वसई-सावंतवाडी पॅसेंजरची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वसई : कोकण रेल्वेमार्गावर वसई सावंतवाडी पॅसेंजर सुरू करावी, अशी मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमच्या मागणीची रेल्वे बोर्डाकडे शिफारस करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्टेशनवरून कोकण रेल्वे मार्गावर वसई ते सावंतवाडी पॅसेंजरची मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना गेल्या ५ वर्षांपासून रेल्वे प्रशासन, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि रेल्वे मंत्री यांच्याकडे सातत्याने करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वसई सावंतवाडी पॅसेंजर किंवा कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते स्लो एक्स्प्रेसची शिफारस रेल्वे बोर्डाकडे करावी, अशी मागणी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

वसई, विरार परिसरात कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड येथील चाकरमान्यंची लोकवस्ती साधारण आठ लाखाच्या घरात आहे. भविष्यात हे प्रमाण वाढतही जाईल. या रहिवाशांना कोकणात जाण्यासाठी रेल्वे पकडायचे झाल्यास दादर, सीएसएमटी किंवा कुर्ला स्टेशनला जावे लागते. त्यासाठी त्रासही खूप सहन करावा लागतो. यासाठी वांदे, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद किंवा सुरत येथूनही रेल्वेगाडी वसई मार्गे कोकण रेल्वे मार्गावर नेहमीसाठी फक्त सावंतवाडीपर्यंत सुरू करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

पश्चिम रेल्वेवरून वसईमार्गे कोकण रेल्वेवरून गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये राजधानी एक्स्प्रेस, जामनगर तिरुनेलवेली एक्स्प्रसे, ओखा-एर्नाकुलम, गांधीधाम-तिरुनेलवेली, अमृतसरकोल्लम, चंदिगड-मडगाव, भावनगर-कोचुवेली, योगनगर-यशवंतपुरम कोचुवेली, इंदूर-कोचुवेली, श्रीगंगानगर-कोचुवेली, वेरावळ-त्रिवेंद्रम, हापा-मडगाव, हिस्सार-पडघम अशा अनेक गाड्या धावतात. दर आठवड्याला सुमारे ६४ एक्स्प्रेस गाड्या कोकण रेल्वेवरून ये-जा करतात. मात्र फक्त महाराष्ट्रासाठी गेल्या ५ वर्षांपासून एक पॅसेंजर मागत आहोत, ती मिळत नाही. ही गंभीर बाब आहे, असे पत्रात म्हटले आहे.

या निवेदनाची प्रत कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, रेल्वे मंत्री, राज्यमंत्री, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडचे खासदार, यांना पाठवल्या असून त्यावर अध्यक्ष शांताराम नाईक आणि सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी सह्या केल्या आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply