रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार क्रांतिकारक होते. आज भारताला याच विचारांची गरज आहे. असा सूर आज ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उमटला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर विचार जागरण सप्ताह सुरू आहे. यानिमित्त आज (दि. २४ मे) शहरातील विठ्ठल मंदिरात स्पर्धा झाली. स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला.
स्पर्धेच्या उद्घाटनाला माजी नगरसेवक राजू तोडणकर, संयोजक रवींद्र भोवड, राजेंद्र फाळके, तनया शिवलकर, भरत इदाते, साईजित शिवलकर, केशव भट, मंगेश मोभारकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक साहित्यिक, नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी आणि अॅड. सरोज भाटकर यांनी केले.
स्वातंत्र्य, हिंदुत्व आणि मंदिर प्रवेश, क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वा. सावरकरांचे बालपण, सावरकरांचे चरित्र हे विषय आठवी ते दहावी या शालेय गटासाठी दिले होते. खुल्या गटासाठी सावरकर आणि आजचा भारत, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरीतील सामाजिक सुधारणा आणि स्वा. सावरकरांचे हिंदुत्व असे विषय दिले होते. या दोन्ही गटांतील स्पर्धकांनी दिलेल्या विषयांवर अभ्यासपूर्ण विचार मांडले.
शालेय गटातील विद्यार्थ्यांची तयारीसुद्धा चांगली होती. सावरकरांनी लहानपणी घेतलेली शपथ, विदेशी कपड्यांची होळी, जातींमध्ये विभागलेला हिंदू समाज एक होण्यासाठी केलेले कार्य, भागोजीशेठ कीर यांनी केलेली पतितपावन मंदिराची स्थापना यांविषयीची मते मुलांनी मांडली. सावरकरांनी अंदमानात सहन केलेल्या हालअपेष्टा, रत्नागिरीत केलेले सामाजिक कार्य, विज्ञान विचार, नाट्य, साहित्य लेखन याबाबतही विचार मांडले गेले.
परीक्षकांच्या वतीने बोलताना डॉ. जोशी म्हणाले की, सावरकरांच्या क्रांतीविषयी बोलताना बंदुका आणि सशस्त्र क्रांतीचाच विचार करून उपयोगी नाही. त्यांनी लिहिलेली १८५७ चे स्वातंत्र्यसमर, सहा सोनेरी पाने अशी विविध पुस्तके, ग्रंथ वाचले पाहिजेत. त्यांच्या विचारांचे जागरण केले पाहिजे. भाषाशुद्धी, हिंदुत्वाचे विचार किंवा सर्वांना मंदिरांत प्रवेश हे सारे आजही त्यांचे क्रांतिकारी विचार आणि महान कार्याची साक्ष देतात. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धांतून सावरकरांचे विचार जागरूक राहायला हवेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड