमिक काम दाखवलं. हे काम बघून खूष होऊन त्यांनी बोर्डाकडे असा प्रस्ताव मांडला की २२ मे रोजी आयसर – पुणे इथं आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात या वेबसाइटचं उद्घाटन केलं जावं. या प्रस्तावाला मान्यता मिळून अखेर एका मोठ्या व्यासपीठावर या लोकजैवविविधता संकेतस्थळांचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली. हा एक अपूर्व योग होता. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, अनेक पर्यावरणतज्ज्ञ, महाराष्ट्राच्या विविध भागांत काम करणारे निसर्गदूत या कार्यक्रमाला उपस्थित होते.

गुगलवर www.ansurebmc.in असं सर्च केल्यानंतर ही वेबसाइट ओपन होते. अणसुरे गावाच्या पश्चिम टोकाला एक पीर आहे आणि पूर्व टोकाला एक दुर्गादेवीचं देवस्थान आहे. ही गावाची पारंपरिक सांस्कृतिक आणि भौगोलिक हद्द असल्यामुळे वेबसाइटचं शीर्षक ‘दर्यापीरापासून दुर्गादेवीपर्यंत’ असं ठेवलंय. मुखपृष्ठावर गावाच्या जैवविविधतेचे १२ प्रकार दिसतात. यापैकी कुठल्याही प्रकारावर क्लिक केल्यावर त्या प्रकारातल्या प्रजातींची फोटो आणि नावांसहित यादी ओपन होते. यापैकी कुठल्याही प्रजातीवर क्लिक केल्यावर त्या प्रजातीची थोडक्यात माहिती असणारं पान उघडतं. ही सगळी माहिती ही ‘स्थानिक’ आहे. यामध्ये त्या प्रजातीचा लोकजीवनाशी कसा संबंध आहे, हे प्राधान्याने दिलेलं आहे.
‘लोकजैवविविधता नोंदवही’ म्हणजे नुसती गावातल्या वनस्पती-प्राण्यांच्या प्रजातींची नोंद करत जाणं नव्हे, तर लोकजीवनाचा आणि जैवविविधतेचा संबंध काय आहे, याची नोंद करणं इथे महत्त्वाचं आहे. उंडिलापासून कडू तेल काढण्याचा घाणा, पांगाऱ्याचं लाकूड तळाशी घालून बांधलेली ६० वर्षांची जुनी विहीर, निवडुंगाचा खत म्हणून केला जाणारा उपयोग, असं स्थानिक ज्ञानाचं संकलन या वेबसाइटवर केलेलं आहे आणि अधिक माहितीसाठी उपयुक्त संदर्भ लिंक्स दिल्या आहेत. एखाद्या झाडाबद्दल मराठी विश्वकोशात अथवा अन्य कुठल्या वेबसाइटवर माहिती असेल तर त्याची लिंक त्याठिकाणी दिलेली आहे, जेणेकरून वाचक त्या वनस्पतींबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात. ‘प्राणी प्रजाती’, ‘अळंबी प्रजाती’, आणि परसबाग वनस्पती याठिकाणी फक्त फोटोंचा संग्रह केला आहे. त्यांतल्या प्रजातींची माहिती अशी दिलेली नाही. जसजसा अभ्यास वाढत जाईल तसतशी माहितीदेखील नोंदवली जाईल.

‘अणसुरेविषयी’ या पेजवर गावाची सर्वसाधारण माहिती दिली आहे. रत्नागिरीचे भूगोलाचे अभ्यासक श्रीवल्लभ साठे यांनी गावाचा एक पद्धतशीर नकाशा तयार करून दिला. गुगल मॅप्सवर दाखवलेला गावाचा नकाशा चुकीचा आहे. वेबसाइटवर प्रकाशित केलेला नकाशा हा ‘गुगल अर्थ प्रो’, ‘क्यूजीआयएस’ अशी सॉफ्टवेअर्स वापरून तयार केलेला आहे. यामध्ये गावातले मुख्य रस्ते, जलप्रवाह, शेती क्षेत्र, कांदळवन पट्टा, सड्यांचं क्षेत्र, खाडी क्षेत्र अशी सगळी भूरूपं वेगवेगळ्या रंगाने दाखवलेली आहेत. गावात शेतमळ्यांचं क्षेत्र किती आहे, ते एकूण गावाच्या किती टक्के आहे, असे अभ्यास या नकाशावरून करता येतात.

या वेबसाइटवरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘विशेष नोंदी’. या भागाचं डिझाइन ग्रामभगिनी स्वप्नाली देसाई हिने उत्तम प्रकारे करून दिलं. वनस्पती-प्राण्यांच्या प्रजाती जवळच्या गावांमध्ये, किंवा एका जैवभौगोलिक प्रदेशात सारख्याच असतील. पण मग गावाच्या संदर्भातल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी काय आहेत, त्या सगळ्याची नोंद या भागात केली आहे. ‘आखेऱ्यातला गिमवस’, ‘कुसुंबाची राई’, गावातील पारंपरिक पाणवठे, गावाची पर्जन्यदैनंदिनी, वाकीचा वहाळ अशा गावातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची माहिती या विशेष नोंदींमध्ये दिली आहे. अशा प्रकारे हे लोकजैवविविधता संकेतस्थळ माहितीने समृद्ध होतंय आणि यापुढे होत राहील. ज्यांना आपल्या गावात हे काम सुरू करायचंय, त्यांना ही वेबसाइट एक संदर्भ म्हणून नक्की उपयोगी पडेल.

कोकणात या कामाला भरपूर वाव आहे आणि हे करण्याची गरज आहे. कोकणात सगळ्याच गावांमध्ये ही एक व्यापक चळवळ होण्याची जरुरी आहे. कोकण हा विपुल जैवविविधतेने नटलेला पश्चिम घाटाचा एक अविभाज्य भाग आहे. अनेक व्यक्ती/संस्था हा समृद्ध वारसा टिकवण्यासाठी खासगी पातळीवर स्तुत्य प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना जर पीबीआरशी जोडून घेतलं तर त्याला एक शासनमान्यता मिळेल. अणसुरे ग्रामपंचायतीने केलेला हा प्रयोग सर्वांसाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल.

  • हर्षद तुळपुळे,
    अणसुरे, ता. राजापूर,
    जि. रत्नागिरी
    (संपर्क : ९४०५९५५६०८ )

(हा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या २७ मे २०२२ रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply