रत्नागिरी : येत्या ७ जानेवारी रोजी होणाऱ्या धावनगरी रत्नागिरी म्हणजेच कोकण कोस्टल मॅरेथॉनला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मॅरेथॉनसाठी आतापर्यंत ७०० हून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूरसह परराज्यातीलही धावपटूंचाही समावेश आहे.

रत्नागिरीत ७ जानेवारीला मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरून मॅरेथॉनला सुरुवात होईल. काजरघाटी, सोमेश्वर, कोळंबे, फणसोप, भाट्ये अशा ७ गावांमधून निसर्गरम्य वातावरणात २१ किलोमीटरची ही मॅरेथॉन होणार आहे. ही हाफ मॅरेथॉन असून रत्नागिरीमध्ये एवढ्या मोठ्या पातळीवर प्रथमच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि सर्व सहकारी संस्थांच्या मदतीने ही मॅरेथॉन अभूतपूर्व होण्याकरिता अनेक लोक सक्रिय योगदान करत आहेत.
या मॅरेथॉनच्या पूर्वतयारीसठी थिबा राजवाड्याच्या प्रांगणामध्ये दर रविवारी प्रॅक्टिस रन या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये दररोज चालणारे, धावणारे, नोंदणी केलेले असे सर्व प्रकारचे धावपटू सहभागी होतात. या प्रॅक्टिसरनचा उपयोग धावपटूंना स्पर्धेसाठी चांगल्या प्रमाणात होणार आहे, असे स्पर्धकांनी सांगितले.
ही स्पर्धा फक्त सुवर्णसूर्य फाउंडेशनची किंवा आयोजकांची नाही तर संपूर्ण रत्नागिरीकरांची आहे. याचा फायदा रत्नागिरी शहराला होणार आहे. यातून पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे. यामुळेच रत्नागिरीतील सामाजिक संस्था, संघटना, व्यावसायिक यांनी या स्पर्धेसाठी सर्व ते सहकार्य देण्याचे मान्य केले आहे. रत्नागिरीमध्ये विविध व्यावसायिक, संस्था यांच्या भेटी आयोजकांतर्फे घेण्यात येत आहेत. पावस येथील उद्योजक आनंद देसाई, रत्नागिरीतील योजक उद्योग समूहाचे आनंद भिडे, तसेच विविध हॉटेल व्यावसायिकांचीही भेट घेतली जात आहे. या सर्वच उद्योजकांनी स्पर्धेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. रत्नागिरी पेट्रोल डिझेल वितरकांनी स्पर्धेचे पोस्टर पेट्रोल पंपामध्ये प्रदर्शित केले आहे. रत्नागिरी वॉकर्स क्लबचे बहुमोल सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले आहे. रत्नसिंधू योजनेचे कार्यकारी संचालक किरण ऊर्फ भैया शेठ सामंत यांनी स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सर्व ग्रामपंचायती, पोलीस, जिल्हा प्रशासनाचेही सहकार्य लाभणार आहे. लागणारी सर्व प्रकारची मदत मिळणार असल्याने सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार असून पाच किमी, १० किमी आणि २१ किमीसाठी स्पर्धा आहे. यामध्ये महिला, पुरुष यांचे वयोगटानुसार गट करण्यात आले आहेत. आकर्षक बक्षिसे, चषक देऊन विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन धावनगरी रत्नागिरी करू या, असे आवाहन सुवर्णसूर्य फाउंडेशनने केले आहे.
कोकण कोस्ट्ल मॅरेथॉनमध्ये नावनोंदणीकरिता लिंक अशी –
https://www.alpharacingsolution.com/race/register/825
मॅरेथॉनच्या तसेच सराव सत्राच्या अधिक माहितीसाठी ९१५१५५१५४७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

