राजापूर : लेखणीमध्ये मोठे सामर्थ्य आहे. पंडित सर उत्कृष्ट वाचक असून उत्तम लेखक आहेत, असे गौरवोद्गार निवृत्त मुख्याध्यापक व लेखक विनोद करंदीकर यांनी काढले.
श्री. पंडित यांच्या आम्ही वारकरी या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते तळवडे (ता. राजापूर) ग्रामपंचायत आणि ग्रामवाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, समाजामध्ये माणसे उभी करण्याचे काम शिक्षक करत असतो. पंडित सरांनी समाजामध्ये अशी अनेक माणसे उभी केली. वयाच्या सत्तरीनंतर त्यांनी हातात लेखणी घेऊन दोन वर्षांत दोन पुस्तके प्रकाशित केली. पुस्तकाचे लेखन करून त्याचे प्रकाशन करणे तेवढी सोपी गोष्ट नाही. अर्जुनाकाठ या त्यांच्या पहिल्या पुस्तकाप्रमाणेच आम्ही वारकरी पुस्तकाचेदेखील वाचक नक्कीच स्वागत करतील.
प्रकाशन सोहळ्यातील दुसरे वक्ते आजिवलीमधील शिक्षक सुभाष चोपडे यांनी सांगितले की, शिक्षक ही एक व्यक्ती नसून ती एक शक्ती आहे. समाजपरिवर्तनाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे शिक्षक. पंडित सर निवृत्तीनंतरही पुस्तकाच्या रूपाने समाजशिक्षणाचे कार्य करीत आहेत.
सुरुवातीला श्री. पंडित यांनी आपल्या लेखनाची प्रेरणा आणि भूमिका थोडक्यात स्पष्ट केली. पंढरीच्या वारीबद्दल खूप वर्षांपासून कुतूहल आणि जिज्ञासा होती. त्याचा शोध घेता घेता आम्ही वारकरी हे पुस्तक जन्माला आल्याचे त्यांनी सांगितले.
व्यासपीठावर लेखक आणि प्रमुख वक्त्यांबरोबरच तळवडे गावचे सरपंच प्रदीप प्रभुदेसाई, निवृत्त शिक्षक सखाराम साळवी, माजी सैनिक चंद्रकांत नारायण कदम, पाचल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एम. बी. साखळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश तेरवणकर यांनी केले. लेखक पंडित यांचा परिचय त़ळवडे वाचनालयाचे अध्यक्ष महादेव गवस यांनी करून दिला. कार्यक्रमाला चंद्रकांत लिंगायत, ग्रामवाचनालयाचे ग्रंथपाल संतोष पराडकर, पाचलच्या नारकर वाचनालयाचे ग्रंथपाल आणि व पत्रकार विठोबा चव्हाण, तळवडेमधील कवी नागेश साळवी, कारवलीचे निवृत्त शिक्षक सुरेश साळवी, पाचल हायस्कूलचे माजी निवृत्त शिक्षक ना. गो. रजपूत, जनार्दन सुतार, सुधीर ठोंबरे, माजी केंद्रप्रमुख बापू नारकर, निवृत्त शिक्षक राजाराम तेरवणकर, वसंत प्रभुदेसाई, दिलीप देवरूखकर, सुहास सप्रे, नितिन पंडित, राजू कुलकर्णी यांच्यासह अनेक ग्रंथप्रेमी मंडळी आवर्जून उपस्थित होती. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन गणेश पांचाळ यांनी केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

