तिवरे गावी पर्यावरण मंडळाने अनुभवल्या श्रावणसरी

चिपळूण : हिरवागार श्रावण आणि रिमझिम बरसणारा पाऊस असा अनुभव देणारा ‘श्रावण’सरी कार्यक्रम सह्याद्रीच्या कुशीतील तिवरे (ता. चिपळूण) या गावी निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे पार पडला.

जिल्ह्यातील पर्यावरण मंडळाच्या प्रतिनिधींनी या उपक्रमांतर्गत पूर्वसह्याद्री खोऱ्यातील तिवरे गावाला भेट दिली. गावातील ‘भेंदवाडी’ परिसरातील निसर्गरम्य वातावरणात पर्यावरणीय प्रबोधन विचारांचा जागर यावेळी करण्यात आला. श्रावण मासात हिरवागार शालू नेसलेल्या निसर्गाचा अनुभव मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडीक, धीरज वाटेकर, मोहन पाटील, मायावती शिपटे आणि जिल्हाध्यक्ष सतीश मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून सहभागी झालेल्या तीस पर्यावरणप्रेमींनी घेतला.

भेंदवाडीत सौ. अंजली आणि अरुण पुजारे या दाम्पत्याने घर बांधून निसर्गाच्या सान्निध्यात उर्वरित आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या राहत्या आणि कृषी पर्यटनाचे स्वरूप दिलेल्या घराला २ जुलै २०१९ रोजी झालेल्या तिवरे धरणफुटीचा मोठा फटका बसला होता. धरण फुटले तेव्हा हे उभयता याच घरात वास्तव्याला होते. उदरनिर्वाहाच्या अपुऱ्या संधींसह कोकणात सध्या दरडी कोसळणे आणि तत्सम घटनांमुळे स्थलांतराचे प्रमाण वाढते आहे. या पार्श्वभूमीवर धरणफुटीसारखी दुर्घटना पचवून पुन्हा जिद्दीने त्याच ठिकाणी आपल्या मनातील निसर्ग-कृषी संकुल उभारण्याचे पुजारे दाम्पत्याचे प्रयत्न अभिमानास्पद असल्याचे मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी सांगितले. महाडीक यांच्या हस्ते यावेळी पुजारे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.

उत्कृष्ट ट्रेकर असलेले श्री. पुजारे यावेळी म्हणाले, २०१९मध्ये धरणफुटीची घटना घडल्यावर २०२०च्या नववर्षारंभी आम्ही पुन्हा येथे राहायला आलो. २०२१च्या महापुराचा फटकाही बसला. पूर्वीच्या तिवरे धरणाच्या आउटलेटसमोर हे केंद्र आहे. त्या रात्री सुरुवातीला साडेनऊच्या आसपास आवाज ऐकू आला. काही वेळाने बाहेर येऊन टॉर्च मारून पाहिले तेव्हा पाण्याचा वाढता प्रवाह दिसला. धरणाच्या दिशेने पाहिले तेव्हा एका कोपऱ्यात एक बैल दिसला आणि काही कळायच्या आत तो गायब झाला. तेव्हा मनात पाल चुकचुकली. पाणी वाढू लागले होते. दगडांचे आवाज येऊ लागले होते. काहीतरी गडबड होत असल्याची जाणीव झाली होती. फोन लावायचा प्रयत्न करत असताना अर्धे घर कोसळले. मोठा आवाज झाला. घरातून पाणी जाऊ लागले. घराला पाण्याचा वेढा पडला. वाहत्या पाण्याचा वेगही वाढला होता. तासाभराने पाण्याचा वेग कमी होऊन ते ओसरायला लागले. पुजारे यांच्या तोंडून हा अनुभव ऐकताना सारे निसर्गप्रेमी स्तब्ध झाले होते.

निसर्गातील श्रावणसरी आठवून त्या निमित्ताने आपण सर्वांनी पर्यावरण जागर करू या, असे आवाहन यावेळी मंडळाचे राज्य सचिव-लेखक धीरज वाटेकर यांनी केले. ते म्हणाले, आषाढ संपून श्रावणमास सुरू झाला की पावसाचा जोर जरासा कमी होऊन निसर्गावर त्याने केलेली हिरवी पोपटी जादू आपल्याला मोहित करते. श्रावणात निसर्गाचे सुंदर दर्शन होते. फुलांचा रंगोत्सव पाहायला मिळतो. आपल्या पूर्वजांनी निसर्गाचे महत्त्व जाणून पर्यावरण, निसर्ग संरक्षण, मानवी स्वास्थ्य आणि आरोग्य यांचा सुरेख संगम साधला आहे. श्रावण आपल्याला निसर्गाचा आदर करायला शिकवितो. आजच्या वेगवान आयुष्यात श्रावणसरीच्या निमित्ताने मनामनांत श्रावण बहरून पर्यावरण जागरण व्हायला हवे असल्याचे वाटेकर म्हणाले. त्यांनी पर्यावरण मंडळाची ओळख आणि कार्यपद्धती मांडली.

सुजाता जांबोटकर यांनी काव्यवाचन केले. नवनियुक्त प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. मोहन पाटील यांनी तालुका विज्ञान मंडळाला भविष्यात उपलब्ध होणाऱ्या विज्ञान भवनाची माहिती दिली. यावेळी प्रा. सुरेश जांबोटकर, चिपळूण तालुक्यातील पहिल्या कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका नूतन महाडीक उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष सतीश मुणगेकर यांनी केले, तर आभार मंडळाच्या चिपळूण अध्यक्ष व केंद्रप्रमुख शैलजा लांडे यांनी मानले.

यावेळी जिल्हाध्यक्ष मुणगेकर यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. नवनियुक्त कार्यकारिणी सदस्यांना वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडिक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नवनियुक्त कार्यकारिणी अशी : सचिव पोपट जगताप (खेड), उपाध्यक्ष विजय बसवंत (खेड), उपाध्यक्ष भारत जानकर (राजापूर), खजिनदार गणेश कुलकर्णी (गुहागर), कार्याध्यक्ष आकाराम महिंद (दापोली), सल्लागार सदस्य सुदेश कदम (गुहागर), लीला बिरादार (चिपळूण), मारुती भंडारे (खेड), प्रमुख संघटक नीलम मोहिते (चिपळूण), भरत पाटील (खेड), सहसचिव स्नेहल विचारे (चिपळूण), संदेश कोकाटे (चिपळूण), कार्यकारणी सदस्य तृषाली कदम, विनया देवरूखकर, राजेश इंगळे, सुरेंद्र खताते, मुग्धा बेलोसे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply