जानेवारीपासून मुंबईतून गोवा साडेचार तासांत गाठता येणार – गडकरी

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. येत्या जानेवारीपासून मुंबई ते गोवा हे अंतर या महामार्गावरून साडेचार तासांत कापणे शक्य होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

रायगड जिल्ह्यातील महामार्गाशी संबंधित विविध कामांचे उद्घाटन केल्यानंतर श्री. गडकरी रत्नागिरी जिल्ह्यात आले. त्यांनी हवाई मार्गाने महामार्गाच्या चौपदरीकरणाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नाणीज (ता. रत्नागिरी) येथे भेट दिली. त्यानंतर रत्नागिरीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

श्री. गडकरी यांनी सांगितले की, भूसंपादन, परवानग्या, कंत्राटदारांच्या अडचणी यांसारख्या समस्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या अनेक कामांमध्ये अडचणी आल्या. मात्र आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ही जबाबदारी स्वीकारली असून चौपदरीकरणाने वेग घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील काही भाग वगळता इतर ठिकाणची कामे प्रगतिपथावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम तर पूर्ण झाले आहे. राहिलेली कामे लवकरच पूर्ण होतील आणि डिसेंबरपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल. सुरवातीला १२ कोटीचे असलेले हे काम आता १५ हजार ५६६ कोटीपर्यंत गेले आहे. अनेक कंत्राटदार बदलले. अनेक अडचणींवर मात करून आता ते पूर्ण होणार आहे. पूर्ण झालेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा आनंद जानेवारीत घेता येईल. तो वेळेत पूर्ण होऊ शकला नाही, याचे दुःख आहे. सर्वांत जास्त वेळ लागलेला हा प्रकल्प आहे.

महामार्गाच्या पूर्ततेविषयी माहिती देताना ते म्हणाले, रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याचे ८१ टक्के काम पूर्ण झाले आहे. बोगद्यातील एका मार्गिकेचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामधून पावसाळ्यापूर्वी वाहतूक सुरू होईल. दुसरी मार्गिका डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. कशेडी ते परशुराम या ४५ किलोमीटरच्या मार्गाचे ९३ टक्के, परशुराम ते आरवली या ३५ किलोमीटरचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यापुढील आरवली वाकेड रस्त्यापैकी तळेकांटेपर्यंतचे काम २५ टक्के, तर तेथून पुढे वाकेडपर्यंतच्या भागाचे काम २७ टक्के पूर्ण झाले आहे. त्यातील अडचणींवर उपाय योजले जातील. पण महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. रत्नागिरी जिल्ह्यातील वाकेडपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम ९९ टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले. संपूर्ण महामार्गाचे काम वेगवेगळ्या १० विभागात पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यापैकी २-३ टप्पे वगळता उर्वरित काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १९९ किलोमीटरपैकी ११८ किलोमीटरचे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ८२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. एकूण ३५६ किलोमीटरच्या महामार्गापैकी २५० किलोमीटर महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-गोवा अंतर साडेचार तासांत कापता येईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे कोकणाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असेही श्री. गडकरी यांनी सांगितले.

महामार्गाच्या सुरक्षिततेची पाहणी करण्याची सूचना केल्याचे सांगून श्री. गडकरी म्हणाले की, पावसाळ्यात महामार्गावर वनीकरण आणि सौंदर्यीकरण करावे. त्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी, रस्त्याच्या मधोमध बांबूचे कुंपण उभारावे, अशी सूचना केली आहे. भोस्ते घाटातील अपघात कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय जहाजावर उतरणारी विमाने, वॉटर टॅक्सी सुरू केल्या तर कमी वेळेत प्रवास होऊ शकेल. त्यासाठीही राज्य शासनाला सूचना करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचरा महामार्गासाठी वापरला जाईल. रस्त्याकरिता जी माती लागते, त्यासाठी तलाव आणि नदीनाले खोलीकरणाची कामे राज्य शासनाने सुचविली, तर त्यातून घेता येईल. त्यामुळे त्या गावांचे जलंसधारणही होईल. विदर्भात अशा पद्धतीने एक हजार तलाव बांधल्याची माहिती श्री. गडकरी यांनी दिली.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाखालून जाणारे पर्यायी रस्ते, फूट ओव्हर ब्रिज, इत्यादी सात कामांसाठी २२० कोटी रुपये मंजूर केले आहेत. महामार्गावर ४८ बसथांबे बांधण्यात आले आहेत. निवळी ते जयगड हा ४६ किलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग व्हावा, असा प्रस्ताव आला आहे. त्याचाही विचार केला जाईल, असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते.

नितीन गडकरी यांची पत्रकार परिषद

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply