जादूच्या पाच हजाराव्या प्रयोगाकडे वाटचाल करणारे विनयराज

जादूच्या पाच हजाराव्या प्रयोगाकडे वाटचाल करणारे रत्नागिरीचे जादूगार विनयराज उपरकर यांनी आपल्या वाटचालीचा पट गोळप कट्ट्यावर उलगडून दाखवला.

गोळप (ता. रत्नागिरी) येथे ऑगस्ट २०१८ पासून दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी गोळप कट्टा आयोजित केला जातो. या कट्ट्याच्या ४३व्या कार्यक्रमात मान्यवर म्हणून मूळ देवबाग, सिंधुदुर्ग येथील सध्या रत्नागिरीत स्थायिक झालेले जादूगार विनयराज उपरकर उपस्थित होते. त्यांनी आपला प्रवास श्रोत्यांना कथन केला. त्यांचे कथन त्यांच्याच शब्दांत.

आमचे खरे गाव कणकवली, मात्र देवबाग या आजोळच्या गावी राहत होतो. तेथे आमचे घर होते. प्राथमिक शाळेत शिक्षण झाले. गावात १९८० पर्यंत वीज आणि रस्ता नव्हता. तीन बाजूंना समुद्र आणि खाडी एका बाजूला वाळूचा डोंगर. त्यामुळे दहा-बारा किलोमीटर चालल्याशिवाय बाहेर जाता येत नव्हते. कालांतराने रस्ता आला. वीज आली. गावात उत्सवाची आणि महापुरुष मंदिरात प्रत्येक वाडीतील नाटके व्हायची. ती पाहताना नाटकाची गोडी लागली. शाळेत वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत होतो. स्टेज डेअरिंग होते. नाटिकांमध्ये काम करायला मिळाले.

मी लहानपणापासून मितभाषी आहे. ओळख होईपर्यंत सहसा कोणाशी बोलत नाही. आपल्या बोलण्याने कोणी दुखावले जाऊ नये, अशी माझी भावना असायची. हा एक प्रकारे माझ्यातील न्यूनगंड आहे. आयुष्यात मला त्याचा खूप तोटा झाला.

भाऊ श्रीहरी उपरकर अष्टपैलू होता. जादू विद्या, पेटी, तबला, भजन, मेकअप इत्यादी सगळे करायचा. त्याच्यामुळेच मी आज कलाकार आणि जादूगार आहे. दुसरीत असताना भावाचे पाहून जादू प्रयोग केला होता. जुनी अकरावी झाल्यावर कॉलेजला सावंतवाडी येथे गेलो. नाटक वगैरे विषय कमी झाला. मात्र तेथे जादूगार रघुवीर यांचा प्रयोग पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांच्याशी पत्रव्यवहार करून जादू शिकायचा प्रयत्न केला. त्यांचे शिष्य राजेश, शंकर देव यांच्याकडे शिकलो.

नंतर रत्नागिरीत जे. के. फाइल्स कंपनीमध्ये नोकरी लागली. नोकरी करताना सुहास भोळे, अजित पाटील, शेखर जोशी अशी अनेक समविचारी मंडळी भेटली. एकांकिका, नाटक अशा विषयांना चालना मिळाली. कंपनीचे मॅनेजर ठाकूर साहेब यांचा पूर्ण पाठिंबा असायचा. त्यामुळे आम्ही नाटके, एकांकिका करू शकलो. संस्था म्हणून कंपनीचे नाव देत असल्याने मी बरोबर जात असे. मात्र हळूहळू प्रकाशयोजना मी पाहायला लागलो. १९८५ पासून अनेक एकांकिका आणि नाटकांना स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले. नंतर शेकडो पारितोषिके मिळाली. त्यामध्ये मोठा वाटा सुहास भोळे यांचा. मला प्रकाशयोजनेसाठी ८२ पारितोषिके मिळाली.

हे करत असताना रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात हरि सिंग वाल्मीकी यांच्याबरोबर जादूचे प्रयोग करत असे. मरीनर दिलीप भाटकर सुद्धा जादूचे प्रयोग करत असल्याचे समजले होते. त्यांचेही मार्गदर्शन घेतले. छोटे-मोठे शो करू लागलो. लोकांसमोर येण्याची संधी मिळत आहे. मिळणारा आनंद महत्त्वाचा मानला. पैशासाठी आणि पैसे पाहून प्रयोग कधी केला नाही. असंख्य जादूगाराच्या ओळखी झाल्या. काही जणांनी मैत्रीमध्ये स्वारस्य दाखविले नाही, मात्र काही जणांनी घरी बोलावून मार्गदर्शन केले. आजपर्यंत ४८३९ प्रयोग केले. पुढील वर्षापर्यंत ५००० प्रयोगांचा पल्ला गाठायची इच्छा आहे.

जादूचे प्रयोग करत असताना पारंपरिक पद्धतीने जादू करण्यापेक्षा त्यात वेगळ्या पद्धतीने आपल्याला कसे करता येईल, यासाठी चिकाटीने प्रयत्न करून नवनवीन प्रकारे प्रयोग केले. त्यामुळे प्रत्येक जादूमध्ये माझा ठसा उमटवता आला. जादूसाठी असंख्य पुरस्कार मिळाले. इंग्लंडमधील ऑनलाइन स्पर्धेत २०२१ मध्ये तिसरा क्रमांक मिळाला. या स्पर्धेत ११ देशांमधील १०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्याशिवाय कुवेतमधील जादू संघटनेने मला आजीव सभासद करून घेतले. जादूच्या शिक्षणासाठी खूप शिबिरे घेतली. आताही ऑनलाइन जादू शिकवतो.

श्री. उपरकर यांनी आपले असंख्य अनुभव, प्रसंग, आठवणी सांगितल्या. श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. शंकानिरसन केले. श्रोत्यांच्या विनंतीला मान देऊन काही जादूचे अप्रतिम प्रयोग करून दाखवले आणि श्रोत्यांना आपल्या कलेची चुणूक दाखवून भारावून टाकले.

(जादूगार विनयराज उपरकर यांचा संपर्क क्र. ९८५०२६९९६३)

(शब्दांकन – अविनाश काळे – ९४२२३७२२१२)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply