स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेल्या विचारांना, त्यांच्या कृतींना समाजात प्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या विचाराची पार्श्वभूमी कशी होती, याचा आढावा घेणाऱ्या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण सावरकरांचे सामाजिक इम्युनिटीबद्दलचे, तर दुसऱ्या भागात आर्थिक इम्युनिटीबद्दलचे विचार पाहिले. आजचा तिसरा भाग नागरिकांच्या शारीरिक-मानसिक इम्युनिटीबद्दलच्या विचारांचा…
……
सध्याच्या काळात प्रकर्षाने जाणवत असलेलं एक आव्हान म्हणजे नागरिकांच्या मानसिक आणि शारीरिक कणखरतेचं. जनता सुदृढ नसेल, तर देश प्रगती करू शकत नाही, हे अगदी मूलभूत तत्त्व आहे. करोना विषाणूच्या जागतिक साथीमध्ये ही गोष्ट अधिक स्पष्टपणे समोर आली. आपला भारत आज तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. तरुणाई हे आपल्या देशाचं वैभव आहे. जागतिक पातळीवर आव्हानात्मक स्थिती असताना अनेक प्रगत देशांमध्ये तरुण लोकसंख्येचं तुलनेनं कमी असलेलं प्रमाण हा त्या देशांच्या प्रगतीतला अडथळा ठरला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सुदैवी आणि संपन्न आहे; पण तरुण लोकसंख्येचं केवळ प्रमाण जास्त असून उपयोग नाही, तर ती तरुणाई शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असली पाहिजे. करोना कालखंडात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अशाच कित्येक कणखर तरुणांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सेवाकार्य केलं. जिथे आणि जशा प्रकारच्या मदतीची गरज होती, तिथे ती पोहोचवली. या लढ्यात केवळ तरुणाईच नव्हे, तर सर्वच वयोगटातल्या योद्ध्यांचा सहभाग होता; पण त्यात तरुणांचा सहभाग लक्षणीय होता, ही समाधानाची बाब. काही तरुण डॉक्टर्सनी तर अत्यवस्थ रुग्णांना प्रसंगी तोंडाने श्वास देण्याचं सर्वच दृष्टीने परीक्षा पाहणारं कामही निर्भयपणे केल्याची उदाहरणं आहेत; पण दुसऱ्या बाजूला अनेक तरुणांना किंवा तरुणांपेक्षा थोड्या मोठ्या असलेल्या मध्यम वयातल्या व्यक्तींना रोगप्रतिकारशक्ती कमी पडल्यामुळे प्राणही गमवावे लागले.
आजच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये वेगवेगळ्या शारीरिक व्याधींचं आणि मानसिक विकारांचं प्रमाण वाढत असलेलं आपल्या आजूबाजूलाही आपल्याला सहज दिसतं. सगळी जनताच सुदृढ असली पाहिजे; पण त्यातल्या त्यात तरुणांनी आपल्या सुदृढतेसाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. कारण त्यांच्या खांद्यावर केवळ त्यांच्या कुटुंबाची नव्हे, तर साऱ्या देशाचीच जबाबदारी आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत होते, तेव्हा त्यांनी तरुणाईची सुदृढता हाच मुद्दा घेऊन विचार मांडले होते. १९२६ साली तरुणांना उद्देशून रचलेल्या ‘जा झुंज’ या कवितेत ते म्हणतात –
निजजाति-छळानें हृदय कां न तळमळतें?
तुम्हि तरुण शिरांतुनि रक्त नवें सळसळतें
हें नवे रक्त तों विजेहुनि पेटावें
मृत्यूसि तुम्ही गाठून बळें भेटावें
तुमच्या शिरांमधून नवं रक्त सळसळतं आहे. ते रक्त पेटून उठलं पाहिजे, असं तरुणांना सांगतानाच देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांची आठवण त्यांनी या कवितेतून करून दिली आहे. या सगळ्यांकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा तुम्ही पूर्ण कराव्यात, अशी साद सावरकरांनी तरुणांना घातली आहे.
‘घे करी शिरा जा झुंज पुरव तो हेतू’ अशा ओळीने त्यांनी या कवितेचा शेवट केला आहे.
तरुणाईने स्वातंत्र्ययुद्धात भाग घ्यायला हवा असेल, झुंज द्यायला हवी असेल, तर ते कणखर असले पाहिजेत ना? म्हणूनच सावरकरांनी ३१ मे १९२५ रोजी साप्ताहिक बलवंतमध्ये लिहिलेल्या पत्रात व्यायामशाळा उभारण्याच्या विषयाची चर्चा केली आहे. देशातल्या तत्कालीन परिस्थितीचं वर्णन करताना सावरकरांनी लिहिलं आहे, की –
‘शरीर नि शिस्त याची उन्नती करण्याचे कार्य करीत न गेल्याने प्रस्तुत हिंदुस्थानचा तरुण म्हणजे एक वीत एवढ्या देहावर पाटीएवढे डोके असलेले हास्यास्पद व्यंगचित्र आहे. म्हणून सध्या शारीरिक शिक्षण नि तेही सांघिक शिस्तीचे शिक्षण अत्यंत अवश्य होऊन बसलेले आहे.’
त्या वेळी शिवोत्सवात झालेल्या व्याख्यानानंतर रत्नागिरीतल्या टिळक आळीतल्या काही उत्साही मंडळींनी एक व्यायामशाळा सुरू करण्याची खटपट केली आणि तात्पुरती व्यवस्था करून मुलं थोडाबहुत व्यायाम करूही लागली, असा उल्लेख सावरकरांनी या पत्रात केला आहे. तसंच, त्यांचं कौतुकही केलं आहे; मात्र समाजाच्या रक्षणासासाठी संपूर्ण शहरातल्या तरुणांची प्रकृती सक्षम होण्यासाठी हे काम काही व्यक्तींनी किंवा गटांनी आणि तात्पुरत्या स्वरूपात करणं पुरेसं नसल्याची जाणीवही सावरकरांनी करून दिली आहे.
रत्नागिरीच्या म्युनिसिपालिटीने प्राथमिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षणही द्यायला हवं. त्यासाठी निदान काही महत्त्वाच्या शाळांमध्ये तरी आखाडे सुरू करावेत, अशी सूचना सावरकरांनी केली आहे. तसंच, सर्व शहरासाठी एक स्वतंत्र आखाडा तरी ताबडतोब सुरू केला पाहिजे, असं ते सुचवतात. कारण वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा नगर संस्थेकडून झालेला प्रयत्न अधिक सुस्थिर, सातत्यपूर्ण आणि परिणामकारक होईल, असं सावरकरांनी त्या पत्रात म्हटलं आहे. म्युनिसिपालिटीचे सभासद डॉ. शिंदे तशा प्रकारचा ठराव मांडणार असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं असून, त्या विषयाचा पिच्छा पुरवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
सावरकरांनी केवळ कल्पना सुचवलेली नाही, तर त्यात चांगलं काम करणारी बडोद्याच्या माणिकरावांची व्यायामशाळा, तसंच नागपुरात डॉ. मुंजे, राजेभोसले, बॅरिस्टर अभ्यंकर, देशमुख आदींनी एकत्र येऊन चालवलेली व्यायामशाळा आदींची उदाहरणंही त्यांनी दिली आहेत. रत्नागिरीतल्या हायस्कूल चालकांनीही आपापल्या संस्थेपुरता आखाडा सुरू करून मुलांना व्यायाम शिकवावा, असं सावरकर म्हणतात. तसंच, काही हायस्कूलमध्ये बॉय स्काउट्स स्थापन झाल्याचं कौतुक करून निदान गरीब विद्यार्थ्यांकडून तरी त्यासाठीचा खर्च घेतला जाऊ नये, असंही ते सुचवतात. त्या वेळी श्री लोकमान्य स्मारक संस्था उदयोन्मुख होती. त्या संस्थेला मूर्त स्वरूप देताना ग्रंथालयं, बागा वगैरे काहीही केलं तरी चालेल; पण त्यात एक उत्तम व्यायामशाळा असलीच पाहिजे, असा आग्रह सावरकरांनी धरला आहे. टिळक स्मारकाची वर्गणी प्रथम आखाड्यात खर्च केली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
सावरकर लिहितात, की ‘द्रव्य थोडेच असेल, तर दुसरेतिसरे काहीएक काम न करता केवळ एक व्यवस्थित नि रत्नागिरीस नव्हे, तर उभ्या कोकणास बलप्रद होणारी व्यायामशाळा काढली, तरीदेखील लोकमान्यांचे योग्य स्मारक स्थापन झाले, असे म्हणता येईल. स्मारकार्थ अशी स्थिर, संपन्न नि बलिष्ट व्यायामशाळा काढूनच त्या महाराष्ट्र मल्लाचे, लोकमान्य टिळकांचे की ज्यांनी एकाकी नि असहाय स्थितीत संकटात आव्हान देत मल्लांगणात उडी घेतली नि ‘हिंदू मेला पण पडला नाही!’ अशा मल्लाचे स्मारक मल्लशाळाच होय.’
टिळकांसारख्या आपल्या पूर्वसुरींची महानता आणि कर्तृत्व नेमकं ओळखून, त्याचा पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल, हे सावरकरांनी या विचारातून नेमकेपणाने साधलं आहे.

पत्राच्या शेवटी सावरकर लिहितात, की ‘ही व्यवस्था होईपर्यंत वाट न पाहता रत्नागिरीतील सोळा वर्षे वयाच्या प्रत्येक तरुणाने आपल्या घरी नमस्कार, जोर, बैठका इत्यादी व्यायाम घेण्यास आजच प्रवृत्त झाले पाहिजे. शक्य तिथे दहा-दहा पाच-पाच एकत्र होऊन आखाडे काढले पाहिजेत. शुद्ध नि शास्त्रोक्त म्हणजे शरीर-शास्त्रोक्त आयुष्यक्रम नि चरित्रक्रम ठेवून शरीर संपत्ती सुधारलीच पाहिजे. हे प्रत्येक तरुणाच्या स्वतःच्या सुखाचे साधन आहे नि म्हणून तरी त्याने ते केलेच पाहिजे.’
सावरकरांचे हे विचार आजच्या काळातही किती तंतोतंत लागू पडतात हे यावरून लक्षात आलं असेल. करोना विषाणूची साथ येण्याच्या काही महिने आधीच देशात सुरू करण्यात आलेली फिट इंडिया मूव्हमेंट असो किंवा काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय योग दिन असो, आजच्या तरुणांनी त्यात सहभागी व्हायला हवं. आणि केवळ तरुणांनीच कशाला, शक्य त्या सर्वांनीच सहभागी व्हायला हवं. महत्त्वाचं म्हणजे हा सहभाग केवळ त्या चळवळीपुरता किंवा त्या दिवसापुरता आणि सेल्फी घेण्यापुरता मर्यादित नसावा. आपल्या जीवनशैलीचा तो एक भाग बनून जायला हवा. व्यायामशाळा किंवा अन्य सुविधा उपलब्ध असतील तिथे त्या जरूर वापराव्यातच; पण सुविधा नसतील, तरीही त्यावाचून काही अडून राहत नाही. प्रत्येकाला घरच्या घरी योगासनं, प्राणायाम, सूर्यनमस्कार आदी व्यायाम करणं सहज शक्य आहे. त्यांची गरज किती आहे, हे करोना कालखंडात आपण सर्वांनीच अनुभवलं आहे. शरीर सुदृढ असलं, तर मनही निरोगी राहतं, हा आरोग्यशास्त्राचा मूलभूत नियम आहे. सगळ्यांना ते माहीतही आहे; पण करोनाच्या निमित्ताने त्याची जाणीव जागृत झाली. ती आता पुन्हा विस्मरणात न देण्याची प्रतिज्ञा सर्वांनी केली, तर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा झाला असं म्हणता येईल.
- अनिकेत कोनकर, रत्नागिरी
ई-मेल : aniketbkonkar@gmail.com
(या लेखमालेतील पहिला लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. दुसरा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. लेखाचा पुढचा भाग सावरकरांचे अन्य विचार आणि ध्येयनिष्ठेबद्दल. हा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०२१च्या इम्युनिटी विशेष दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता. त्या अंकाचे ई-बुक येथे खरेदी करता येईल.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड