सर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग ४ – ध्येयनिष्ठा, स्त्री-सबलीकरण

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेल्या विचारांना, त्यांच्या कृतींना समाजात प्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या विचाराची पार्श्वभूमी कशी होती, याचा आढावा घेणाऱ्या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण सावरकरांचे सामाजिक इम्युनिटीबद्दलचे, दुसऱ्या भागात आर्थिक इम्युनिटीबद्दलचे, तर तिसऱ्या भागात नागरिकांच्या शारीरिक-मानसिक इम्युनिटीबद्दलचे विचार पाहिले. आजच्या या लेखमालेच्या शेवटच्या भागात पाहू या सावरकरांची प्रतिभाशक्ती, ध्येयनिष्ठा, स्त्री-सबलीकरण आणि अन्य विचार…
……

जाज्ज्वल्य देशाभिमानासोबतच सावरकरांच्या प्रतिभाशक्तीची ताकदही खूप मोठी होती. त्यांच्या कवितांपासून महाकाव्यांपर्यंत आणि चरित्रांपासून नाटकांपर्यंत अशा प्रचंड साहित्यातून त्याची प्रचिती येते. मुंबईत १९३८ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धीचं महत्त्व सांगितलं होतं. वाङ्‌मयाचे वस्तुनिष्ठ आणि रसनिष्ठ असे दोन भाग कल्पून त्या दोन्हींचं विवरण त्यांनी त्या भाषणात केलं होतं. भाषणाच्या अखेरीला त्यांनी ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या,’ असा संदेश दिला होता, असा उल्लेख विश्वकोशात आहे. १९४३ मध्ये सांगलीत भरलेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचेही ते अध्यक्ष होते.

‘हिंदुत्व’ आणि ‘माझी जन्मठेप’ हे दोन ग्रंथ सावरकरांनी त्यांच्या रत्नागिरीतल्या वास्तव्यात लिहिले. अंदमानात प्रचंड हालअपेष्टा सोसत असतानाही त्यांनी ‘कमला’ हे महाकाव्य रचलं. ते छापील स्वरूपात प्रसिद्ध झालं त्यांच्या रत्नागिरीतल्या वास्तव्यातच.

रत्नागिरीत वास्तव्याला असताना सावरकर शिरगाव येथे या घरात राहत होते.

आर्यांच्या अजरामर रचनांसाठी ओळखले जाणारे मोरोपंत आपल्याला माहिती आहेत. त्यांचे वंशज श्री. रा. द. पंतपराडकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत वास्तव्याला असताना १९२६ साली त्यांना एक लोखंडी पलंग भेट दिला. त्याला त्यांनी ‘सुखशय्यापलंग’ असं संबोधलं होतं. तसा उल्लेख असलेली आर्याही त्यांनी लिहून त्यासोबत सावरकरांना दिली.

सावरकरांनी ती भेट स्वीकारली आणि त्या भेटीचा स्वीकार करणारं पत्र त्यांनी आर्याबद्ध स्वरूपातच पंतपराडकरांना पाठवलं. त्यातून सावरकरांची प्रतिभाशक्ती तर दिसतेच; पण काळ्या पाण्यासारखी कठोर शिक्षा भोगूनही आपल्या ध्येयापासून ते जराही विचलित कसे झाले नाहीत, हेही त्यावरून दिसून येतं.

सावरकरांनी लिहिलेल्या आर्येच्या शेवटच्या ओळी अशा होत्या –
हे आंथरुण तोवरि आपण जें अर्पिले उपायनसें
तें ती निद्रा देवो कर्तव्या जीमध्ये अपाय नसे
करण्या पुनरपि युद्धोद्युक्तचि निजवूनि देह हा दमला
ही सुखशय्या उठवो मला रणशय्येसमचि निरपवाद मला

अंदमानातून सावरकरांना १९२१ साली रत्नागिरीत आणलं गेलं असलं, तरी त्यांचा तुरुंगवास १९२४ साली संपला होता. या काळात त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टांमुळे दमलेल्या त्यांच्या देहाला सुखशय्या म्हणजे चांगली झोप मिळावी, म्हणून हा पलंग त्यांना भेट देण्यात आला होता; मात्र सावरकरांनी ही भेट स्वीकारतानाही आपला उद्देश काय आहे हे नेमक्या शब्दांत सांगितलं. राष्ट्राच्या स्वातंत्र्याचं ध्येय प्राप्त होईपर्यंत या पलंगाने रणशय्या देते तितकाच विसावा द्यावा. आजच्या युद्धात दमलेल्या सैनिकाला उद्याच्या युद्धासाठी ऊर्जा मिळावी, एवढीच थोडा वेळ झोप घेता येते. तिलाच रणशय्या असं म्हणतात. ध्येय साध्य होईपर्यंत ही सुखशय्या नव्हे, तर रणशय्याच व्हावी, असा सावरकरांनी लिहिलेल्या आर्येचा आशय आहे. आपलं ध्येय किती निश्चित असावं आणि कोणत्याही क्षणी त्याचा विसर कसा पडू नये, याचा याहून चांगला आदर्श कोणता असू शकतो बरं!

सावरकरांचे वास्तव्य असलेली खोली

महिला सबलीकरणासंदर्भातले विचार
६ जानेवारी १९२४ रोजी स्वातंत्र्यवीरांची जन्मठेपेच्या बंदिवासातून मुक्तता करून त्यांना रत्नागिरीतच स्थानबद्ध करण्यात आलं; मात्र तेवढ्यातच रत्नागिरीत गाठीच्या तापाची साथ आल्यामुळे सरकारने त्यांना काही दिवस नाशिकला जाण्याची परवानगी दिली. जुलै १९२४ मध्ये ते नाशिकला गेले, तेव्हा त्यांचं ठिकठिकाणी स्वागत झालं आणि तिथे त्यांनी भाषणंही केली. त्यात त्यांनी स्वतःवर घातल्या गेलेल्या भाषणबंदीपासून अस्पृश्यांमध्येही असलेल्या अस्पृश्यतेपर्यंतच्या वेगवेगळ्या विषयांवर विचार मांडले. त्यातच त्यांनी स्त्रियांच्या सबलीकरणाचा विषयही एका भाषणात मांडला. त्या भाषणावेळी त्यांच्या पत्नी यमुनाबाईही उपस्थित असल्याचा उल्लेख आढळतो.

त्या भाषणात ते म्हणाले होते, की ‘आजच्या स्त्रियांत मुख्य उणीव धैर्याची आहे. स्त्रियांनी माता विदुलेप्रमाणे आपल्या मुलांना पळून न येता लढण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. रामाने सीतेला वनातील धोके दाखवले, तरी ती त्याच्या समवेत वनवासात गेली. हे धैर्य हवे. झाशीच्या राणीचा पराक्रम हा आपला आदर्श असला पाहिजे.’

पुढे सावरकर म्हणतात, ‘मुलींची अशी समजूत असते, की अशक्तपणा म्हणजे नाजूकपणा नि तो एक कौतुकास्पद गुण आहे; पण ती त्यांची समजूत चूक आहे. सशक्तपणा हेच खरे सौंदर्य. ईश्वरनिर्मित सौंदर्य आपल्या हातचे नाही; पण हे सौंदर्य आपल्या हातचे आहे. परदेशांतील स्त्रिया पुरुषांप्रमाणेच सशक्त असतात. आपल्याकडे त्या अशक्त होत आहेत. याचा वाईट परिणाम पुढील पिढ्यांवर होईल. तो होऊ नये, इकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. पूर्वी जशी त्यांस देवाची गाणी शिकवीत, तशी आता देशाची गाणी शिकविली पाहिजेत. तुम्ही आजची वृत्तपत्रे वाचून देशाची आजची स्थितीसुद्धा समजून घेतली पाहिजे.’

सावरकरांच्या या भाषणातले बहुतांश मुद्दे आजच्या काळातही लागू पडतात. स्त्री-सुरक्षा हा विषय सध्याच्या काळात खूपच ऐरणीवर आला आहे. अनेक वाईट घटना घडत असल्याचं आपण वाचतो, पाहतो. स्त्रिया, मुली अशक्त नव्हे, तर सशक्त असल्या पाहिजेत, हीच आजच्या काळाचीही गरज आहे. तेव्हा सावरकर ते सांगत होते, त्यामागे पुढची पिढी उत्तम निपजावी आणि त्या पिढीने राष्ट्रासाठी उभं राहावं, हाही एक हेतू होता. आजही तो हेतू आहेच; पण आजच्या काळानुसार स्त्रियांनी आधी स्वसंरक्षणासाठी सशक्त होण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी झाशीच्या राणीचा पराक्रमाचा आदर्श घेण्याचा त्यांचा सल्लाही अगदी यथोचित आहे.

१९०२ साली मुंबईच्या हिंदू युनियन क्लबच्या हेमंत व्याख्यानमाला कमिटीने विषय देऊन कविता लिहायची स्पर्धा घेतली होती. त्यात ‘बालविधवा – दुःस्थितीकथन’ या सावरकरांच्या कवितेला संयुक्त प्रथम बक्षीस मिळालं होतं. वाईट प्रथांमुळे स्त्रियांवर ओढवलेली स्थिती या विषयावर सावरकरांचा विचार किती आधीपासून चालू होता, हे यावरून लक्षात येतं.

‘हितकारक सत्य अप्रिय असलं तरी बोललं पाहिजे’

लोकांना न आवडणारे विषय सांगणंही आपलं कर्तव्य असल्याचं स्वातंत्र्यवीर सावरकर मानत. देवरुखमध्ये केलेल्या एका भाषणात ते म्हणाले होते, की ‘मी अस्पृश्यता निवारण, हिंदुसंघटन आदी अप्रिय विषयांवर बोलून आपली लोकप्रियता कमी करून घेऊ नये, असे काही हितचिंतक मला सांगतात. परंतु ते माझे कर्तव्य आहे. कारण खरी राष्ट्रसेवा ज्यास करावयाची आहे, त्यांनी लोकांस प्रिय असो वा अप्रिय असो, परंतु लोकांस जे हितकारक असेल, तेच पुरस्कारिले पाहिजे. लोक मिरवणूक काढतील का धिंड काढतील इकडे डोळा ठेवून जो राष्ट्रहितास अत्यंत अवश्य, अपरिहार्य असलेले तत्त्व नि धोरण धरतो वा सोडून देतो, तो लोकांचा एकनिष्ठ सेवकच नव्हे.’

एकंदरीतच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रखर राष्ट्रवादी विचारांची आजही देशाला गरज आहे. सावरकरांवर विनाकारण टीका आणि घाणेरडे आरोप करणाऱ्या, त्यांच्या देशप्रेमाबद्दल शंका घेणाऱ्या व्यक्तींची सावरकरांना समजून घेण्याची पात्रताच नाही, असंच म्हणावं लागेल. केवळ सावरकरच नव्हे, तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या हितासाठी स्वार्थत्याग करून कोणत्या ना कोणत्या मार्गाने लढलेल्या प्रत्येकाचे विचार आपल्याला आजच्या परिस्थितीतही मार्ग दाखवू शकतात. काळानुसार परिस्थितीत बदल झाला असला, तरी देशहित जपणं हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवलं, तर त्या विचारांची उपयुक्तता आणि त्यांचा अंगीकार आज कशा पद्धतीने करायचा, या गोष्टी आपल्याला कळू शकतात.

आपल्या सुदैवाने सावरकरांनी लिहिलेलं साहित्य आज विपुल प्रमाणात पुस्तक रूपाने उपलब्ध आहे. ते वाचून त्यातून प्रेरणा घेणं शक्य आहे. त्यांच्या साहित्याची विविधता पाहिली की थक्क व्हायला होतं. https://www.savarkarsmarak.com/, https://www.savarkar.org/ या वेबसाइट्सवर सावरकरांचं साहित्य डिजिटल स्वरूपातही उपलब्ध आहे. या लेखमालेत दिलेले काही संदर्भ आणि काही फोटोज या वेबसाइट्सच्या माध्यमातूनच उपलब्ध झाले. मुळात सावरकर हे व्यक्तिमत्त्वच इतकं व्यापक आहे, की सगळं एकदम कवेत घेणं शक्य नाही. तरीही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने त्यांचं स्मरण करण्यासाठी केलेला हा एक अल्पमती प्रयत्न.

सावरकरांनी रत्नागिरीत असतानाच रचलेल्या एका पदाच्या ओळींनी या लेखमालेचा समारोप करतो.

सत्ता अपुली मत्ता अपुली । ही रत्नांची खाण
कुणी हिरावुनि नेऊं बघतां । रक्षूं अर्पुनि प्राण
अमुचा स्वदेश हिंदुस्थान

  • अनिकेत कोनकर, रत्नागिरी
    ई-मेल : aniketbkonkar@gmail.com

    (या लेखमालेतील पहिला लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. दुसरा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. तिसरा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. हा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०२१च्या इम्युनिटी विशेष दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता. त्या अंकाचे ई-बुक येथे खरेदी करता येईल.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply