वसई : अनेक वर्षांपासून मागणी होत असलेली वसई ते सावंतवाडी पॅसेंजर गाडी कोकण रेल्वेमार्गावर लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
श्री. राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, २९ जानेवारी २०२२ रोजी वसई (जि. पालघर) येथील सिंधुरत्न कोकण प्रतिष्ठानने आपल्याला पाठविलेल्या पत्राची प्रत सोबत जोडत आहे. वसई ते सावंतवाडीदरम्यान नियमित गाड्या चालवण्याची विनंती त्या पत्रात करण्यात आली आहे.
या मार्गावर नियमित गाड्या सुरू करण्याची मागणी कोकणवासीयांकडून होत आहे. त्याकरिता २०१४ साली सुमारे ११ हजार प्रवाशांच्या स्वाक्षरीचे निवेदन पाठविण्यात मध्य आणि पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनाही पाठविणय्त आले होते. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ९ जानेवारी २०१५ रोजी संबंधित विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांना त्याबाबतची सूचनाही केली होती. मात्र अन्य गाड्या या मार्गावरून धावत असल्या, तरी वसई ते सावंतवाडीदरम्यान आजतागायत गाडी सुरू झालेली नाही. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही मागणी विचारात घ्यावी आणि कोकणवासीयांकरिता वसई ते सावंतवाडी मार्गावर नियमित गाड्या सुरू करण्याचे आदेश लवकरात लवकर द्यावेत, असे श्री. राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड




