मुंबई : गेल्या दोन वर्षांत करोनामुळे नमन या रत्नागिरी जिल्ह्यातील कलेची तिसरी घंटा मुंबईत वाजलीच नाही. आता निर्बंध उठले आहेत. त्यामुळे येत्या १८ डिसेंबर रोजी प्रेक्षकांना गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात अदृश्य रंगकर्मी नमन पाहण्याची संधी मिळणार आहे. एकाच दिवशी तीन प्रयोग होणार आहेत.

कोकणातील लोककलाकारांना मुंबईत नमनाचे प्रयोग करायचे झाले, तर दामोदर किंवा साहित्य संघ मंदिर हे हक्काचे नाट्यगृह वाटते. त्यांच्यासाठी कवी, वादक, गायक, निर्माते अशोक दुदम यांनी नमनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नमनला प्रतिष्ठा मिळून देण्यासाठी ते दरवर्षी प्रसिद्धी माध्यमांनी दखल घ्यावी, असा अभिनव प्रयोग करीत असतात. काही वर्षांपूर्वी आशिया खंडातील सर्वांत मोठ्या षण्मुखानंद सभागृहात ‘नाद पंढरीचा’ हा प्रयोग त्यांनी केला होता. तो नमन विश्वात विक्रमी ठरणारा सोहळा होता. त्यानंतर व्यावसायिक कलाकारांना घेऊन ‘साहेब, जागे व्हा’चे प्रयोग केले होते. आता ‘अदृश्य रंगकर्मी’ या नमनाचे सलग तीन प्रयोग होणार आहेत.
दिव्या हर्ष इंटरप्रायझेसची ही विक्रमी कलाकृती ठरणार आहे. संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गावातील चाळीस कलाकार त्यासाठी एकत्र येणार आहेत. संस्थेतर्फे नमनाच्या वेळी ७० एमएमचा स्क्रीन लावला जातो. हे धाडस सहसा कुणी करत नाही. देवदेवता, गावातील देऊळ यांचे भव्यदिव्य दर्शन स्क्रीनवर होणार आहे. श्रवणीय गीतरचना, मोहवून टाकणारी नृत्य अदा, प्रेक्षकांचे छान मनोरंजन होऊ शकेल, असा विनोदी, खट्याळ नाट्यप्रवेश प्रेक्षकांना पाहायला मिळतो. सारा थाट उच्च प्रतीचा असला तरी पूर्वपार चालत आलेल्या परंपरेत खंड पडू दिलेला नाही. पुरुष कलाकारच स्त्रीचा साजशृंगार करुन गणगौळण आणि नंतर ‘अदृश्य रंगकर्मी’ ही नाट्यकृती सादर करणार आहेत. प्रेक्षक थक्क होतील असे काही प्रसंग यात पाहायला मिळणार आहेत. सूर्या गोवळे हा यात मुख्य व्यक्तिरेखा सादर करणार आहे. ‘तेढेमेढे’ या व्यावसायिक नाटकातल्या भूमिकेसाठी त्याला ‘झी’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. नितीन पवार प्रथमच मावशीच्या धमाल भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
रविवारी, १८ डिसेंबर रोजी सकाळी ११, दुपारी ३.३० आणि सायंकाळी ७.३० वाजता असे सलग तीन प्रयोग गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात होणार आहेत. नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी विलास विंजले सांभाळत आहेत. कोकणातील अंधश्रद्धेवर भाष्य करणारे हे लोकनाट्य आहे.
