Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

ग. दि. माडगूळकरांना पणजी येथे काव्यांजली

Advertisements

पणजी : गदिमांना त्यांच्या आईकडून कवितेचे बाळकडू मिळाले. आईवर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती. त्यांची शब्दसंपत्ती प्रचंड होती. त्यामुळे त्यांच्या कवितेतील शब्दांत सौंदर्य होते. त्यांची तपश्चर्या मोठी होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ निवेदिका सुकन्या सुजित जोशी यांनी केले.

साहित्यलेणी प्रतिष्ठान (ताळगाव, गोवा) आणि बृहन्महाराष्ट्र मित्र व्हॉटस अॅप समूह (संभाजीनगर) या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन यांचे औचित्य साधून गदिमांना काव्यांजली वाहण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात पार पडला.

सुकन्या जोशी पुढे म्हणाल्या. गदिमांकडून गीतरामाय़ण आणि इतर काव्याचे एकटाकी लेखन झाले. अभंग ते लावणी, कविता व चित्रपटगीते त्यांनी समरसतेने लिहिली.

डॉ. अनुजा जोशी म्हणाल्या, आपले लिखाण सरस आणि सकस असले तर आपल्याला लोक बोलावतीस, शंकर रामाणी यांची समग्र कविता हे पुस्तक लिहिण्यासाठी दोन वर्षे त्यांच्या कवितेचा अभ्यास केला. पूर्वसूरींचे साहित्य वाचले पाहिजे.

साहित्यिकांनी वाचन केले पाहिजे आणि आपण लिहिलेले स्वतः वाचले पाहिजे, असे मत न्या. अंबादास जोशी यांनी केले. बृहन्महाराष्ट्र व्हॉटस अॅप समूहाचे मुख्य प्रशासक प्रशांत गौतम यांनी समूहाचा इतिहास सांगितला. या माध्यमातून आलेले अनुभव त्यांनी कथन केले.

नारायण पांडवे, अरविंद बर्वे, सुजित जोशी हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

यावेळी झालेल्या काव्यांजली कविसंमेलनात सुकन्या जोशी, डॉ. अनुजा जोशी, आसावरी भिडे, आलिशा गडेकर, प्राची नाईक, तृप्ती बांदेकर, बबिता गावस, सरिता सामंत, नूतन दाभोळकर, डॉ. रेखा पौडवाल, लक्ष्मी महात्मे, लक्ष्मण पित्रे, प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, नारायण पांडव, गौरी भालचंद्र, प्रमोद कारापूरकर, चित्रा क्षीरसागर, रजनी रायकर, कविता आमोणकर, शर्मिला प्रभू आदींनी सहभाग घेतला.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version