दापोली विंटर सायक्लोथॉनमधील सायकली सातारा, दापोलीतील स्वारांनी जिंकल्या

दापोली : येथे आज आयोजित केलेल्या दापोली विंटर सायक्लोथॉन स्पर्धेतील सोडतीमध्ये कोरेगाव (सातारा) येथील अनिकेत मोहाळे आणि दापोलीमधील अनिशा लयाळ यांनी दोन सायकली जिंकल्या.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी आणि सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आज दापोली विंटर सायक्लोथॉन २०२२ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ती उत्साहात झाली. त्यामध्ये सर्व वयोगटातील ३०० हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते. आमदार योगेश कदम यांनीही यामध्ये सहभागी होऊन सायकल चालवत सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

सिटी शॉर्ट लूप आणि कोस्टल सिनिक रूट अशा दोन वेगवेगळ्या मार्गावर असणारी ही सायकल स्पर्धा दापोलीच्या आझाद मैदानातून सकाळी साडेपाच वाजता सुरू झाली. यावेळी आमदार योगेश कदम, सुनील दळवी, नगरसेविका कृपा घाग, शिवानी खानविलकर, नगरसेवक विलास शिगवण, फाटक डेव्हलपर्सचे अक्षय फाटक, डॉ. रोहन पिंपळे, भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे सचिन तोडणकर, ज्योती नागवेकर, शशिकांत वराडकर, श्री सायकल मार्टचे मंदार बाळ, प्रो सायकलचे अयान, राहुल मंडलिक इत्यादी अनेक मान्यवर स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.

स्पर्धेत मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नगर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, गोवा अशा अनेक जिल्ह्यांतील स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील ७५ किमी कोस्टल सिनिक रूट स्पर्धेचा मार्ग दापोली, उंबर्ले, ओळगाव, बुरोंडी, लाडघर, कर्दे, मुरूड, सालदुरे, पाळंदे, हर्णै, पाजपंढरी, आसूद या समुद्रकिनारी गावांमधून पुन्हा दापोली असा होता. ठिकठिकाणी स्पर्धकांचे स्वागत आणि पाहुणचार करण्यात आला. स्पर्धकांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

स्पर्धेच्या निमित्ताने काढलेल्या सोडतीमध्ये दोन सायकलींसह एकूण १ लाखाची विविध बक्षिसे वाटण्यात आली. सायक्लोथॉनचे नियोजन करण्यात सुनील रिसबूड, संदीप भाटकर, केतन पालवणकर, अंबरीश गुरव, पराग केळसकर, सूरज शेठ, प्रशांत पालवणकर, मृणाल मिलिंद खानविलकर, उत्पल वराडकर, आकाश तांबे, वरुण महाजन, सर्वेश बागकर, अजय मोरे इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा, असे आवाहनही आयोजकांनी केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply