रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची तिरंगा सायकल फेरी

रत्नागिरी : गेल्या वर्षाप्रमाणेच घरोघरी तिरंगा अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरी शहरात सायकल फेरीचे आयोजन केले होते. तिला उदंड प्रतिसाद लाभला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सुमारे बारा किलोमीटरच्या मार्गावर रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या वतीने सायकल फेरी काढण्यात आली. त्यात ११० सायकलपटू सहभागी झाले. सायकल फेरी आज सकाळी ८ वाजता मारुती मंदिर येथून सुरू झाली. नाचणे रोड, साळवी स्टॉप, मारुती मंदिर, माळनाका, जयस्तंभ, रामआळी, गाडीतळ, टिळक आळी, बंदररोड आठवडा बाजारमार्गे जयस्तंभापर्यंत फेरी काढली. फेरीच्या मार्गावर घोषणा देण्यात आल्या. अनेक नागरिकांनीही यामध्ये सहभाग घेत भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. नाक्यानाक्यावर शहर आणि वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. या फेरीमध्ये ८ वर्षांपासून ७० वयापर्यंतचे ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाल्याने फेरी यशस्वी झाली. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, यांचे रॅलीकरिता सहकार्य लाभल्याबद्दल क्लबतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.

गतवर्षीसुद्धा भर पावसात या सायकल फेरीला आबालवृद्धांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानुसार याही वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि फेरी यशस्वी झाली. फेरीतील सहभागी काही सायकलस्वारांनी सायकलला तिरंगा राष्ट्रध्वज लावला होता. तिरंगा ध्वजाचा अवमान होणार नाही, याची खबरदारी सर्व स्वारांनी घेतली.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा दर महिन्याला काही ना काही उपक्रम सुरू आहे. त्यामुळे सध्या १७५ हून अधिक सायकलपट्टू या क्लबला जोडले गेले आहेत. यामध्ये डॉक्टर, वकील, पोलिस, हॉटेल व्यावसायिक, पत्रकार, विद्यार्थी, अभियंते, नोकरदार आणि महिलांचा समावेश आहे. यापूर्वी रत्नागिरीत जिल्हा सायकल संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्यामुळे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबकडे अनेक सायकलपटूंट ओढा वाढला आहे.

सायकल चालवणे हेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे शुल्क

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्यानंतर अनेक सायकलिस्ट आता रत्नागिरीच्या रस्त्यावर दिसू लागले आहेत. रत्नागिरीत सध्या १०० हून अधिक सायकलस्वार क्लबचे सदस्य असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. क्लबचे सदस्यत्व घेण्याकरिता आठवड्याला किमान ७५ आणि महिन्याला किमान ३०० किमान किलोमीटर सायकल चालवण्याचे अनोखे शुल्क आकारले जाते. रत्नागिरीत सायकलसंस्कृती वृद्धिंगत व्हावी, यासाठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब अनेकविध उपक्रम राबवत आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply