मुंबई : शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी पत्रलेखन महत्त्वाचे आहे, असे मत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
दादर येथील काणे उपाहारगृहाच्या सभागृहात वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते म्हणाले, सोशल मीडियावरील सामाजिक पत्रकारितेच्या वाढत्या प्रसारामुळे, ‘वर्तमानपत्रांतील वाचकांची पत्रे’ हा स्तंभ यापुढे दुबळा होत जाईल अशी भीती वाटत असली तरी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तसेच सत्ताधारी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी संपादकीय पानावरील त्यांची हक्काची जागा अबाधित राहणे गरजेचे आहे. बोधकथेतील लहानशी चिमणी आपल्या चोचीत पाणी आणून जंगलातील आग विझवण्याचा प्रयत्न करते, याची इतिहासाने नोंद घेतली आहे. असेच तुम्ही करीत आहात. त्यामुळे तुम्ही आणि प्रिंट मीडियाने दर्पणपासून सुरू झालेली ही परंपरा टिकवण्यासाठी जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
काळाची गरज म्हणून समाजासाठी आवश्यक असलेली वृत्तपत्र लेखकांची ही चळवळ खंडित होणार नाही याची जाणीव ठेवून संस्थेच्या कार्यालयीन जागेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देत ते पुढे म्हणाले की, एका अर्थाने वृत्तपत्रलेखक हा समाजमनाचा ‘आरसा’ असतो.
आसपासच्या परिस्थितीकडे डोळे आणि कानदेखील उघडे ठेवून पाहण्याची सवय आणि सहसा सामान्यांच्या नजरेस किंवा मनास न जाणवणाऱ्या बाबींची तत्परतेने नोंद घेण्याची सवय या बाबी उपजतच अंगी असाव्या लागतात. वृत्तपत्रलेखकामध्ये मात्र या बाबी जाणवतात, तो हातात लेखणी घेतो आणि निर्भीडपणे आपले मत लिहून वर्तमानपत्राकडे पाठवून देतो, भले ते छापून येवो की नाही, पण हे काम तो निःस्वार्थीपणे करतो. म्हणूनच वृत्तपत्रलेखक हा व्यावसायिक पत्रकार नसला तरी पत्रकाराप्रमाणेच त्याचे डोळे-कान उघडे असतात. आसपासच्या, सर्वांनाच दिसणाऱ्या घटनांमधील ‘बातमी’मूल्य असलेले वेगळेपण टिपण्याची क्षमता व त्याचे विश्लेषण करून त्यातील वेगळेपण नेमके निवडून लोकांसमोर मांडण्याचे कौशल्य त्याच्याकडे असते. एका अर्थाने ही पत्रकारिता क्षेत्राची ‘तिसरी बाजू’ आहे.
उद्योजक सुरेशराव कदम यांनी आपल्या भाषणात संघाच्या कार्याचे कौतुक करताना अमृत महोत्सवी वर्षात कार्यक्रम करण्यासाठी एक लाख रुपये देणगी दिली.
ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मधुकर कुबल आणि मनोहर मांदाडकर यांनी संस्थेच्या आणि वृत्तपत्र लेखन चळवळीसाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त कॉम्रेड मणिशंकर कवठे स्मृतीनिमित्त आयोजित केलेल्या ‘अत्रेय प्रहार’ या लेख स्पर्धेचे पारितोषिक वितरण तसेच वर्तमानपत्रातून सातत्याने लिहिणाऱ्या वृत्तपत्र लेखकांचा गौरव करण्यात आला.
मुंबईत फोर्ट येथे २२ ऑगस्ट १९४९ रोजी तांबे उपाहारगृहातील चळवळीचे पहिले संमेलन ते २२ ऑगस्ट २०२३ मामा काणे उपाहारगृहातील हे ‘अमृत महोत्सवी संमेलन’ याचा आणि संस्थेच्या कार्यक्रम उपक्रमांचा आढावा संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी प्रास्ताविकात घेतला.
यावेळी कामगार नेते दिवाकर दळवी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मणिशंकर कवठे, शिक्षणतज्ज्ञ आनंद मापुसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर राजन देसाई यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष रमेश सांगळे यांच्या नेतृत्वाखाली कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, राजन देसाई, अब्बास अत्तार, दिगंबर चव्हाण, विजय ना. कदम, नंदकुमार रोपळेकर, पास्कोल लोबो, सुरेश पोटे, सुनील कुवरे, दत्ताराम गवस यांनी विशेष मेहनत घेतली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

