मालवण : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे पंचक्रोशी (फेस्कॉन) संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार आचरे गाऊडवाडी येथील ज्येष्ठ रंगकर्मी तानाजी संभाजी पांगे यांना जाहीर झाला आहे.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे असून पुरस्काराचे वितरण आचरा येथे ३० एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वार्षिक अधिवेशनात प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांनी दिली. प्रतिवर्षी विविध क्षेत्रात युवक, युवती, स्त्रिया, जेष्ठ यांचा स्नेहमेळाव्यात जीवनगौरव देऊन सत्कार होतो. हे वर्ष ज्येष्ठ सेवावृत्ती पुरस्काराचे असल्याने श्री. पांगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, असे कांबळी म्हणाले.
पुरस्कार निवडीसाठी कार्यकारिणीची स्वतंत्र निवड समिती असून त्या समितीने तानाजी संभाजी पांगे यांची निवड केली आहे. तानाजी पांगे यांनी गेले अर्धशतक रंगकर्मी म्हणून रंगदेवतेची निष्काम सेवा केलेली आहे. मुंबईत कामगार रंगभूमीपासून आचरे पंचक्रोशीसारख्या ग्रामीण रंगभूमीची नाळ त्यांनी आपल्या निष्काम सेवेने जोडली आहे. गेली पन्नास वर्षे नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय, सादरीकरण या क्षेत्रात पांगे यांनी आपले तन-मन-धन अर्पण केले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असताना या नाट्यकर्मीने रंगभूमीसाठी सर्वस्व अर्पण केले आहे. देव हवे सोबतीला?, उष्ट्या पत्रावळी, वाट वेगळी नियतीची अशी अनेक नाटके त्यांनी लिहून दिग्दर्शित केली आहेत. ही नाटके एके काळी शहरी आणि ग्रामीण भागात गाजली.
तरुणांसाठी नाट्य प्रशिक्षण, त्यांच्या नाट्य मंडळाचे नाटक दिग्दर्शित करणे आदी सेवा पांगे यांनी छंद म्हणून जोपासली. त्यांच्या अविरत रंगभूमीच्या सेवेचे कौतुक म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

