शिर्डीतील पर्यावरण संमेलनात रत्नागिरी जिल्ह्याचा सहभाग

चिपळूण : शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्ट यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या सहाव्या पर्यावरण संमेलनात रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग होता.

या पर्यावरण संमेलनामुळे विचारांची उच्चतम पातळी, वेगळे विचार आणि कार्यप्रणाली समजून घेण्यास मदत झाली. तसेच राज्यभर पर्यावरण संवर्धन कामाचा दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या पर्यावरणप्रेमींना भेटता आल्याच्या प्रतिक्रिया मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेल्या रत्नागिरीतील सहभागींनी नोंदवल्या. पर्यावरण संमेलनाला महाराष्ट्राच्या २८ जिल्ह्यांतून पाचशेहून अधिक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी येथील श्रीसाई आश्रम भक्तनिवास परिसरात हे पर्यावरण संमेलन झाले. निसर्गाचा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याची नितांत गरज आहे. मागील दोन वर्षांतील करोनाच्या काळामध्ये मानवाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. म्हणून आज मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे यावेळी पेरे पाटील यांनी आपल्या खास शैलीत नमूद केले. पर्यावरण प्रदूषण निवारण हा राजकीय विषय नाही. एका संस्थेचाही विषय नाही. हा एका माणसाचा विषय नाही. एका जातीचा विषय नाही. हा विशाल दृष्टिकोनातून अखिल मानवाच्या कल्याणासाठी आणि उद्धाराकरिता चाललेला विषय आहे. तो अतिशय गरजेचा झाला आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, अहमदनगरच्या उपवनसंरक्षक सुवर्णा माने, चांगुलपणाची चळवळचे संस्थापक राज देशमुख, मंडळाचे प्रमोद मोरे, सचिव वनश्री मोरे, पर्यावरण महिला सखी मंच अध्यक्ष प्रियंवदा तांबोटकर उपस्थित होते.

संमेलनात मान्यवरांच्या हस्ते वनश्री विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमानंतर सर्वांगीण ग्रामीण विकास या विषयावर वर्ल्ड वॉटर कौन्सिलचे सदस्य रघुनंदन रामकिसन लाहोटी यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर संत साहित्यातील पर्यावरण या विषयावर आदिवासी पुरस्कार विजेते कीर्तन-प्रवचनकार हभप विशाल फलके यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी शिर्डीतील पर्यावरण या विषयावर ग्रीन आणि क्लीन शिर्डी फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित पारक यांनी उत्तम मांडणी केली. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जागतिक पर्यावरण, भारताची स्थिती आणि आपली जबाबदारी या विषयावर पर्यावरण विज्ञान विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. बी. जे. भोसले यांचे व्याख्यान झाले.

संमेलनाचा समारोप वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित स्‍त्रीजन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉ. सुधा कांकरिया, डॉ. प्रकाश कांकरिया, माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या उपस्थितीत पार पडला. पर्यावरण संमेलनातून निसर्ग, सामाजिक आणि मानसिक पर्यावरणाच्या विषयावर काम करण्यासाठी डॉ. सुधा कांकरिया यांनी पर्यावरणप्रेमींना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सर्वांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली.

माधुरी काकडे यांच्या मधुसिंधू काव्य प्रकारातील पद्याने संमेलनाची सुरुवात झाली. संमेलनाचे सूत्रसंचालन पर्यावरण-पर्यटन-ग्रंथ चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी केले. कार्याध्यक्ष प्रमोद काकडे यांनी आभार मानले. संमेलनाला रत्नागिरी जिल्ह्यातून मायावती शिपटे, शैलजा आखाडे, विनया देवरूखकर, नीलम मोहिते, श्रृतिका आगडे, धनश्री वाटेकर, स्नेहल विचारे, अथर्वा लांडे, स्मिता वीरकर, माधवी वाटेकर, रागिणी सुर्वे, सीमा कदम, सतीश मुणगेकर, ओंकार शिपटे, नंदन वाटेकर, रामभाऊ लांडे, सतीश वीरकर, मच्छिंद्रनाथ वाटेकर, संजय कदम सहभागी झाले होते.


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply