चिपळूण : मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे ख्यातनाम अभ्यासक आशुतोष बापट यांनी लिहिलेल्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी (दि. २ एप्रिल) येथील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
पुस्तकाला चिपळूणचे ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक प्रकाश देशपांडे यांची प्रस्तावना लाभली असून कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ मूर्तितज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलुरकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, आमदार शेखर निकम उपस्थित राहाणार आहेत. यावेळी ज्येष्ठ दुर्गतज्ज्ञ प्र. के. घाणेकर यांचा त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
बापट यांची सफर संगमेश्वर देवरूखची, शिल्पसमृद्ध कोकण, सफर देखण्या महाराष्ट्राची, कोणार्कचे सूर्यमंदिर, सफर ओडिशाची, सफर हंपी-बदामीची, भटकंती आडवाटेवरची, शिल्पसमृद्ध शिवमंदिरे, नदीच्या खोऱ्यात, कंबोडिया, दुर्गांपलीकडला सह्याद्री, पल्लव आणि चोळांच्या देशात, भारतीय कलेतील मिथकशिल्पे आदी पंधरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विविध दैनिकांतून ‘संस्कृतीच्या पाउलखुणा’, ‘आडवाटेवरील वारसास्थळे’, ‘चिंब भटकंती’, ‘२ दिवस भटकंतीचे’ आदी स्तंभलेखनही केले आहे. त्यांना २०२१ साली इंडॉलॉजीसाठी मुंबईच्या एशियाटिक सोसायटीची जस्टीस के. टी. तेलंग शिष्यवृत्ती मिळाली होती. नेपाळ आर्ट कौन्सिल आणि भारतीय दूतावासातर्फे आयोजित ‘विष्णुमूर्ती’ या विषयावर व्याख्यानासाठी त्यांना काठमांडू येथे आमंत्रित करण्यात आले होते.
चिपळूण-गुहागरच्या इतिहासाचे अनेक पदर त्यांच्या नव्या पुस्तकातून उलगडण्यात आले आहेत. चिपळूण आणि गुहागर हा एकेकाळी एकच तालुका होता. पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके गावावरून नव्हे तर तेथील किल्ल्यांच्या नावाने ओळखले जात. जुन्या दप्तरात चिपळूणचा उल्लेख ‘तालुके अंजनवेल’ असा मिळतो. अंजनवेल किल्ला हे तालुक्याचे ठिकाण होते. अंजनवेल येथे न्यायालयही होते, असे देशपांडे यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे. चिपळूणला शिलाहार राजा मल्लिकार्जुन याचा स्तंभलेख मिळालेला आहे. हा शिलालेख मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवलेला आहे. चिपळूणजवळच्या शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदिर याच राजाने निर्मिलेले नसेल का, असा प्रश्न उपस्थित करत अभ्यासकांनी याचा शोध घ्यायला हवा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आशुतोष बापट यांनी हा परिसर डोळसपणे पाहून लेखन केल्यामुळे पर्यटकांना चिपळूण आणि गुहागरच्या अप्रसिद्ध स्थानांची माहिती होणार असल्याचे देशपांडे यांनी नमूद केले आहे.
चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने होणारा हा कार्यक्रम साहित्य रसिकांसाठी उत्तम बौद्धिक मेजवानी ठरणार असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह विनायक ओक, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड