रत्नागिरी : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ३० मार्च २०२३ रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची (NH 66) हवाई पाहणी केली. त्या वेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत त्यांच्यासोबत होते. (या पाहणीचे फोटो आणि व्हिडिओ सोबत दिले आहेत.)
‘राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत मुंबई-गोवा महामार्गाची इंदापूर (जि. रायगड) ते झाराप (जि. सिंधुदुर्ग) या भागांतील १० पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या १० पॅकेजेसची एकूण सुधारित किंमत १५,५६६ कोटी रुपये असून, ३५६ किलोमीटर लांबीच्या महामार्गावरील २५० किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत,’ असे नितीन गडकरी यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन पॅकेजेसचे (P-9, P-10) जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण पाच पॅकेजेस असून, त्यापैकी २ पॅकेजेसचे (P-4, P-8) काम अनुक्रमे ९२ टक्के व ९८ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. दोन पॅकेजेससाठी (P-6, P-7) नवीन कंत्राटदाराची नेमणूक करून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातील तीन पॅकेजेसपैकी दोन पॅकेजेसचे (P-2, P-3) काम अनुक्रमे ९३ टक्के व ८२ टक्के पूर्ण झाले आहे. पॅकेज P-1चे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल,’ अशी माहितीही नितीन गडकरी यांनी ट्विटमध्ये दिली आहे. (फोटो, व्हिडिओ स्रोत : नितीन गडकरी यांचे ट्विटर अकाउंट)














नितीन गडकरी यांनी दिलेली माहिती अत्यंत हास्यास्पद महामार्ग पूर्ण होण्यास अजून चार वर्षे तरी लागतील
महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबईहून गोवा साडेचार तासात गाठणे अशक्य आहे
त्यासाठी गाडी ताशी 200 किमी वेगाने चालवावी लागेल हे शक्य आहे का ?
निवळी रत्नागिरी हातखंबा पाली येथील कामे पूर्ण होण्यास अजून चार वर्षे लागतील
तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा यांनी महामार्ग 2019 साली पूर्ण होईल असे ठोकून दिले होते
रस्त्याचे काँक्रिटीकरण अत्यंत खराब दर्जाचे आहे टायरचे प्रचंड घर्षण होत आहे
अत्यंत घटिया काम