रत्नागिरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त रत्नागिरीतील २ (सेकंड) महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे कोकण सारथी या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे आयोजन केले आहे. यामध्ये नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मीचे ६० छात्र सहभागी होणार आहेत. येत्या १५ नोव्हेंबरला रत्नागिरीच्या भगवती बंदरातून मोहिमेला उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर मोहिमेला प्रारंभ होईल.
ही अशी माहिती 2 महाराष्ट्र एनसीसी नेव्हलचे कमांडिंग ऑफिसर के. राजेश कुमार (भारतीय नौसेना) यांनी पत्रकार परिषदेत दिली. एनसीसी नेव्हलच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी सांगण्यात आले की, शिडाच्या तीन नौकांमधून पुलिंग आणि सेलिंग करत एनसीसीचे ६० छात्र सागराच्या लाटांवर स्वार होणार आहेत. एनसीसीचे ३५ छात्र आणि २५ विद्यार्थिनी छात्र यात सहभागी होणार आहेत. ही सागरी मोहीम म्हणजे राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा असते. याचे आयोजन २००८ पासून २ महाराष्ट्र एनसीसी युनिट करत आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, भरती-ओहोटी, वाऱ्याचा विचार करून नौका वल्हवत पुढे जाणे आणि समुद्रातील कोणत्याही संकटाशी सामना करण्याकरिता सज्ज राहणे यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असते, असे के. राजेशकुमार यांनी स्पष्ट केले.
येत्या १५ ते २४ नोव्हेंबरदरम्यान 2 महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे कोकण सारथी सागरी मोहीम आयोजित केली आहे. दह बंदरांना भेट देत पुन्हा रत्नागिरीत सांगता होईल. समुद्रात १७७ नॉटिकल मैल अंतर पार करण्यात येणार आहे. भाट्ये येथे या छात्रांचे पूर्वमोहीम शिबिर सुरू आहे. यात १२० छात्र सहभागी झाले आहेत. यातील ६० जणांची निवड केली आहे. यात नेव्ही, आर्मी, एअरफोर्सच्या छात्रांचा समावेश आहे. वार्याची दिशा, भरती ओहोटी, पाण्याचा प्रवाह याद्वारे नौका पुढे न्यायच्या असतात. त्यांच्या मदतीसाठी दोन अध्यापकीय एनसीसी अधिकारी, नौका, सुरक्षा बोट, मदतनौका, भारतीय हवामान खाते, नेव्ही, कोस्टगार्डचे सहकार्य मिळणार आहे. पाण्याशी झुंज देत, लाटांचा सामना करत दर्यावर्दी जीवनाचा अनुभव छात्र घेणार आहेत. हे छात्र ज्या बंदरात उतरतील, त्या बंदरानजीकच्या लोकवस्तीमध्ये पथनाट्ये सादर करून किनारपट्टीच्या भागातील लोकांचे प्रबोधन करणार आहेत. तसेच खारफुटीचे संरक्षण, संवर्धन करण्याबाबतही संदेश देणार आहेत.
पत्रकार परिषदेला एनसीसी छात्रांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की भाट्ये येथे १ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत या मोहिमेचे प्रशिक्षण सुरू आहे. पोहणे, वाऱ्याचा वेग, करंट तसेच आपत्ती आल्यास काय करावे याचे कडक शिस्तीत प्रशिक्षण मिळत आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. या शिबिरामुळे समुद्रात कोणत्याही स्थितीत कसे वागले पाहिजे याचे प्रशिक्षण आम्हाला मिळाले आहे. याचा उपयोग मोहिमेत होणार असल्याचे सांगितले.
मोहिमेचे वेळापत्रक असे – १५ नोव्हेंबर- रत्नागिरी ते वरवडे, १६ नोव्हेंबर- वरवडे ते जयगड, १७ नोव्हेंबर- जयगड ते तवसाळ आणि परत, १८ नोव्हेंबर- जयगड ते बोऱ्या आणि परत, १९ नोव्हेंबर- जयगड ते दाभोळ, २० नोव्हेंबर- दाभोळ ते धोपावे आणि परत, २१ नोव्हेंबर- दाभोळ ते अंजनवेल, वेलदूर, २२ नोव्हेंबर- दाभोळ ते जयगड, २३ नोव्हेंबर- जयगड ते काळबादेवी, २४ नोव्हेंबर- काळबादेवी ते रत्नागिरी भगवती बंदर.
Follow Kokan Media on Social Media

