रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील दररोज दुपारचा मेगाब्लॉक बंद करण्यात आला असून आजपासून घाटातून २४ तास वाहतूक सुरू झाली आहे.
चिपळूणजवळच्या परशुराम घाटातील धोकादायक भागातील काम मार्गी लागावे म्हणून ठेकेदार कंपन्यांशी चर्चा करून जिल्हाधिकार्यांनी परशुराम घाट दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हा घाट २५ एप्रिलपासून कालपर्यंत (दि. २५ मे) दररोज सहा तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. हा मेगॉब्लॉक आजपासून बंद करण्यात आला असून परशुराम घाटातून २४ तास वाहतूक खुला करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील जिल्हाभरातील एसटी आणि इतर वाहतूक सुरळित झाली आहे.
परशुराम घाटातील वाहतूक दररोज सहा तास बंद ठेवली जात असल्याने एसटी महामंडळाने जिल्ह्यातील या महामार्गावरून जाणारी एसटी सेवा दुपारच्या वेळेत रद्द केली होती. दुपारी १२ ते सायंकाळी ६ दरम्यान सुटणार्या गाड्या बंद होत्या. मात्र आता एसटीचे वेळापत्रक नियमितपणे सुरू होणार असून मुंबई-गोवा महामार्गावरून सर्व आगारातून सुटणार्या गाड्या नियोजित वेळेत सुटणार आहेत. रातराणीबरोबरच दिवसाही महामार्गावरून मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणार्या गाड्यांची वाहतूक सुरळित होणार आहे. त्यामुळे आता लोकांना पर्यायी चिरणी मार्गे जावे लागणार नाही. याबरोबरच लोटे औद्योगिक वसाहतीमधील अधिकारी, कर्मचार्यांचा पर्यायी मार्गाचा हेलपाटा वाचणार आहे.
मेगॉब्लॉकच्या कालावधीत ७०० मीटर लांबीच्या एका मार्गिकेचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात यश आले असून येत्या १५ जूनपर्यंत आणखी ३०० मीटरचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड