व्यक्तिमत्त्व विकास शिबिराला मूकबधिर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

रत्नागिरी : येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या (कै.) के. प. अभ्यंकर मूक-बधिर विद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी चार दिवसांचे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

हरहुन्नरी कलाकार, मार्गदर्शक श्रीकांत ढालकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना हसत खेळत चित्रकला शिकविली. यामध्ये त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, रेषा यातून निर्माण होणारी चित्रनिर्मिती शिकविली. सुवाच्च अक्षरलेखन शिकविले. तसेच त्यांनी बोलक्या बाहुल्यांचे खेळ घेतले. दुसऱ्या दिवशी श्री. ढालकर यांनी मूर्तिकलेचे धडे विद्यार्थ्यांना शिकवले. मुलांनी मातीपासून विविध आकार साकारले. त्यामध्ये फळे, फुले, गणपतीची मूर्ती तसेच मानवी आकारांचा समावेश होता.

आविष्कार कार्यशाळेतील कलाशिक्षिका प्राची पाटील यांनी कापडाची सुगंधी सोनचाफ्याची फुले तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेतले. फुलांचे विविध प्रकार शिकविले. चित्रकार श्वेता केळकर यांनी ओरिगामी कला शिकविली. कागदापासून अनेक प्रकारची आकारनिर्मिती विद्यार्थी-विद्यार्थिनींनी केली. दुपारनंतर विविध खेळ घेतले.

तिसऱ्या दिवशी सायंकाळी मांडवी समुद्रकिनारी विद्यार्थ्यांसमवेत फेरफटका झाला. रात्री जेवण झाल्यानंतर थोडे खेळ आणि इमारतीच्या गच्चीवरून आकाशदर्शनाचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. रात्री सर्व मुलांनी शाळेत वस्ती केली. करमणुकीसाठी पडद्यावर चित्रपट दाखविण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये आनंदाने सहभाग घेतला. विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर उत्साहात झाले. याकरिता शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकांचे सहकार्य लाभले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply