नारळ खाद्यपदार्थ स्पर्धेत आदिती नागवेकर प्रथम

रत्नागिरी : हातिस ग्रामविकास मंडळ (हातिस आणि मुंबई) आणि भारत अॅग्रो सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने हातिस येथील कल्पवृक्षाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित नारळ खाद्यपदार्थ स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये आदिती संदेश नागवेकर (हातिस) यांना नारळ बिस्कीट या पदार्थाला पहिले बक्षीस मिळाले.

स्पर्धेत हातिस, तोणदे, टेंभ्ये परिसरातील ३६ स्पर्धकांनी भाग घेतला होता. हातिस येथे पीर बाबरशेख मंदिराच्या परिसरात ही स्पर्धा झाली. त्यामध्ये एकूण पहिले चार क्रमांक निवडण्यात आले. तोणदेच्या पूर्वा आग्रे यांच्या खोबऱ्याच्या पोळीला दुसरा क्रमांक, मनीषा कीर (हातिस) यांच्या मठका कढीला तिसरा क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थ बक्षीस हातिसच्या आदिती नागवेकर यांच्या खोबऱ्याच्या आंबावडीला मिळाला. विजेत्यांना अनुक्रमे एक हजार, ७५०, ५०० आणि २५० रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले.

कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी सभापती कुमार शेट्ये, मरिनर दिलीप भाटकर, पंचायत समिती रत्नागिरी माजी सदस्य महेंद्र झापडेकर, सरपंच कांचन नागवेकर, हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर आणि मुंबईचे अध्यक्ष शंतनू नागवेकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुषमा दिवेकर, गृहिणी आणि प्राध्यापक डॉ. आसिफ पागारकर आणि मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक श्रीकांत शारंगधर यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हातिस ग्रामविकास मंडळ हातिस आणि मुंबई आणि हातिस ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

नारळ खाद्यपदार्थ स्पर्धेचे बक्षीस वितरण
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply