रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या खंडाळा (ता. रत्नागिरी) शाखेचे उद्घाटन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते झाले.
यानिमित्ताने खंडाळा येथील सर्वसाक्षी हॉलमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेला पाच वर्षे पूर्ण व्हायच्या आधीच पाच शाखांची मागणी केली. जिद्दीने आणि कौशल्याने परिपूर्ण मागणी करणारी ही महाराष्ट्रातील पहिली संस्था आहे. खारवी समाज अल्प असला तरी त्यांची बांधणी केल्यामुळेच पतसंस्थेला यश मिळाले आहे. सभासद संख्या वाढवून सामाजिक बांधिलकी जपत काम करणारी ही पतसंस्था आहे, असे डॉ. शिंदे म्हणाले. या पतसंस्थेचे कौतुक करून त्यांनी विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले की, मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदाय पाहून पतसंस्थेची नाळ ख-या अर्थाने समाजाशी जोडली गेली असल्याचे स्पष्ट होते. पतसंस्थेने केलेली कर्जवसुली समाधानकारक असून सामाजिक भावनेत न अडकता कर्जवसुलीसाठी कठोर पावले उचलली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. खारवी समाजाची सहकार क्षेत्रातील अल्पावधीतच झालेली प्रगती भविष्यात अनेक शाखा निर्मिती करेल, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
वरवडे गावचे उपसरपंच गजानन हेदवकर यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील जनतेला पतसंस्थेची शाखा जवळपास नसल्याने आर्थिक व्यवहार करताना कष्ट पडत होते. ही समस्या संस्थेने अल्पावधीच दूर केली, असे जांभारीचे सरपंच आदेश पावरी म्हणाले. संस्थेच्या वाटचालीमध्ये समाधान व्यक्त करत संचालक व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान जांभारी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
उद्घाटन समारंभापूर्वी खंडाळा बाजारपेठेतील मुख्य चौकात प्रमुख अतिथींचे ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. मिरवणुकीने वाजत गाजत मुख्य उद्घाटन सोहळा कार्यक्रम स्थानी मान्यवरांचे आगमन झाले. कार्यक्रमाला जिल्हाभरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष संतोष पावरी यांनी केले. उपाध्यक्ष सुधीर वासावे यांनी सूत्रसंचालन केले. शाखा निर्मितीसाठी सहकार्य करणाऱ्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आभार संचालिका सौ. धृवी लाकडे मानले.

