सावंतवाडी : सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील कोकण रेल्वेच्या टर्मिनसचे काम पूर्ण झाले नाही, तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने सावंतवाडी स्थानकप्रमुखांना दिला.
सावंतवाडी स्थानकाचा कोकण रेल्वे विभागात टर्मिनस असा उल्लेख असल्याचे निदर्शनास येते. मात्र अपुऱ्या सुविधांमुळे मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान प्रवास करणाऱ्या कोकणवासी चाकरमान्यांना याचा काहीच फायदा होत नाही. परिणामी याचा फायदा दक्षिणेतील गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू राज्यांना झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी प्रवासी संघटनेला माहितीच्या अधिकाराखाली रेल्वे प्रशासनाने सावंतवाडी टर्मिनसला कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. त्या द्याव्यात, बारा वर्षांपासून रखडलेल्या टर्मिनसचे काम २०२४ पर्यंत पूर्ण करावे आणि सावंतवाडी टर्मिनसला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही संघटनेने केली. ते न केल्यास उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी दिला.
याबाबतचे निवेदन १६ मे रोजी सावंतवाडी स्थानकप्रमुखांना संघटनेने दिले. यावेळी अध्यक्ष शांताराम नाईक म्हणाले, अनेक वर्षे अर्ज-विनंत्या करून त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सावंतवाडी टर्मिनसच्या कामासाठी कोकण रेल्वे महामंडळापासून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढला जाईल. त्याचे नेतृत्व मी करणार आहे. सेक्रेटरी यशवंत जड्यार म्हणाले, रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून सुसज्ज सावंतवाडी टर्मिनस व्हावे, अशी आग्रही मागणी केली आहे. कोकण रेल्वेला २५ वर्षे होऊऩ गेली, तरी रेल्वेचा लाभ दुर्दैवाने कोकणवासीयांना झालेला नाही. याउलट दक्षिणेतील राज्यांना या सुपरफास्ट गाड्यांचा फायदा अधिक होत आहे. कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाकडे पॅसेंजर गाड्या आणि कमी वेगवान गाड्यांची मागणी केली आहे. कोकणातील प्रत्येक स्थानकावर त्या गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी केली आहे. सावंतवाडी टर्मिनस मार्गी लागल्यास रेल्वे प्रवाशांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे त्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत.
यावेळी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य भरत पंडित, खजिनदार शेखर बागवे, बाळ वेळकर, सागर तळवडेकर, सावंतवाडीकर मिहिर मठकर, विहंग गोठोस्कर, सिद्धेश सावंत, सुनील गावडे, आबा सावंत, गुणाजी गावडे, योगेश नाईक, विनोद ठाकूर, प्रशांत बुगडे, संदीप पांढरे, संतोष गावडे, बाळू गावडे, सत्यवान गावडे, सुभाष मयेकर, सुशील चौगुले, शरद जाधव, दशरथ पेडणेकर, सतीश पाथरूट, मिलिंद दहिवले, राजाराम आळवे, अमिता आजगावकर आदी उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड




