रांगोळीतून उमटले सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग

रत्नागिरी : रांगोळीच्या विविध छटांमधून स्वा. सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग रांगोळीकारांनी साकारले. येत्या २८ मेपर्यंत ते रसिकांना पाहता येतील.

या रंगावलीतून ते साक्षात वीर सावरकर प्रत्यक्ष उभे राहिलेत, असा भास होतो, गौरवोद्गार श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र ऊर्फ मुन्नाशेठ सुर्वे यांनी काढले.

स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहानिमित्त पतितपावन मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्वा. वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील विविध भागांसह रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर विचार जागरण सप्ताह गेल्या २१ मेपासून सुरू झाला. तो २८ मेपर्यंत चालणार आहे. त्यात दुसऱ्या दिवशी जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा झाली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वा. सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग स्पर्धकांनी रांगोळीतून साकारले.

पतितपावन मंदिरात ही स्पर्धा झाली. स्पर्धकांनी वीर सावरकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग रांगोळीतून साकारताना सावरकर चरित्राची ओळख, अभ्यास याची चुणूक दाखवली. सकाळी १० ते ५ या वेळेत स्पर्धा झाली. संध्याकाळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष आनंद मराठे, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्टचे ट्रस्टी अॅड. विनय आंबुलकर, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र साळवी, राजन फाळके, गौरांग आगाशे, मनोज पाटणकर, पतितपावन संस्थेचे मंदार खेडेकर, परीक्षक कला शिक्षक, चित्रकर नीलेश पावसकर, प्रसिद्ध रांगोळीकर राजू भातडे, रांगोळीकार प्रशांत राजिवले, कलाकार श्रीकांत ढालकर, समन्वयक रवींद्र भोवड, रांगोळी स्पर्धा संयोजक अनघा निकम-मगदूम, सहसंयोजक मंगेश मोभारकर, तनया शिवलकर, केशव भट आदी उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असून २८ मे रोजी वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त पतितपावन मंदिरात आयोजित कार्यक्रमात याचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

पतितपावन मंदिरातील हे रंगावली प्रदर्शन २८ मेपर्यंत सकाळी १० ते १ व दुपारी ३ ते ६ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply