गेली दोन वर्षं शारीरिक इम्युनिटी अर्थात प्रतिकारशक्तीवर जगभर प्रचंड चर्चा होते आहे. १०० वर्षांपूर्वीच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे विचार मांडले होते, त्यातून त्यांनी देशबांधव आणि भगिनींच्या शारीरिक, मानसिक इम्युनिटीसह देशाच्या सामाजिक आणि आर्थिक इम्युनिटीचाही विचार केला होता, हे जाणवतं. रत्नागिरी ही सावरकरांची कर्मभूमी. त्यांच्या रत्नागिरी प्रवेशाला २०२१मध्ये १०० वर्षं पूर्ण झाली. २८ मे रोजी सावरकरांची जयंती आहे. तसंच, सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. या औचित्याने, सावरकरांनी मांडलेल्या विचारांना, त्यांच्या कृतींना समाजात प्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या विचाराची पार्श्वभूमी कशी होती, याचा आढावा घेणारी ही लेखमाला… आजचा पहिला भाग सामाजिक इम्युनिटीबद्दलचा…
…..
हजारो-लाखो अनाम हातांनी केलेल्या प्रयत्नांतून देशाला मिळालेलं स्वातंत्र्य आपण आज उपभोगतो आहोत. त्या अनाम हातांना आणि त्यांचं नेतृत्व ज्यांनी केलं, त्यांना लढण्यासाठी ज्यांनी उद्युक्त केलं, प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं अशा सर्व वीरांना, क्रांतिकारकांना आणि नेत्यांना वंदन! आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा टप्पा गाठलेला असताना आपण अशा वळणावर आहोत, की स्वातंत्र्यपूर्व काळातले काही मुद्दे, त्या काळातली काही आव्हानं आजही आपल्यासमोर आहेत. भले त्यांचं स्वरूप वेगळं असेल, काळानुसार त्यात काही बदलही झाले असतील, पण त्यातला मूलभूत गाभा तोच आहे. ही आव्हानं आजच अचानक उभी ठाकली असं अजिबातच नाही; पण ती आव्हानं अस्तित्वात आहेत याची जाणीव करोना विषाणूच्या जगद्व्यापी संसर्गामुळे झाली.
आजचं युग जागतिकीकरणाचं आहे. त्यामुळे साहजिकच कोविडसारखा साथीचा रोगही जागतिक व्हायला वेळ लागला नाही. जागतिकीकरणाचे फायदे कोणी नाकारत नाही आणि नाकारूही नयेत; पण करोना संसर्गामुळे टाळेबंदीसारखी अभूतपूर्व परिस्थिती ओढवली, तेव्हा प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर असणं किती महत्त्वाचं आहे, याची प्रखर जाणीव झाली. तीच गोष्ट शारीरिक क्षमतेची. आज ज्याच्या त्याच्या तोंडी इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारशक्ती हा शब्द आहे. शिवाय शरीराइतकंच मानसिकदृष्ट्या कणखर असणंही किती महत्त्वाचं आहे, हेही आपल्याला उमगलं आहे. या गोष्टी आतापर्यंत कोणाला माहिती नव्हत्या असं अजिबातच नाही; पण त्या किती महत्त्वाच्या आहेत, याची जाणीव जिवंत करण्यासाठी दुर्दैवाने करोना यावा लागला. देश म्हणून आपल्याला पुढे जायचं असेल, प्रगती करायची असेल, तर शक्य त्या प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबन आणि शारीरिक, तसंच मानसिकदृष्ट्या खंबीर असलेले नागरिक यांची नितांत आवश्यकता आहे.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. शत्रूला तोंड देण्यासाठी बलोपासनेचं महत्त्वही अधोरेखित केलं गेलं. प्रचंड शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याच्या जोरावरच कित्येक क्रांतिकारकांनी ब्रिटिशांशी लढा दिला, तुरुंगवासातल्या हालअपेष्टा भोगल्या. आज आपल्याला हातात शस्त्रं घेऊन प्रत्यक्ष युद्धावर जायचं नसलं, तरी दररोज येणारी नवी आव्हानं पाहता वेगवेगळ्या युद्धांना तोंड द्यावंच लागतं. मग ते जवान प्रत्यक्ष युद्धभूमीवर करत असलेलं युद्ध असो किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं असो… या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची, त्यांच्या विचारांची आठवण काढल्याशिवाय पुढे जाता येत नाही. किंबहुना त्यांचे विचार अंमलात आणले तरच आपली पुढची वाटचाल सुकर होऊ शकेल. आज शारीरिक इम्युनिटी अर्थात प्रतिकारशक्तीवर जगभर प्रचंड चर्चा होते आहे. १०० वर्षांपूर्वीच्या काळात सावरकरांनी जे विचार मांडले होते, त्यातून त्यांनी देशबांधवांच्या शारीरिक, मानसिक इम्युनिटीसह देशाच्या सामाजिक आणि आर्थिक इम्युनिटीचाही विचार केला होता, हे जाणवतं. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने त्या विचारांचं स्मरण करणं स्फूर्तिदायी आणि दिशादर्शक ठरू शकेल.
स्वातंत्र्यवीरांनी विचार केला साऱ्या देशाच्या हिताचा. त्यामुळे त्यांच्या विचारांना, कर्तृत्वाला भौगोलिक सीमेत बांधणं शक्य नाही आणि योग्यही नाही; पण रत्नागिरी ही या नररत्नाची कर्मभूमी ठरली. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या ज्या विचारांचा किंवा कृतींचा आदर्श घेण्याची आजही गरज आहे, असा उल्लेख आधी केला, त्यातले अनेक विचार त्यांनी रत्नागिरीत वास्तव्याला असतानाच मांडले होते आणि त्यावर कृती केली होती.
सावरकरांच्या एकंदर चळवळी आणि उपक्रम पाहता ब्रिटिशांच्या दृष्टीने ते सर्वांत मोठे शत्रू होते. त्यामुळे त्यांना दोन जन्मठेपा म्हणजेच तब्बल ५० वर्षांची काळ्या पाण्याची, सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. अंदमानमधली त्यांची शिक्षा चार जुलै १९११ रोजी सुरू झाली. त्या शिक्षेत त्यांनी किती हालअपेष्टा सोसल्या आणि तरीही त्यांचे विचार किती कणखर होते, हे आपण ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकात वाचलं आहेच. नंतर सावरकरांना १६ मे १९२१ रोजी रत्नागिरीतल्या विशेष कारागृहात हलवण्यात आलं. त्यांच्या रत्नागिरी प्रवेशाला यंदा १०० वर्षं पूर्ण झाली. रत्नागिरी हा त्या काळी अतिशय दुर्गम भाग असल्याने सावरकरांसारख्या कैद्यांना ठेवण्यासाठी ब्रिटिशांच्या दृष्टीने ती सुरक्षित जागा होती. सहा जानेवारी १९२४ पासून त्यांना रत्नागिरीतच स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं. जवळपास साडेतेरा वर्षं सावरकरांचं रत्नागिरीत वास्तव्य होतं.
सामाजिक इम्युनिटी
समाजात एकी नसेल, तर देशातले नागरिक शत्रूशी लढण्याऐवजी आपापसांतच भांडत बसतात आणि शत्रूच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीला आपसूकच बळ मिळतं. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सावरकरांनी जातिभेद आणि अस्पृश्यता निवारणासंदर्भातलं कार्य रत्नागिरीत हाती घेतलं. रत्नागिरीतून तेव्हा प्रसिद्ध होणाऱ्या ‘साप्ताहिक बलवंत’मध्ये सावरकरांची काही पत्रं प्रसिद्ध झाली आहेत. त्यात त्यांचे उपक्रम आणि त्या वेळच्या अन्य अनेक घडामोडींचे संदर्भ आढळतात. अस्पृश्यता निर्दालनासाठीचा उपक्रम म्हणून बहुजनांच्या वस्तीत जाऊन सर्व हिंदूंनी महिन्यातून एकदा किंवा दोनदा एकत्रपणे भगवंताचं भजन करण्याचा उपक्रम त्या महिन्यातल्या एकादशीला पहिल्यांदा झाल्याची नोंद २९ एप्रिल १९२५ रोजीच्या साप्ताहिक बलवंतमधल्या आपल्या पत्रात सावरकरांनी केली आहे. ‘अकरणान्मंद करणं श्रेय:’ अर्थात ‘काहीच न करण्यापेक्षा थोडंसं काही तरी करणं नक्कीच श्रेयस्कर’ असं शीर्षक देऊन त्या पत्रात रत्नागिरीतल्या वेगवेगळ्या उपक्रमांचा आढावा सावरकरांनी घेतला आहे. रत्नागिरीजवळच्याच शिरगावातही अस्पृश्योद्धारासाठी झालेल्या तीन छोट्या, पण महत्त्वाच्या उपक्रमांचा उल्लेख आणि कौतुक सावरकरांनी त्यात केलं आहे.
१९२५ सालच्या अखिल हिंदू मेळ्यासाठी सावरकरांनी जातिभेदातला फोलपणा लक्षात आणून देणारी आणि एकीचं महत्त्व सांगणारी अनेक वेगवेगळी पदं रचली होती. एकी झाल्याशिवाय देशात इंग्रजांशी लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही. म्हणूनच एकीची भावना निर्माण होण्यासाठी सावरकरांनी हे विचार मांडले आणि त्यांची अंमलबजावणीही केली.

सावरकरांनी उभारलेलं पतितपावन मंदिर हादेखील खूपच क्रांतिकारी उपक्रम होता. ते मंदिर उभारण्यापूर्वी जनसामान्यांना रत्नागिरीतल्या पुरातन विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा, म्हणून त्यांनी लढा दिला होता. त्यामुळे १९२९ साली बहुजन समाजाच्या नागरिकांना सभामंडपापर्यंत प्रवेश मिळाला होता.
तोपर्यंत अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीतला एक मुलगा त्या वेळी सुमारे तीनेक हजार जणांच्या टाळ्यांच्या गजरात एकेक पायरी चढत श्री विठ्ठलाच्या सभामंडपात येऊन उभा राहिला. सावरकरांनीच रचलेलं एक पद तेव्हा त्या मुलाने म्हटलं होतं.
हे सुतक युगांचे सुटले
विधिलिखित विटाळहि फिटले
जन्मांचें भांडण मिटलें
शत्रूंचे जाळे तुटले
आम्ही शतकांचे दास आज सहकारी
आभार जाहले भारी
या ओळींनी त्या पदाचा शेवट झाला. शतकानुशतकं ज्यांना दास मानलं गेलं, ते आज सहकारी झाल्यामुळे शत्रूचं जाळं तुटणार आहे, हा संदेश सावरकरांनी अगदी यथोचितपणे यातून दिला आहे. शिवाय त्यात आभार दिसत असले, तरी आतापर्यंतच्या अन्यायाचा निषेधही करण्यात आला आहे.
त्यानंतर सामाजिक समतेसाठी स्वतंत्र मंदिर बांधायचं सावरकरांनी ठरवलं. भागोजीशेठ कीर या दानशूर व्यक्तीच्या मदतीने त्या काळी तीन लाख रुपये खर्चून पतितपावन मंदिर बांधण्यात आलं. बहुजन समाजासाठी ते मंदिर खुलं करून त्यांना पूजा-प्रार्थनेचा समान अधिकार देण्यात आला.
‘असलेल्या मंदिरांचं संरक्षण करण्याची शक्ती ज्या जातीत नाही, तिला नवीन देवळे बांधण्याचा अधिकारच उरत नाही. आज अस्पृश्य समाज तेवढा पतित नसून, परतंत्र असलेला, परक्यांचे दास झालेला सारा हिंदू समाजच पतित आहे. ह्या साऱ्या पतित हिंदू राष्ट्राचा जो उद्धार करील, त्यालाच मी खरा पतित-पावन म्हणेन,’ असं सावरकर पतितपावन मंदिराच्या कोनशिला समारंभावेळच्या भाषणात म्हणाले होते. साधूंचा संरक्षक आणि दुष्टांचा निर्दालक म्हणून भगवान विष्णूचं मंदिर उभारायचं ठरवण्यात आल्याचंही सावरकरांनी सांगितलं.

२२ फेब्रुवारी १९३१ रोजी जेव्हा पतितपावन मंदिरात प्रतिष्ठापना झाली, तेव्हा सावरकरांनीच रचलेला पतितपावनाचा धावा म्हटला गेला. त्यात सावरकरांनी जातिभेदाला दैत्याची उपमा दिली आहे. ‘आता आम्ही एकत्र येत असून, आम्हाला लढण्याची शक्ती दे,’ अशी प्रार्थना केली आहे.
निर्दाळुनि त्या आजि भेद-दैत्याशी
ये हिंदुजाति तुजपाशीं
ते अवयव विच्छिन्न सांधिले आजी
तूं फुंकिं जीव त्यामाजी
असा धावा त्यांनी सर्व जातींच्या समाजासह त्या दिवशी पतितपावनाला केला.
रत्नागिरीचेच सुपुत्र असलेल्या लोकमान्य टिळकांनी राष्ट्रभावना चेतवण्यासाठी १८९४ साली गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं. त्यांनी देव्हाऱ्यातला गणपती चौकात नेला असं म्हटलं जातं. तो मोठाच क्रांतिकारी बदल होता. तरुणांनी, नागरिकांनी त्या निमित्ताने एकत्र येऊन काही राष्ट्रोपयोगी विचारांची देवाणघेवाण करावी, हा त्यामागचा उद्देश होता. त्या सार्वजनिक गणेशोत्सवात काळानुसार बदल करण्याचं आवाहन सावरकरांनी केलं होतं. सप्टेंबर १९३५मध्ये ‘किर्लोस्कर’ मासिकात त्यांनी या संदर्भातला लेख लिहिला होता. ‘जन्मजात जातिभेदाच्या ज्या विभेदक प्रथेने आज हे हिंदुराष्ट्र खिळखिळे करून सोडले आहे, त्यास निर्दालून सारे हिंदुराष्ट्र एक जीव, एक जात करण्याच्या कार्यी ह्या राष्ट्रीय महोत्सवासारखा प्रसंग महाराष्ट्रात तरी दुसरा सापडत नाही,’ असं सावरकरांनी त्यात लिहिलं होतं.
‘गणेशोत्सवास लोकमान्यांच्या धुरीणत्वाखाली जे काही राष्ट्रउपयोगी वळण होते, तेही आज बहुधा सुटत चालले आहे,’ असा खेदही त्यांनी त्या लेखात व्यक्त केला होता. सर्व हिंदू समाज एकत्र येण्यासाठी जातिभेद नष्ट करून हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हावा, असं मत त्यांनी मांडलं होतं. महत्त्वाचं म्हणजे त्यात आदर्श म्हणून रत्नागिरीचं उदाहरण सावरकरांनी दिलं होतं.
‘रत्नागिरी येथे आज तीन-चार वर्षे धूमधडाक्याने गाजत असलेल्या अखिल हिंदू गणेशोत्सवासारखा, जातिनिर्विशेषपणे सर्व हिंदूंस ज्यात समानतेने भाग घेता येतो, असा अखिल हिंदू गणेशोत्सव प्रत्येक नगरांतून निदान एक तरी साजरा करावा,’ असं सावरकरांनी त्या लेखात लिहिलं होतं. ‘रुढी मोडायची तर ती स्वतः मोडून दाखविली, तरच मोडते. नुसत्या शब्दांनी ते होत नाही,’ अशी जाणीवही सावरकरांनी करून दिली होती.
आज कायदेशीरदृष्ट्या जातिभेद, अस्पृश्यता वगैरे काही अस्तित्वात नाही; पण समाजात दुही माजवण्याचे, निष्कारण मनं कलुषित करून फूट पाडण्याचे प्रकार कोणत्या ना कोणत्या मार्गाने होत असतात. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाऊ शकतो. त्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे देशाची सुरक्षाही धोक्यात येऊ शकते; पण आपले विचार स्थिर आणि ठाम असतील आणि भेदाभेद मुळात आपल्या मनातच नसेल, तर फूट पाडू इच्छिणाऱ्यांचे मनसुबे कधीच सफळ होणार नाहीत. त्या अर्थाने सावरकरांचे या संदर्भातले विचार समाजविरोधी घटकांविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती मिळण्यासाठी आजही मार्गदर्शक आहेत.
- अनिकेत कोनकर, रत्नागिरी
ई-मेल : aniketbkonkar@gmail.com
(लेखाच्या पुढच्या भागात आढावा घेऊ या सावरकरांच्या आर्थिक विचारांचा. हा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०२१च्या इम्युनिटी विशेष दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता. त्या अंकाचे ई-बुक येथे खरेदी करता येईल.)


3 comments