सावंतवाडी टर्मिनसबाबत खासदार विनायक राऊत यांना निवेदन

सावंतवाडी : कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ववत सुरू होण्याबाबत व्हावे आणि महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना सावंतवाडी थांबा मिळावा, अशा आशयाचे निवेदन रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष मिहिर मिलिंद मठकर यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांना दिले.

श्री. मठकर यांनी श्री. राऊत यांची भेट घेऊन कोकण रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली आणि निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व्हावे ही प्रत्येक सावंतवाडीकरांची इच्छा आहे. तसेच ती माजी आमदार तथा स्वातंत्र्यसैनिक कै. जयानंद मठकर यांचीही होती. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस होण्यासाठी मठकरांनी सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरच आत्मदहनाचे आंदोलन जाहीर केले होते. त्या आंदोलनास अनुसरून तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू साहेब यांनी सावंतवाडी टर्मिनसला मंजूरी दिली होती. त्यामुळे जयानंद मठकर यांनी आपले आंदोलन स्थगित केले होते. सावंतवाडी टर्मिनस सुरू होईल, तेव्हाच कै. मठकर यांचे स्वप्न पूर्ण होईल. तीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने आपण केंद्र शासनाच्या दरबारी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. आपल्या प्रयत्नांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम परत सुरू झाल्यास खऱ्या अर्थाने सावंतवाडीकरांचे स्वप्न पूर्ण होईल.

सावंतवाडी टर्मिनसच्या कामाचा प्रारंभ २४ जून २०१६ रोजी झाला. पहिल्या टप्प्याच्या कामाची पुर्ण सुरुवात आणि काम संपूर्ण होण्यासाठी आपण आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. त्यामुळे हे काम लवकर पूर्णत्वास जाऊ शकले. मात्र दुसऱ्या टप्प्याचे काम गेली ५-६ वर्षे बंदच आहे. मध्ये करोनाकाळामुळे काम बंद राहणे समजून घेता येईल. पण त्यानंतरही हे काम बंदच राहिले आहे, याची खंत वाटते. काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास सावंतवाडीकरांचे स्वप्न पूर्ण होईल आणि प्रवाशांची मोठी गैरसोय टळेल.

सावंतवाडी स्थानकावर रोजच्या आणि ४-५ साप्ताहिक गाड्याच थांबतात. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील प्रवाशांची खूप मोठी गैरसोय होते. मुंबईला जाण्याकरिता प्रवाशांना सावंतवाडीत मोजक्याच गाड्यांचा पर्याय आहे. त्यातील निम्म्या आसनांचे आरक्षण रिझर्व्ह कोट्यामध्ये होते. त्यामुळे सर्वसाधारण प्रवाशांना तिकीट मिळणे कठीण होते. जवळच्या तालुक्यातील स्टेशनवर किमान २५-३० गाड्या दिवसाला थांबतात. त्यामुळे तेथील प्रवाशांची चांगलीच सोय होते. पण सावंतवाडीतील प्रवाशांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागते. सावंतवाडीतील प्रवाशांच्या सोयीसाठी अलीकडेच जनशताब्दीसारख्या वेगवान गाडीलाही सावंतवाडी थांबा देण्यात आला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय थोड्याफार प्रमाणात कमी झाली. आता वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आणि सावंतवाडीचा जोमाने होणारा विकास लक्षात घेता आगामी काळात जादा गाड्या नक्कीच उपयुक्त ठरतील. कोकणातील विकास आणि कोकणी माणसे यांच्यासाठी कोकण रेल्वेच एक सेतू आहे. तो देशातील इतर भागांशी जोडला जातो. गणेश चतुर्थी, जत्रा इत्यादींसाठी विशेष गाड्या सोडल्या जातात. तरीही रोजच्या गाड्यांमध्येच खूप गर्दी होते. त्यामुळे महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळाल्यास सावंतवाडीकरांची गैरसोय टळेल.

आजतागायत प्रा. मधू दंडवते, जयानंद मठकर, जॉर्ज फर्नांडिस, बॅ. नाथ पै, डी. के. सावंत अशा दिग्गज नेत्यांनी तसेच आताच्या समाजसेवकांनी आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींनी सावंतवाडी स्टेशन आणि टर्मिनससाठी बरेच काही केले आहे. टर्मिनस आणि सर्व गाड्यांना थांबा देऊन हा लढा पूर्ण करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, या निवेदनाचा निश्चितच उपयोग होईल, अशी अपेक्षा वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शांताराम शंकर नाईक यांनी व्यक्त केली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply