पणजी : ताळगाव (पणजी) येथील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या चित्रा प्रकाश क्षीरसागर यांना मानाचा गोमंत साहित्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माजी केंद्रीय कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला निकेतन सांस्कृतिक संस्थेचा हा उपक्रम आहे. कला निकेतन सांस्कृतिक संस्थेच्या दहावा वर्धापनदिनाचे निमित्त साधून हा कार्यक्रम झाला. शाल, स्मृतिचिन्ह, श्रीफळ व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी दत्ताराम ठाकूर यांना कलारत्न, विठ्ठल गावस यांना नाट्यभूषण, राजमोहन शेट्ये यांना साहित्यभूषण आणि रामानंद तारी यांना पत्रकारभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारंभाला गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, कला निकेतनचे अध्यक्ष शेखर खांडेपारकर, किसन फडते, पत्रकार राजू भिकारो नाईक, सौ. सुरेखा खांडेपारकर आदी मान्यवर उपस्थित होते. सौ. दीपा मिरिंगकर यांनी सौ. सुरेखा खांडेपारकर यांची ओटी भरली.
रजनी रायकर यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास पाटील यांनी स्वागतगीत म्हटले. शर्मिला काणकोणकर, पूजा जुवेकर, दीपक नाईक यांनी पुष्पगुच्छ प्रदान केले. मान्यवरांनी पुरस्कार विजेत्यांची आणि शेखर खांडेपारकर यांच्या कार्याची प्रशंसा केली.
पुरस्कार प्रदान करण्याआधी विजेत्यांची व पाहुण्यांची घोडेमोडणी या पारंपरिक नृत्याच्या साथीने हर हर महादेवच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

