सर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग २ – आर्थिक

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेल्या विचारांना, त्यांच्या कृतींना समाजात प्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या विचाराची पार्श्वभूमी कशी होती, याचा आढावा घेणाऱ्या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण सावरकरांचे सामाजिक इम्युनिटीबद्दलचे विचार पाहिले. आजचा दुसरा भाग आर्थिक इम्युनिटीबद्दलच्या विचारांचा…
…..
कुटुंब असो किंवा देश, त्याचा कारभार चालवायचा असेल, तर बाह्य घटकांवरचं अवलंबित्व कमीत कमी हवं आणि आर्थिक स्थिती चांगली असणं आवश्यक असतं. या दोन्ही गोष्टींच्या अनुषंगाने सावरकरांनी मांडलेला स्वदेशीचा विचार महत्त्वाचा आहे. सावरकरांनी १९०५ साली पुण्यात विदेशी कापडांची होळी केली, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तेव्हा ते फक्त २२ वर्षांचे होते. त्यांची तेव्हाची ती कृती अचानक घडलेली नव्हती. त्यासाठीच्या विचारांची बैठक खूप आधीपासूनच तयार झालेली होती. १८९८ साली म्हणजे फक्त १५ वर्षांचे असताना त्यांनी नाशिकमध्ये ‘स्वदेशीचा फटका’ या नावाने एक रचना केली होती. आपल्या देशात खूप चांगल्या दर्जाचं कापड उपलब्ध होणं शक्य असताना विदेशी कापडं घेऊन आपण आपलंच नुकसान करतो आहोत, अशा आशयाच्या त्या फटक्यातून सावरकरांनी चांगलंच फटकारलं होतं.

‘आर्यबंधू हो उठा’ अशा शब्दांनी त्या फटक्याची सुरुवात होते. काश्मीरच्या शाली आणि नागपूरच्या रेशमासारखी संपत्ती आपल्याकडे असताना हलक्या प्रतीची विदेशी कापडं घेण्याचा मूर्खपणा का करता, असा सवाल करताना ते म्हणतात –

काश्मीराच्या शाली त्यजुनी अलपाकाला कां भुलतां
मलमल त्यजुनि वलवल चित्तीं हलहलके पट कां वरितां?

नागपूरचे रेशीम भासे तागपटासें परि परक्या
रठ्ठ बनाती मठ्ठ लोक हो मऊ लागती तुम्हां कश्या?

आपल्याकडे पूर्वीपासून सगळ्या कला होत्या आणि आता विदेशी कापडामुळे आपण त्या परंपरेला कलंक लावतो आहोत, असं सांगताना सावरकर म्हणतात –

अरे अपणची पूर्वी होतों सकल कलांची खाण अहा
भरतभूमीच्या कुशीं दीप ते कलंक आता अम्ही पहा

शेवटी, सगळ्यांनी एकत्र येऊन, विदेशी कापड नाकारून देशी उद्योगधंद्यांना चालना देऊन पुन्हा संपन्न होऊ या, असं आवाहन करताना सावरकरांचे शब्द असे आहेत –

याला आतां उपाय बरवा एकी करवा मन भरवा
ओतप्रोत अभिमानें हरवा देशी धंदे पट धरवा

द्रव्यखाणि ही खोरें घेऊनि परकीं पोरे खणती रे
एकचित्त या करूं गड्यांनो वित्त जिंकुं तें पुनरपि रे

रत्नागिरीतून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक बलवंतमध्ये ९ जून १९२५ रोजी लिहिलेल्या पत्रात सावरकरांनी रत्नागिरीच्या अनुषंगाने स्वदेशीवर भाष्य केलं आहे. त्या पत्राच्या सुरुवातीला त्यांनी लिहिलंय, की ‘थोडी जास्त किंमत मोजावी लागली, तरी स्वदेशीचं व्रत का पाळायचं, याबद्दल लहानपणासून लिहून लिहून लेखण्या झिजून गेल्या नि ऐकणाऱ्यांचे कानही किटून गेले आहेत. तरीही कोणाला त्याबद्दल शंकाच असेल, तर त्यांना बाजूला ठेवू आणि ज्यांचा स्वदेशी वापरण्याबद्दलचा निर्णय पक्का झालाय, त्यांच्यापुरताच विचार इथे करू.’

ज्यांच्या मनात किंतु-परंतु असतील, त्यांना अशा प्रकारे रोखठोकपणे बाजूला सारून, आपल्या मूळ विषयाला सावरकरांनी पत्रात हात घातला आहे. पूर्वी स्वदेशी वस्तू तयारच होत नसत; मात्र आता अनेक वस्तू देशात तयार होतात नि त्या परदेशी वस्तूंइतक्याच टिकाऊ आणि सुबक असतात. तरीही त्या न घेणं म्हणजे निर्लज्जपणाचा कळसच आहे, असंही त्यांनी लिहिलंय.

आर्थिक झळ सोसून स्वदेशी वस्तू घेण्याची अनेकांची तयारी असली, तरी अनेक ठिकाणी त्या उपलब्ध होत नसल्याची अडचणही सावरकरांनी बरोबर हेरली आहे. त्यामुळे या पत्रातून त्यांनी या अडचणीकडे रत्नागिरीतल्या व्यापाऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. रत्नागिरीत पूर्वीपासून अनेक जण शक्य तेव्हा स्वदेशीचा निश्चय पाळतात, हे त्यांच्या स्वतःच्या लक्षात आल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे; मात्र स्थानिक बाजारात स्वदेशी वस्तूंच्या दुकानांचा अभाव ही अडचण असल्याचं ते लिहितात. दैनंदिन व्यवहारात लागत असलेल्या अनेक छोट्या-मोठ्या वस्तू आता स्वदेशी तयार होत असल्याने सर्व प्रकारच्या स्वदेशी वस्तू ठेवणारी एक किंवा अनेक भांडारं सुरू करण्याची गरज सावरकरांनी व्यक्त केली आहे. तसंच, मुंबई-पुण्यात तशी व्यवस्था असल्याने हजारो रुपयांची उलाढाल होते आणि अशोक स्टोअरसारख्या संस्थेत युरोपीयन लोकही स्वदेशी माल विकत घेत असल्याचं त्या स्टोअरच्या व्यवस्थापकाने आपल्याला सांगितल्याचं त्यांनी त्या पत्रात लिहिलं आहे.

विदेशी कापडांची होळी

अशी दुकानं रत्नागिरीतही व्हायला हवीत; मात्र त्यासाठी भांडवल जमवून कोणी तशी विशेष दुकानं सुरू करीपर्यंत असलेल्या दुकानदारांनी शक्य तितक्या स्वदेशी वस्तू आणून विकायला हव्यात, असं सावरकर सुचवतात. यातून दुकानदारांचं नुकसान अजिबात होणार नाही आणि स्वदेशीच्या प्रचाराचं पुण्य त्यांच्या पदरात पडेल. एका दुकानदाराला सगळ्या वस्तू आणता येणं शक्य नाही. त्यामुळे व्यापारी मंडळाने एकमेकांशी समन्वय साधून प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या स्वदेशी वस्तू आपापल्या दुकानात ठेवल्या, तर संपूर्ण रत्नागिरीत आवश्यकतेच्या सर्व स्वदेशी वस्तू उपलब्ध होऊ शकतील. दुकानदारांनी ग्राहकांना दुकानातल्या स्वदेशी वस्तू कोणत्या हे प्रामाणिकपणे सांगून इतर वस्तूंइतकाच फायदा त्यावर घेऊन त्याचं मूल्य ठरवावं, असं सावरकरांनी सुचवलं आहे.

स्वदेशीच्या प्रचार-प्रसारासाठी काम करत असताना देशाच्या बाजारपेठेतली स्वदेशी वस्तूंची उपलब्धता, मुंबई-पुण्यासारख्या शहरातली स्थिती, रत्नागिरीसारख्या छोट्या शहरात असलेली परिस्थिती, ग्राहकांच्या गरजा आणि मानसिकता, व्यापाऱ्यांना झळ न सोसता काय करता येऊ शकेल, अशा सर्व बाजूंचा विचार आणि अभ्यास सावरकरांनी केला असल्याचं यातून आपल्याला दिसतं. एवढ्यावरच ते थांबलेले नाहीत. रत्नागिरीत कोणाच्या दुकानात कोणत्या स्वदेशी वस्तू उपलब्ध आहेत, याचीसुद्धा सविस्तर माहिती त्यांनी त्या पत्रात दिली आहे. म्हणजे रत्नागिरीतल्या कोणालाही एखादी वस्तू स्वदेशीच खरेदी करायची असेल, पण ती रत्नागिरीत मिळतच नाही, असं त्याला वाटत असेल तर अशा व्यक्तींसाठी ‘रेडी टू यूज’ अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळ्या दुकानांत जाऊन चौकशी करण्याची गरजच उरणार नाही, याची काळजी त्यांनी यातून घेतली आहे. त्याकरिता सावरकरांनी रत्नागिरीतल्या त्या वेळच्या महत्त्वाच्या दुकानांमध्ये जाऊन त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या स्वदेशी वस्तू, त्याच प्रकारच्या परदेशी वस्तूंच्या तुलनेत स्वदेशी वस्तूंचा असलेला दर्जा, त्यांच्या किमती, ते दुकानदार आणखी कोणत्या स्वदेशी वस्तू ठेवू शकतील अशा मुद्द्यांवर दुकानदारांच्या जणू मुलाखतीच घेतल्या. त्यातून हाती आलेली माहिती त्यांनी पत्रातून प्रसिद्ध केली. दुकानदारांना चांगल्या दर्जाच्या कोणत्या स्वदेशी वस्तू कुठून आणता येतील, हेही त्यांची सुचवलं आहे. त्या वेळी आजच्यासारखा सोशल मीडिया नव्हता; पण उपलब्ध असलेल्या माध्यमाचा पुरेपूर प्रभावी वापर त्यांनी स्वदेशीच्या ब्रँडिंगसाठी अशा प्रकारे केला.

रत्नागिरीतल्या विठोबाच्या देवळाजवळच्या श्री. देशमुख यांच्या दुकानाचा, तसंच श्री. गोखले, श्री. मुकादम यांच्या दुकानांचा उल्लेख सावरकरांनी त्या पत्रात केला आहे. कागद-पेने, शाई, खेळण्यांपासून कापडापर्यंत, साबणांपासून चिनी मातीच्या भांड्यांपर्यंत आणि साखरेपासून मेणबत्त्यांपर्यंत कुठे कोणत्या स्वदेशी वस्तू मिळतात, हे त्यांनी त्यात लिहिलं आहे.

साखर, बटणं, मेणबत्त्या, कुलपं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नित्योपयोगी स्वदेशी वस्तूंच्या रत्नागिरीतल्या उपलब्धतेबाबत सावरकरांनी लिहिलं आहे. एवढ्या वस्तू जरी आपण स्वदेशी वापरल्या, तरी रत्नागिरीतून दर वर्षी किमान १० हजार रुपये परदेशात जाण्यापासून वाचतील, असा हिशेब त्यांनी मांडला आहे.

रत्नागिरीत हिंदूसभेचा मेळा जनजागृतीसाठी फिरत असे. दिवाळीत परदेशी फटाक्यांसारख्या विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा संदेश त्यातून दिला जात असे. त्यासाठी सावरकरांनी ‘दिपवाळीचे लक्ष्मीपूजन’ अशी एक रचना १९२५ साली केली होती.

लक्ष्मीपूजन करूं घरोघर आम्हीं जरि भावें
प्रसन्न पूजेने ना होतां लक्ष्मी रागावे

अशा ओळीने सावरकरांनी या रचनेची सुरुवात केली आहे. साबण, तेलं, रेशमी कपडे, साखर असं दिवाळीसाठी लागणारं सगळं साहित्य आपण परदेशातून आलेलंच खरेदी करणार असू, तर लक्ष्मी आपल्याला प्रसन्न कशी बरं होईल, असा सवाल ते या रचनेतून करतात.

अशा रीतिने लक्ष्मी दवडुनि दाराबाहेरी
लक्ष्मीपूजन करीत बसतों आम्ही देवघरीं

या ओळीतून त्यांनी वागण्यातला विरोधाभास दर्शवला आहे.

या रचनेच्या शेवटी ते म्हणतात –

तरी हिंदुंनो घरांत लक्ष्मी आधी आणावी
विदेशीसि ना शिवूं शक्य तों वृत्ती बाणावी
देशी तेलें, देशी साबू, देशी वस्त्राने
देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शस्त्राने
स्वदेशलक्ष्मी पूजूं साधुनि जरि मंगल वेळ
गजान्तलक्ष्मी हिंदुहिंदुच्या दारीं डोलेल!

करोना विषाणूच्या साथीनंतर देश पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल हे दोन नारे दिले आहेत. अनेक क्षेत्रांत आत्मनिर्भरतेच्या दिशेने देशाची चांगली वाटचाल सुरू झाली आहे. एक मार्च २०२० पूर्वी भारतात एकही पीपीई किट तयार होत नव्हतं; पण त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत भारत पीपीई किट्सचा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा निर्माता बनला. करोना प्रतिबंधक लसीकरणात १० महिन्यांत १०० कोटी डोसेस देऊन भारताने मोठा विक्रम केला, हे आपल्याला माहितीच आहे. या लसीकरण कार्यक्रमासाठी प्रामुख्याने भारतात उत्पादित झालेल्या लशीच वापरल्या गेल्या. प्रत्येकाने आपापल्या पातळीवर या विचारांची शक्य तेवढी अंमलबजावणी करणं ही काळाची गरज आहे. सावरकरांचे विचार किती दूरदृष्टीचे होते, याची ही फक्त एक झलक.

  • अनिकेत कोनकर, रत्नागिरी
    ई-मेल : aniketbkonkar@gmail.com

    (या लेखमालेतील पहिला लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. लेखाच्या पुढच्या भागात आढावा घेऊ या सावरकरांनी मांडलेल्या शारीरिक-मानसिक आरोग्याबद्दलच्या विचारांचा. हा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०२१च्या इम्युनिटी विशेष दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता. त्या अंकाचे ई-बुक येथे खरेदी करता येईल.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media