रत्नागिरी : भाजपामध्ये कार्यकर्ताच नेता असतो. प्रत्येक कार्यकर्त्याने शत प्रतिशत भाजपसाठी प्रयत्न करून पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले.
त्यांच्या उपस्थितीत आज येथील स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या भाजपच्या लोकसभा, विधानसभा विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला तुफान गर्दी झाली. संपूर्ण सभागृह पूर्ण भरून कार्यकर्ते बाहेर उभे होते. श्री. चव्हाण यांनी याप्रसंगी भाजपाच्या वाढीसाठी अनेक टिप्स दिल्या. ते म्हणाले की, आपल्या खिशाला कमळ लावा. फ्रेंड्स ऑफ बीजेपी वाढवा. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना सर्वांना सांगा. आपला लोकसभा मतदारसंघ उजव्या विचारांचा असून यावेळी तो गड जिंकायचा आहे. केंद्रात आपले ४०० पार सदस्य निवडून येणार आहेत, त्याकरिता संकल्प करू या.
शिंदे-फडणवीस राज्य सरकारच्या योजनांचा मिळालेला लाभ आणि योजना आणि विकासनिधी दिल्याबद्दल ग्रामपंचायतींमध्ये अभिनंदनाचे ठराव करा. सोशल मीडियाचा प्रभावी व योग्य वापर करा आणि आपल्या केंद्र, राज्यातील नेत्यांना फॉलो करा. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्याला एकही जागा मिळाली नाही. याचा बदला घ्यायचा आहे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
रत्नागिरी जिल्ह्याला रस्त्यांकरिता ५०० कोटींचा निधी दिला आहे. रोजगार देत आहोत. आपले जनसामान्यांचे सरकार आहे. जिल्ह्यात २ लाख ५२ हजार लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळाला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याकरिता आपण छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजेत. शत प्रतिशत भाजपा हे आपले उद्दिष्ट आहे. किसान सन्मान योजना, नमो योजना, रोजगार संधी यासह सबका साथ सबका विकास हा मंत्र अमलात आणूनच आपण विजय मिळवू शकतो. नेते व कार्यकर्त्यांमध्ये आपला विश्वास हवा. डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार होत असताना आपले विरोधक सोशल मीडियाद्वारे चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. त्याला आपण प्रत्युत्तर दिले पाहिजे. फेसबुक, ट्विटर यांचा वापर करा. भाजप नेत्यांना फॉलो करा, रिट्विट करा, फॉर्वर्ड करा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले की, विजय संकल्प मेळावा ही संकल्पनाच ऊर्जा देणारी आहे. अटलजी आणि सहकाऱ्यांनी १९८० मध्ये भाजपची स्थापना केली. त्यावेळी रत्नागिरीमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते होते. परंतु गेल्या ४० वर्षांत भाजपाची ताकद वाढली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत स्वबळावर लढत भाजपाने १९१ सदस्य आणि १७ सरपंच विजयी केले. मंत्री चव्हाण यांनी प्रतिकूल स्थितीतही सातत्याने विजय मिळवला, पराभव हा शब्द त्यांच्यापासून कोसो दूर आहे. त्यांचे मार्गदर्शन मिळणे ही विजयाची नांदी ठरणार आहे.
याप्रसंगी प्रमोद जठार यांनी सांगितले की, २००६ मध्ये आम्ही जिल्ह्याचा पालकमंत्री भाजपाचा असेल, असा संकल्प केला होता. मंत्री चव्हाण यांच्या रूपाने तो सत्यात उतरला. आता रत्नागिरीमध्ये पुढील ५-१० वर्षांत भाजपाचा पालकमंत्री असेल असा संकल्प करू या. २०२४ च्या निवडणुकरूपी युद्धात जय मिळवण्यासाठी आपण सज्ज होऊ या.
श्री. चव्हाण कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आल्याने प्रचंड गर्दी झाली. व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, अॅड. बाबा परुळेकर, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, राजेश सावंत, यशवंत वाकडे, अभिजित गुरव, प्रमोद अधटराव, महेंद्र मयेकर, मृणाल शेट्ये, ऐश्वर्या जठार, उल्का विश्वासराव, अनिकेत पटवर्धन, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी, यांच्यासमवेत तालुकाध्यक्ष, मंडलप्रमुख उपस्थित होते.
श्री. चव्हाण यांच्या स्वागतासाठी ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी केली. त्यानंतर महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचे औक्षण केले. सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मंत्री चव्हाण यांचे स्वागत अॅड. पटवर्धन यांनी केले. तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे आणि तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी भलामोठा पुष्पहार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन श्री. चव्हाण यांचा सन्मान केला.
यावेळी रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, राजापूरमधून बूथ स्तरावरील कार्यकर्ते, बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, जिल्हा, तालुकास्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे सुरेख नियोजन केल्याबद्दल मंत्री चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांची पाठ थोपटली.



कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

