बारसूमधील प्रस्तावित रिफायनरीविरोधात आंदोलन तीव्र; महिलांनी रस्त्यावर झोपून पोलिसांच्या गाड्या रोखल्या

रत्नागिरी : बारसू (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीविरोधात आंदोलन तीव्र झाले आहे. या रिफायनरीसाठीचे सर्वेक्षण आज (२५ एप्रिल २०२३) आंदोलक महिलांनी रोखले. पोलिसांच्या गाड्यांचा ताफा महिलांनी रस्त्यावर झोपून अडवला. दरम्यान, प्रशासनाकडून लवकरच बारसू रिफायनरीसाठीचे सर्वेक्षण थांबवावे, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

बारसू-सोलगाव (ता. राजापूर) येथे होणार असलेल्या रिफायनरीविरोधातील आंदोलन चांगलेच पेटले आहे. रिफायनरीला स्थानिकांचा विरोध वाढला आहे. आज (मंगळवार, २५ एप्रिल २०२३) सकाळपासून आंदोलक जमले होते. त्यांनी प्रकल्पाच्या जागी धरणे धरले होते. दरम्यान, आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हे पोलिस आंदोलनस्थळी येत असताना आंदोलक महिलांनी रस्त्यावर झोपून पोलिसांच्या गाड्यांचा ताफा अडवला. या वेळी पोलिसांनी अनेक आंदोलकांची धरपकड केली. या ठिकाणी तब्बल १८०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

काल (सोमवार) या प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यासाठी एक समिती गेली होती. या समितीला आंदोलकांनी विरोध केला. कालदेखील मोठा विरोध झाला. आज सकाळी आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांचा ताफा आंदोलक महिलांनी अडवून धरला. सकाळी साडेआठच्या सुमारास महिलांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या. काहीही झाले तरी तरी हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतली.

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांतर्गत माती सर्वेक्षणाचे काम सुरू झाले नसले तरी त्या कामाला विरोध करण्यासाठी सोमवारपासून बारसूच्या सड्यावर ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलकांना मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. सर्वेक्षणाकरिता येणाऱ्या पोलिसांना विरोध करणाऱ्या ३५ महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन, त्यांना रत्नागिरीला रवाना करण्यात आले. पोलिसांनी एकूण ११० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना राजापूर न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

दरम्यान, बारसू परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस कुमक तैनात करण्यात आली असून, दुसऱ्या दिवशीही काहीसे तणावाचे वातावरण होते. प्रस्तावित माती परीक्षणाच्या कामात प्रकल्प विरोधकांकडून अडथळे येऊ नयेत, म्हणून रविवारी (२३ एप्रिल) राजापूरच्या तहसीलदार श्रीमती शीतल जाधव यांनी ३१ मेपर्यंतच्या कालावधीसाठी मनाई आदेश लागू केला. प्रकल्पाला विरोध करणारे आंदोलक रविवारपासूनच बारसूच्या सड्यावर गोळा होऊ लागले. सोमवारीही सड्यावर मोठ्या प्रमाणावर आंदोलक जमा झाले होते; मात्र परिस्थिती शांत होती. माती परीक्षणाचे कामदेखील सुरू झाले नव्हते. मंगळवारी सकाळी काही महिलांनी रस्त्यावर पुन्हा ठिय्या मांडला व रस्ता अडविला. रिफायनरीविरोधी संघटनेच्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींना आंदोलनाच्या परिसरात जायला पोलिसांनी पूर्ण प्रतिबंध केला आहे.

सर्वेक्षण थांबवण्याबद्दल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, राजापूर तालुक्यात उन्हाळा सुरू झाला आहे. कडक उन्हाळ्यात सर्वेक्षण सुरू केल्याने रिफायनरी विरोधी जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरेल. त्यामुळे मोठा उद्रेक होऊ शकतो. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात खारघर येथे सरकारच्या बेपर्वा वृत्ती व नियोजनशून्य आयोजनामुळे नागरिकांचा मृत्यू झाला. बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणावेळी जनता माळरानावर एकवटल्यास खारघरची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

स्थानिक जनतेचा बारसू रिफायनरीला असलेला विरोध लक्षात घेता बारसू रिफायनरी सर्वेक्षणचे काम थांबवावे, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. हे निवेदन देताना महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत, जिल्हा उपाध्यक्ष हारिस शेकासन, शहर अध्यक्ष रमेश शाहा, माजी तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा सरचिटणीस आतिफ साखरकर उपस्थित होते.

विरोधकांनी रिफायनरी प्रकल्प नको असे जाहीर करावे – उदय सामंत
हे सर्वेक्षण रद्द करावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली. याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, सर्व विरोधकांनी बारसूच्या सर्वेक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी.

ते आज पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी काय मागणी केली, हा नंतरचा विषय आहे. परंतु त्या ठिकाणची वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. आंदोलन ज्या पद्धतीने होईल, असे अपेक्षित होते, तसे होत नाही, हे विरोधकांना कळले. लोकांची समजूत काढण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. म्हणून या गोष्टी घडत आहेत. मला सगळ्याच पक्षांना विनंती करायची आहे की, जर सर्वेक्षण थांबवायचे सेल, तर सगळ्यांनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे आणि हा उद्योग आम्ही घालवतो आहे अशी भूमिका घ्यावी. मग बघू काय करायचे ते.’

मुख्यमंत्री नाराज असल्याने गावाकडे निघून गेले, या तर्कवितर्कांवर बोलताना उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावची जत्रा आहे. ते गावच्या जत्रेला गेले आहेत. गावच्या जत्रेला गेल्यावरही मुख्यमंत्री नाराज आहेत, असे कोणी म्हणत असेल, तर त्यांचा नागरी सत्कार त्यांच्याच जत्रेत केला पाहिजे.

दिल्लीत मुख्यमंत्री बदलासाठी बैठका होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, यावर सामंत म्हणाले, राजकीय वर्तुळात ८ दिवसांपासून चर्चा सुरू आहेत की, उरलेल्या १३ आमदारांपैकी ७ आमदार आमच्याबरोबर येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार आहे, अशीही चर्चा आहे. काँग्रेसचा बडा नेता भाजपात जाणार अशीही चर्चा आहे. राजकीय वर्तुळात भरपूर चर्चा आहेत. त्या सत्यात उतरतील तेव्हा त्याचा विचार करू. पुढील दीड वर्षे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. याच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पुढील विधानसभा निवडणूक होईल, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला.

ग्रामस्थांशी संवाद
ग्रामस्थांचा विरोध असतानाही प्रशासनाने माती परीक्षणाला सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर परिसरातील ग्रामस्थांशी प्रशासनातर्फे संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी १० ग्रामस्थ उपस्थित होते, अशी माहिती जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे; मात्र बैठकीतील चर्चेचा तपशील पत्रकात देण्यात आलेला नाही.

पर्यावरण तज्ज्ञांशी गुरुवारी ग्रामस्थांसमवेत चर्चा
बारसू (ता. राजापूर) येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या मागणीनुसार चर्चा करण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञांसोबत येत्या गुरुवारी (२७ एप्रिल) बैठक आयोजित करण्यात आली आहे. रिफायनरीसंबंधी माती सर्वेक्षण कार्यवाहीत आज प्रशासनाने नागरिकांशी साधला संवाद साधला. त्यावेळी झालेल्या चर्चेत बैठक निश्चित करण्यात आली.

प्रस्तावित रिफायनरीच्या अनुषंगाने प्रस्तावित गावांमध्ये माती सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम सुरू होण्यापूर्वी आज सकाळी सर्वेक्षणाच्या ठिकाणी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उपस्थित जमावाला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबोधित केले आणि योग्य प्रकारे चर्चा करुन परिस्थिती हाताळली आहे, असे जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

याच पत्रकात म्हटले आहे की, दुपारी २ च्या दरम्यान पुन्हा एकदा सर्वेक्षणाच्या दिशेने येत असणाऱ्या जमावाला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, राजापूर उपविभागीय अधिकारी, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी, कार्यकारी अभियंता, राजापूरचे तहसीलदार यांनी सामोरे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यापैकी १५ ते २० आंदोलक प्रतिनिधींना चर्चेसाठी सर्वेक्षणाच्या ठिकाणी बोलावण्यात आले आणि ग्रामस्थांशी जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षणाच्या ठिकाणी चर्चा केली. चर्चेदरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी आपले म्हणणे मांडले. त्यावर प्रथम जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली. प्रकल्पाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी महिला भगिनींना आंदोलनासाठी नाहक प्रवृत्त करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आंबा बागायती क्षेत्र तसेच मच्छीमार व्यवसाय यावर रिफायनरी प्रकल्पाचा दुष्परिणाम होणार नाही, याविषयी माहिती दिली. चर्चेअंती पर्यावरण तज्ज्ञांची बैठक गुरुवारी घेण्याबाबत निश्चित करण्यात आले.

पत्रकारांकडून निषेध
आंदोलनासंदर्भातील घडामोडीचे वार्तांकन करण्यासाठी तेथे माध्यम प्रतिनिधी पोहोचले. मात्र वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचूच नये या हेतूने आज सकाळी माध्यम प्रतिनिधीना प्रकल्पाचया ठिकाणावरून हाकलण्यात आले. पुन्हा तेथे यायचेच नाही, असा दमही माध्यम प्रतिनिधींना भरण्यात आला. काहींच्या हाताला धरून तेथून बाहेर काढण्यात आले. माध्यम प्रतिनिधींसोबत केलेल्या अशा वागणुकीचा रत्नागिरीतील पत्रकारांनी निषेध केला. जयस्तंभ येथील पत्रकार कक्षात काळ्या फिती लावून हा निषेध नोंदवण्यात आला. पत्रकारांना अशी वागणूक दिल्याने राज्यभरातूनदेखील संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘आता आम्ही काय दाखवायचे, हेदेखील पोलीसच ठरवणार आहेत का,’ असा संतप्त सवाल माध्यमांच्या प्रतिनिधीनी उपस्थित केला आहे. पालकमंत्री उदय सामंत केवळ शासन आणि प्रशासनाची बाजू पत्रकारांसमोर मांडत आहेत. पत्रकारांना प्रशासनाने दिलेल्या वागणुकीची दखलही पालकमंत्र्यांनी घेतली नाही.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply