मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री दिवंगत शांताबाई जोग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने होणारी एकांकिका स्पर्धा येत्या २१ ते २४ जानेवारी २०२३ यादरम्यान होणार आहे.
मंडळातर्फे प्रत्येक वर्षी ‘शांताबाई जोग स्मृती एकांकिका स्पर्धा’ आयोजित केली जाते. सोनल प्रॉडक्शन पुरस्कृत या स्पर्धेचे यंदा एकेचाळिसावे वर्ष आहे. यावेळी बक्षिसाची रक्कम वाढवलेली आहे. ही स्पर्धा २१ ते २४ जानेवारी २०२३ यादरम्यान रोज संध्याकाळी सहा वाजता घेण्यात येईल. दररोज चार याप्रमाणे चार दिवसांसाठी फक्त प्रथम प्रवेश घेणाऱ्या १६ एकांकिकांना स्पर्धेत प्राधान्य देण्यात येणार आहे. मंडळाचे कार्यक्षेत्र मुंबईतील चेंबूर, टिळक नगर येथे आहे. तेथील श्री गणेश नाट्यमंदिराच्या आवारात स्पर्धा घेण्यात येणार आहे.
स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या एकांकिकेला रोख रक्कम आणि शांताबाई जोग फिरता चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय द्वितीय आणि तृतीय एकांकिकांना रोख रक्कम देण्यात येणार आहे. दिग्दर्शन, स्त्री-पुरुष अभिनयासाठी सुद्धा तीन रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत यांच्यासाठी प्रत्येकी एक रोख रक्कम देण्यात येणार आहे. संपूर्ण एकांकिका स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या एका स्त्री-पुरुष कलाकाराला ज्येष्ठ नाट्य समीक्षक अनंत घोगळे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेचे प्रवेश शुल्क पाचशे रुपये असून अधिक माहितीसाठी स्पर्धा समन्वयक नंदकुमार पाटील (९८६९००८८०५), स्पर्धा संयोजक विशाल बिलये (९६१९२५१५७५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


