‘१९४२ चिपळूण’मधून चिपळूणच्या इतिहासाची माहिती – आमदार शेखर निकम

चिपळूण : भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान केले आहे. कष्ट भोगलेले आहेत. आपल्या भूमीचा हा इतिहास आपल्याला माहिती हवा म्हणून ‘१९४२ चिपळूण’ या उत्तम पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केले.

चिपळूण येथील स्वातंत्र्यसैनिकांनी ७ सप्टेंबर १९४२ रोजी शहरात मिरवणूक काढून सत्याग्रह केला. गांधी चौकात भाषणे झाली होती. त्यानंतर पोलीस आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्यात संघर्ष झाला. या सत्याग्रहात तेवीस सत्याग्रही कारावासात गेले. त्यातील आठ जणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली. न्यायालयाने दिलेल्या याबाबतच्या निकालपत्राची प्रत वाचनालयाला उपलब्ध झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात वाचनालयाच्या आप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्रातर्फे ऑगस्ट क्रांतिदिनी वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात ‘१९४२चिपळूण’ या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यावर आमदार निकम बोलत होते. सामाजिक बांधिलकी मानून लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे काम सातत्याने सुरू आहे. क्रांतिदिनाचे औचित्य साधून होणाऱ्या या कार्यक्रमाचे औचित्यही वेगळे आहे. ते समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण ठेवायचा उद्देश त्या मागे आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा प्रतीकात्मक सन्मान करण्याची संधी मिळणे भाग्याचे आहे, अशा भावना आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केल्या.

चिपळूणमध्ये ‘१९४२चिपळूण’ पुस्तकाचे प्रकाशन करताना आमदार शेखर निकम, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, चिपळूणचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, श्रीमती शालन रानडे, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार, रत्नागिरीच्या साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर, चिपळूणचे मुख्याधिकारी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, न्यायालयाच्या मूळ इंग्रजी निकालपत्राच्या अनुवादक श्रीमती शालन रानडे, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव होते. ७ सप्टेंबर १९४२ चिपळूण आंदोलनातील तेवीस देशभक्तांच्या कुटुंबांचा यावेळी ग्रंथभेट देऊन आमदार शेखर निकम आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतीकात्मक सन्मान करण्यात आला. त्या सत्याग्रहात गांधी चौकात भाषण करणारे शांताराम धोंडो तांबट यांचे वारस सुरेश तांबट, न्यायालयाने दिलेल्या चिपळूण आंदोलनाच्या निकालपत्राची प्रत वाचनालयाला उपलब्ध करून देणारे पूर्व अध्यक्ष स्वर्गीय ‘दलितमित्र’ तात्या कोवळे यांचे वारस निहार कोवळे आणि न्यायालयात चिपळूण सत्याग्रहींची बाजू मांडणारे तत्कालीन नामवंत वकील शंकर मोरेश्वर सोबळकर यांच्या वंशजांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास सविस्तर साधनासाहित लिहिण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी या पुस्तकाचे संपादन केल्याबद्दल आमदार श्री. निकम यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाने पुस्तकाची निर्मिती केली आहे. हे पुस्तक देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या अपरान्तातील स्वातंत्र्यवीरांना अर्पण केले आहे.

ज्येष्ठ पत्रकार श्री. कोनकर अध्यक्षीय भाषणात म्हणाले, स्वातंत्र्याची चळवळ ही राजकीय नेत्यांनी दिशा दिल्यानंतर लोकांनी उस्फूर्तपणे केलेली चळवळ होती म्हणून ती यशस्वी झाली. अशा चिपळूणच्या चळवळीबाबतचे हे पुस्तक एकाचवेळी वाचून हातावेगळ करावे, असे नाही. या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण काढली जायला हवी. हे पुस्तक वाचताना तत्कालीन राज्यव्यवस्था आणि दडपशाहीचे तंत्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते, असे सांगून श्री. कोनकर यांनी पुस्तकाचा गोषवारा सांगितला. ते म्हणाले, आंदोलनप्रसंगी, ‘पोलिसांनी त्रास दिला` असे न्यायाधीश मान्य करायला तयार नव्हते. सरकारी लोकांना पुरावे देण्याची गरज नाही, अशी त्यांची भूमिका होती. मात्र जनतेने आपली बाजू सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यायला हवेत. केसमध्ये कायद्याचा कीस पाडून ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. एकूणात स्वातंत्र्यपूर्व काळात एकतर्फी केस चालत असाव्यात, असे चित्र यातून समोर येते. एका बाजूला ‘मिरवणूकवाल्यांचा दोष नाही’ असे न्यायालय म्हणते. त्याचवेळी पोलिसांनी फक्त मिरवणूक थांबवली, असेही ते म्हणते. पण पोलिसांनी मारहाण केली हे न्यायालय मान्य करायला तयार नाही. या निकालपत्रातील आंदोलकांच्या हातात काठ्या-छत्र्या होत्या हा गुन्हा कसा ठरू शकतो? असा प्रश्नही कोनकर यांनी उपस्थित केला. त्या काळात बाहेर वावरताना काठी हातात घेऊन वावरणे ही पद्धत होती. पावसाळ्याचे दिवस पाहता छत्री हातात असणे गैर नाही. पण तोच मुद्दा न्यायालयाने आंदोलकांच्या विरोधात ग्राह्य धरला. आपण स्वातंत्र्यसैनिकांचा शोध घ्यायला हवा. स्वातंत्र्यसैनिकांच्या सत्यकथा तयार करायला हव्यात, असे मत श्री. कोनकर यांनी मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय चितळे यांनी केले. रत्नागिरी जिल्ह्याचा स्वातंत्रालढ्याचा आपला इतिहास सर्वांसमोर नेण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. मराठी-इंग्रजी अनुवादक श्रीमती शालन रानडे म्हणाल्या, त्या काळात गावागावातील लोकांनी मोठे काम केले आहे. एखाद्या मोर्चात सहभागी झाल्याबद्दल त्या काळात होणारी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा मोठी होती, असे त्यांनी नमूद केले. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी सांगितले की, स्वातंत्र्याची मूल्ये सांभाळून लोकशाही पुढे नेण्याचे काम भारतीयांनी केले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले. त्यांनी ९ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर १९४२ दरम्यान चले जाव आंदोलनादरम्यान जिल्ह्यात घडलेल्या घटनांचा आढावा घेतला. आभार मधुसूदन केतकर यांनी मानले. यावेळी शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

चिपळूण आंदोलनातील देशभक्तांच्या कुटुंबांचा ग्रंथभेट देऊन प्रतीकात्मक सन्मान करताना आमदार शेखर निकम आणि उपस्थित मान्यवर.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply