एकसष्टाव्या राज्य नाट्य स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर

रत्नागिरी : एकसष्टाव्या महाराष्ट्र हौशी राज्य नाट्य स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. स्पर्धेकरिता प्रवेशिका पाठविण्याची मुदत १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत केली.

एकसष्टाव्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या १५ नोव्हेंबरपासून रत्नागिरीसह राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर होणार आहे. हिंदी, संगीत आणि संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी १ जानेवारी २०२३ पासून प्रत्येकी एका केंद्रावर होणार आहे. तसेच एकोणिसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची स्पर्धेची प्राथमिक फेरी १ जानेवारी २०२३ पासून १० केंद्रांवर होणार असून दिव्यांग बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी २०२३ मध्ये आयाजित करण्यात येणार आहे.

राज्य नाट्य स्पर्धेकरिता ३ हजार रुपयांच्या अनामतीचा, तर बालनाट्य स्पर्धेकरिता १ हजार रुपयांचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल.

नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या संकेतस्थळावर नवीन संदेश मथळ्याखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत खालील पत्त्यांवर सादर कराव्यात.

१) मुंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-३२ (०२२-२२०४३५५०) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

२) पुणे महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक-४, विमानतळ रोड, पुणे (९५७९०८५९१८) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

३) औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रूम नंबर २, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्डी टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औरंगाबाद-४३१००५ (०८७८८८९३५९०) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

४) नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाइन, नागपूर- ४४०००१ (०७१२-२५५४२११) या पत्त्यावर प्रवेशिका पाठवाव्यात.

विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशील भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्‍चित केलेल्या केंद्रावर आणि दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. स्पर्धेकरिता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल.

राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply